
बहुतांश गावांत राष्ट्रवादीच्याच दोन गटांत लढती होत आहेत, तर काही गावांत सभापती विजयराज डोंगरे गट विरुद्ध माजी आमदार राजन पाटील गट अशा हाय व्होल्टेज लढती होत आहेत. 13 ग्रामपंचायती यापूर्वीच बिनविरोध झाल्या आहेत. आमदार यशवंत माने यांनी गेल्या वर्षभरापासून केलेल्या विविध विकासकामांचा फायदा माजी आमदार राजन पाटील गटाला होण्याची शक्यता आहे तर विजयराज डोंगरे यांनीही तालुक्याच्या विकासासाठी कोट्यवधीचा निधी दिला आहे, त्यामुळे त्याचाही फायदा त्यांच्या गटाला होणार आहे.
मोहोळ (सोलापूर) : मोहोळ तालुक्यातील होऊ घातलेल्या 63 ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात आला असून, बहुतांश गावांत राष्ट्रवादीच्याच दोन गटांत लढती होत आहेत, तर काही गावांत सभापती विजयराज डोंगरे गट विरुद्ध माजी आमदार राजन पाटील गट अशा हाय व्होल्टेज लढती होत आहेत. 13 ग्रामपंचायती यापूर्वीच बिनविरोध झाल्या आहेत. आमदार यशवंत माने यांनी गेल्या वर्षभरापासून केलेल्या विविध विकासकामांचा फायदा माजी आमदार राजन पाटील गटाला होण्याची शक्यता आहे तर विजयराज डोंगरे यांनीही तालुक्याच्या विकासासाठी कोट्यवधीचा निधी दिला आहे, त्यामुळे त्याचाही फायदा त्यांच्या गटाला होणार आहे.
तालुक्यात 63 ग्रामपंचायतींच्या पंचवार्षिक निवडणुकीची प्रक्रिया सुरू आहे. अनेक गावात स्थानिक आघाड्या स्थापन करून एकमेकांच्या विरोधात गट उभे ठाकले आहेत. तालुक्यातील शेटफळ, टाकळी सिकंदर, पाटकुल, कुरूल, बेगमपूर, आष्टी, लांबोटी, सावळेश्वर, कामती, नरखेड या ग्रामपंचायतींच्या निवडणुकांकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. शेटफळ येथे सभापती विजयराज डोंगरे विरुद्ध राजन पाटील गट, लांबोटी येथे जिल्हा परिषद सदस्य तानाजी खताळ विरुद्ध दूध संघाचे माजी संचालक सज्जन पाटील गट अशी लढत होत आहे. पाटकुल येथे आंदोलन फेम व जनहित शेतकरी संघटनेचे नेते प्रभाकर देशमुख विरुद्ध राष्ट्रवादी अशी लढत होत आहे. पेनूर येथे माजी उपसभापती मानाजी माने, जिल्हा तालीम संघाचे सर्जेराव चवरे, सांगोल्याचे माजी आमदार गणपतराव देशमुख यांचे चिरंजीव पोपटराव देशमुख विरुद्ध राजन पाटील गट अशी लढत होत आहे. नरखेड येथे जिल्हा राष्ट्रवादीचे कार्यकारी अध्यक्ष उमेश पाटील गट विरुद्ध राजन पाटील गट अशी लढत होत आहे. सावळेश्वर येथे माजी सभापती समता गावडे विरुद्ध राष्ट्रवादीचे धनंजय गावडे अशी लढत होत आहे. त्यामुळे माजी खासदार धनंजय महाडिक, विजयराज डोंगरे, उमेश पाटील, तानाजी खताळ, प्रभाकर देशमुख, मानाजी माने, जिल्हा दूध संघाचे दीपक माळी, कुरूलचे जालिंदर लांडे, टाकळी सिकंदर येथील भाजपचे तालुकाध्यक्ष सुनील चव्हाण, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष प्रकाश चवरे यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहेत.
शहराप्रमाणेच आता ग्रामीण भागातही प्रचार रॅलीचे फॅड सुरू झाले आहे. होम टू होम प्रचाराने वेग घेतला आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गावोगावी दारूचा महापूर आला आहे, तर ढाब्यांवर मांसाहारी जेवणावळी सुरू आहेत.
या निवडणुकीतील वैशिष्ट्ये
गावोगावचे युवक मोठ्या संख्येने ग्रामपंचायत निवडणुकीत सहभागी झाले आहेत. आता आमच्याकडे ग्रामपंचायतीची सूत्रे सोपवा, अशी मागणी जोर धरत आहे. शासनाचा येणारा विकास निधी हा ग्रामपंचायतीच्या नावावर येत असल्याने ग्रामपंचायतीला मोठे महत्त्व प्राप्त झाले आहे .या ग्रामपंचायतीच्या निवडणूक निकालावरच जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीची रणनीती ठरणार आहे. ग्रामपंचायत निवडणुकीनंतरच सरपंचपदाचे आरक्षण सोडत असल्याने ग्रामपंचायत निवडणुकीतील चुरस कमी झाली आहे. तालुक्यातील अनेक गावांत वीज, पाणी, रस्ते हे प्रश्न कायमच आहेत. त्यावर व विकासाच्या मुद्द्यावर कोणीच बोलायला तयार नाही. केवळ सत्ताधाऱ्यांनी पाच वर्षांत गावासाठी काय केले यांची मापे काढण्यात विरोधक दंग आहेत. तालुक्यात भीमा परिवाराचीही ताकद मोठी आहे. स्थानिक पातळीवर पक्षभेद विसरून एकमेकांना मदत करण्याचे चित्र काही ठिकाणी दिसत आहे. गेल्या निवडणुकीत बहुतांश ग्रामपंचायतींवर राष्ट्रवादीचा वरचष्मा होता; मात्र चालू निवडणुकीतील समीकरणे वेगळी आहेत.
पार्टी प्रमुख व उमेदवारांची दमछाक
निवडणूक प्रचारादरम्यान कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मास्क, सॅनिटायझर व सुरक्षित अंतर याचा उमेदवार व मतदारांना विसर पडला आहे. निवडणुका बिनविरोध केल्या तर लाखोंच्या निधीच्या विविध संस्था, वैयक्तिक समाजसेवक व लोकप्रतिनिधी यांनी केलेल्या घोषणांकडे दुर्लक्ष झाल्याचे चित्र आहे. प्रचारासाठी गेल्यावर अनेक अडचणी सोडविता सोडविता पार्टी प्रमुखाची व उमेदवारांची दमछाक होताना दिसत आहे.
ठळक...
संपादन : श्रीनिवास दुध्याल