मुसळधार पावसाने बार्शी भागात नुकसान

प्रशांत काळे 
Thursday, 15 October 2020

बुधवारी एकाच दिवसांत 1404 मिलीमीटर पाऊस झाला असून तालुक्‍यातील सर्व प्रकल्प, तलाव, धरणांनी धोक्‍याची पातळी ओलांडली आहे.

बार्शी (सोलापूर) : बार्शी शहर अन्‌ तालुक्‍यात परतीच्या पावसाने हाहाःकार उडाला असून सलग पाच दिवस झाले पावसाने झोडपून काढले आहे. बुधवारी एकाच दिवसांत 1404 मिलीमीटर पाऊस झाला असून तालुक्‍यातील सर्व प्रकल्प, तलाव, धरणांनी धोक्‍याची पातळी ओलांडली आहे. शहराला मिळणारे सर्व रस्ते बंद झाल्याने संपर्क तुटला आहे. शहर अन्‌ तालुक्‍यात ढगफुटी झाली, अशी चर्चा आहे. शहर आणि तालुका पूर्णपणे जलमय झाला आहे.
 
बुधवारी पहाटे धो-धो बरसणारा पाऊस दुपारी चारच्या दरम्यान थांबला. शहरातील एकही भाग असा शिल्लक राहिला नाही कीं तिथे पावसाचे पाणी घुसले नाही. सोलापूर रोड, मंगळवार पेठ, जावळी प्लॉट, शिवाजीनगर, एकविराई चौक या भागात मोठ्या प्रमाणात घरामध्ये पाणी शिरले. मुख्य बाजारपेठ असलेल्या पांडे चौक, शाहीर अमरशेख चौक, गांधी पुतळा, ऐनापूर मारूती चौक, खानापूर रोड, रामेश्वर मंदीर, प्रसन्नदाता मंदिर, कसबा पेठेतील मारुती मंदिर या ठिकाणी तर सुमारे तीन फूट पाणी आल्याने दुकांनात पाणी शिरल्याने व्यापाऱ्यांची धांदल उडाली होती.
 
लातूर रस्त्यावर ओढ्याजवळ तर परांडा रस्त्यावर वारदवाडीच्या पुढे बस अडकल्याने शहर व तालुका पोलिस अधिकारी, कर्मचारी, संघटनेचे स्वयंसेवक यांनी घटनास्थळी जाऊन प्रवाशांना मदत करुन सुखरुप बाहेर काढले. बुधवारी दिवसभरात बार्शी 158 मिलीमीटर, आगळगाव 65, वैराग 168, पानगाव 165, सुर्डी 149, गौडगाव 155, पांगरी 122 , नारी 160, उपळेदुमाला 110, खांडवी 152 असा एकूण 1 हजार 404 मिलीमीटर पाऊस एकाच दिवसांत पडला आहे.  मागील चार दिवसांत 985 मिलीमीटर पाऊस झाला होता. पाच दिवसांत 2 हजार 389 मिलीमीटर पाऊस झाला असल्याची नोंद तहसील कार्यालयात झाली आहे.
 
मालेगाव (ता.बार्शी) येथे घराची भिंत पावसाने भिजून पाणी वीजेच्या मीटरमध्ये उतरल्याने वीजप्रवाह घरामध्ये सुरु होऊन लोखंडी दाराला हात लावताच सार्थक व्यंकटेश घोडके (वय 10) या बालकाचा विजेचा धक्का बसून मृत्यू झाला आहे. शहरातील गणेश तलाव तुडुंब भरुन सांडवा वहात आहे तर तालुक्‍यातील सर्व तलाव ओव्हरफ्लो होऊन दोन फूट उंचीवरुन पाणी सांडव्यातून वाहत आहे. तुळजापूर, सोलापूर, लातूर रस्त्यावरील पूल वाहुन गेले आहेत. ओढ्याच्या पाण्याच्या वेगामुळे वाहने, जनावरे, दुचाकीही वाहून गेल्या आहेत. 
 
बुधवारी सायंकाळी पाच नंतर आमदार राजेंद्र राऊत, नगराध्यक्ष असिफ तांबोळी, शिवसेना नेते भाऊसाहेब आंधळकर, भाजप नेते राजेंद्र मिरगणे यांनी शहरात पाणी शिरलेल्या घरांची, दुकानांची पाहणी केली.

संपादन - सुस्मिता वडतिले 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Heavy rains have damaged Barshi taluka