"सकाळ'चा पाठपुरावा : हिप्परगा तलाव होणार पर्यटन केंद्र म्हणून विकसित

अरविंद मोटे 
Monday, 31 August 2020

हिप्परगा येथील हा नजराणा अनुभवण्यासाठी स्वत: जिल्हाधिकारी शंभरकर यांनी सर्व जलाशय परिसर नजरेखालून घातला. या ठिकाणी पर्यटनाला चालना दिली तर स्थानिकांना रोजगार तर मिळेलच पण सोलापूरचे नाव जगाच्या नकाशावर सर्वोत्कृष्ट पक्षी निरीक्षण स्थळ म्हणून कोरले जाईल. यासाठी तलावाला ऊर्जितावस्था प्राप्त व्हावी, यासाठी "सकाळ'ने सातत्याने पाठपुरावा केला आहे. 

सोलापूर : जगभरातील पाहुण्या पक्ष्यांचे आवडते ठिकाण हिप्परगा तलाव. शुद्ध पाण्याचा शांत जलाशय, जलाशयाचा विस्तीर्ण भूभाग व प्रदूषणविरहित पाणी यामुळे सतत नाना पक्ष्यांची वर्दळ. शहरापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या या तलावाकडे मात्र आजवर सर्वांचे दुर्लक्ष. पायाभूत सुविधा दिल्या तर जगातील पक्षीप्रेमींना हा तलाव पक्षी निरीक्षणासाठी तर खुणावेलच, शिवाय सोलापूरकरांनाही मोकळा श्‍वास घेण्यासाठी, अगदी दहा मिनिटांच्या अंतरावर हक्काचं ठिकाण व पर्यटन केंद्र म्हणून विकसित होईल. यासाठी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी पहिले पाऊल उचलले असून रविवारी भल्या सकाळी तलावाची पाहणी केली. 

रविवारी भल्या सकाळी जिल्हाधिकारी शंभरकर यांच्या गाडीने एकरुख तलावाच्या दिशेने धाव घेतली. तलावाच्या बॅकवॉटरपासून दूरवर गाड्यांचा ताफा थांबला. मुक्त विहार करणाऱ्या पक्ष्यांना कोणताही अडसर होणार नाही इतक्‍या दूरवर गाडी सोडून पावसाने ओल्या झालेल्या आडवाटेने जलाशयाचा किनारा गाठला. पक्ष्यांचा किलबिलाट सुरूच होता. अधूनमधून सूरमाऱ्या, बगळा, खाटीक, करकोचा हे पक्षी दर्शन देत होते. पक्षीप्रेमी डॉ. व्यंकटेश मेतन एकेका पक्ष्याची ओळख सांगत होते. मध्येच दुर्बिणीतून काठावर मुक्त विहार करणाऱ्या फ्लेमिंगोची रुबाबदार चाल पाहावी तर कुठे उंच भराऱ्या घेणारे पक्षी, तर कुठे तप घालत भक्ष्याच्या प्रतीक्षेतील शुभ्र बगळा पाहावा, असा सुंदर प्रसंग. 

 

सकाळी नुकताच सूर्यरथ वर चढताना अणि अजून त्याची उन्हाची दाहकता सुरू होण्यापूर्वी नानाविध पक्ष्यांचा तो मुक्त विहार अनुभवणे म्हणजे पक्षीप्रेमींसाठी स्वर्गसुखच. निसर्गाने सोलापूरला काय दिले, असे विचारले तर पक्षीवैभव दिले असं सांगण्याजोगा हा ठेवा आहे. हिप्परगा येथील हा नजराणा अनुभवण्यासाठी स्वत: जिल्हाधिकारी शंभरकर यांनी सर्व जलाशय परिसर नजरेखालून घातला. या ठिकाणी पर्यटनाला चालना दिली तर स्थानिकांना रोजगार तर मिळेलच पण सोलापूरचे नाव जगाच्या नकाशावर सर्वोत्कृष्ट पक्षी निरीक्षण स्थळ म्हणून कोरले जाईल. यासाठी तलावाला ऊर्जितावस्था प्राप्त व्हावी, यासाठी "सकाळ'ने सातत्याने पाठपुरावा केला आहे. 

"सकाळ'चे सहयोगी संपादक अभय दिवाणजी यांनी हिप्परगा तलावाच्या पर्यटन विकासाबाबत भूमिका मांडली. या वेळी डॉ. व्यंकटेश मेतन, निवृत्त उपअभियंता प्रल्हाद कांबळे, विमानतळ प्राधिकरणाचे व्यवस्थापक सज्जन निचळ, अधीक्षक अभियंता साळे, कार्यकारी अभियंता वाडकर, उपअभियंता प्रकाश बाबा, सिद्धाराम चाकोते उपस्थित होते. 

या वेळी जिल्हाधिकारी शंभरकर म्हणाले, ब्रिटिशकालीन एकरुख तलावाला पक्षी निरीक्षण व पर्यटन केंद्र म्हणून विकसित करता येईल. या अत्यंत निसर्गरम्य परिसरात भारतात कुठेही न आढळणारे पक्षी आढळतात. स्थलातंरीत पक्षी येतात. पूर्वी येथे सुंदर बाग, मिनी वृदांवन होते. त्याची निगा राखली गेलेली नाही. शहरापासून अत्यंत जवळ असल्याने या तलावास निसर्गात रममाण होता येईल, असे ठिकाण तयार करता येईल. यासाठी पालकमंत्र्यांशी चर्चा करून योग्य ते पाऊल उचलले जाईल. 

लाभक्षेत्र विकास प्रधिकरणाचे अधीक्षक अभियंता व प्रशासक धीरज साळे म्हणाले, हा ब्रिटिशकालीन तलाव असून येथे भरपूर जमीन आहे. या जमिनीचा वापर करून पर्यटन केंद्र तयार करता येईल. बोटिंगची व्यवस्था करता येते. कारंबा येथे पंपहाउस पूर्ण होताच येथील पाण्याची पातळीही वाढेल. दक्षिण सोलापूर तालुक्‍यातील क्षेत्र, अक्कलकोट तालुक्‍यातील क्षेत्र, बोरी धरणात पाणी येथूनच जाणार असल्याने या तलावाचा वापर पर्यटन केंद्र म्हणून करता येईल. 

उजनी कालवा, विभाग क्रमांक आठचे उपअभियंता रमेश वाडकर म्हणाले, शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावात कायमस्वरूपी पाणी राहणार आहे. दुष्काळ असला तरी उजनीतून पाणीपुरवठा होणार असल्याने या तलावात कायमस्वरूपी पाणी राहणार आहे. यासाठी उजनीच्या मूळ प्रकल्पात पाणी आरक्षित आहे. 

पक्षीप्रेमी डॉ. व्यंकटेश मेतन म्हणाले, पूर्वी येथे मिनी वृंदावन होते. अतिशय निसर्गरम्य ठिकाण असून पक्षीप्रेमींना पक्षी निरीक्षणासाठी हक्काचे व आवडीचे स्थळ आहे. दुर्लक्षित स्थळाला योग्य पद्धतीने जगासमोर आणले तर जगभरातील पक्षीप्रेमी सोलापूरकडे आकर्षित होतील. 

माजी नगरसेवक सिद्धाराम चाकोते म्हणाले, लोकांना रोजगार मिळण्यासाठी व सोलापूरच्या सौंदर्यात भर पडण्यासाठी या ठिकाणी निसर्ग पर्यटन केंद्र विकसित व्हावे. स्थानिकांना रोजगार उपलब्ध होईल यासाठी लवकरात लवकर या ठिकाणचा विकास करावा. त्यासाठीचा पाठपुरावा आम्ही नक्‍की करू. 

जलसंपदाचे निवृत्त अपअभियंता प्रल्हाद कांबळे म्हणाले, हिप्परगा तलाव हा ब्रिटिशकालीन असून याचे संवर्धन करून हे वैभव जतन करावे. तलावात नौकानयन झाले तर धार्मिक पर्यटनासाठी येणाऱ्या पर्यटकांची पावले येथे नक्की वळतील. जिल्हाधिकारी शंभरकर यांनी मनावर घेतल्याने नक्कीच या तलावाला पुनर्वैभव मिळेल. 

"सकाळ'चा पाठपुरावा 
"सकाळ'च्या माध्यमातून या तलावाच्या दुरवस्थेकडे सातत्याने प्रकाश टाकण्यात आला. येथील पक्षीवैभव सतत वाचकांसमोर मांडण्यात आले. तलावाच्या सौंदर्यवृद्धीसाठी "सकाळ'ने नेहमीच वाचकांमध्ये जागृती केली. हा नैसर्गिक ठेवा पुढील पिढीकडे योग्य पद्धतीने सोपवावा, टिकावा यासाठी सतत पाठपुरावा केला. "सकाळ'च्या पाठपुराव्याने धर्मवीर संभाजी तलावाच्या सुशोभीकरणाची मुहूर्तमेढ रोवली. त्यानंतर शहराजवळील हिप्परगा तलावासाठी आता पहिले पाऊल उचलले गेले आहे. 

तलाव सुशोभीकरण का? 

  • स्थानिकांसाठी रोजगार निर्मिती व सोलापूरच्या वैभवात भर 
  • तुळजापूर, अक्कलकोट या स्थळांना भेटी देणारा पर्यटक शहरात थांबेल 
  • तलाव, विश्रामगृह व मोकळ्या जागेचा सदुपयोग 
  • अतिक्रमण थांबेल, तलाव परिसर स्वच्छ होईल 
  • संपादन : श्रीनिवास दुध्याल


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Hipparga Lake will be developed as a tourist destination due to the daily Sakal