घरगूती गारमेंट कामगारांना घरीच कामे करण्याची परवानगी हवी

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 23 मे 2020

शहरात गारमेंटचे लहान-मोठे कारखाने मोठ्या प्रमाणात आहेत. या उद्योगातील जवळपास 80 टक्के कामगार हे नवीन विडी घरकुल, जुने विडी घरकुल व इतर परिसरातील असून, ते घरातच कपडे शिवायचे काम करतात. कारखान्यात येऊन काम करणाऱ्यांची संख्या 20 टक्के आहे. याप्रमाणे शहरात जवळपास दहा हजार कामगार गारमेंट उद्योगावर अवलंबून आहेत.

सोलापूर: अक्कलकोट एमआयडीसी व शहरातील काही ठिकाणी गारमेंट उद्योग विस्तारले आहे. मात्र लॉकडाउनमुळे हा उद्योग सध्या बंद असल्याने मालक व कामगारांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. हे नुकसान टाळण्यासाठी प्रशासनाने गारमेंट कारखाने दररोज चार तास सुरू ठेवण्याची परवानगी दिल्यास घरगुती कामगारांना रोजगाराची संधी मिळेल. 

हेही वाचाः दुकाने सुरु करण्याच्या मागणीसह व्यापारी महापालिकेत 

शहरात गारमेंटचे लहान-मोठे कारखाने मोठ्या प्रमाणात आहेत. या उद्योगातील जवळपास 80 टक्के कामगार हे नवीन विडी घरकुल, जुने विडी घरकुल व इतर परिसरातील असून, ते घरातच कपडे शिवायचे काम करतात. कारखान्यात येऊन काम करणाऱ्यांची संख्या 20 टक्के आहे. याप्रमाणे शहरात जवळपास दहा हजार कामगार गारमेंट उद्योगावर अवलंबून आहेत. मात्र सध्या दोन महिन्यांपासून सर्व कारखाने बंद आहेत. आतापर्यंत कामगारांना पगार देण्याचा प्रयत्न कारखानदारांनी केला आहे. मात्र यापुढे कामगारांना बसून पगार देणे उत्पादकांना अवघड जाणार आहे. कारण, उत्पादकसुद्धा कामकाज बंद राहिल्याने अनेक प्रकारच्या संकटात सापडलेले आहेत. त्यामुळे कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधक उपाय म्हणून शासनातर्फे सावधगिरी बाळगण्यासाठी ज्या सुरक्षा नियमांचे पालन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे, त्याचे पूर्ण पालन उत्पादक करणार असून, गारमेंट उद्योग दररोज किमान चार तास चालू करण्यास प्रशासनाने परवानगी द्यावी, अशी मागणी श्री. कोचर यांनी प्रशासनाला केली आहे. 

हेही वाचाः लालपरी अडकली रेडझोनमध्ये 

अनेक कारखान्यात कामगार प्रत्यक्षात येऊन काम करत नाहीत. त्यांचे कामगार कारखान्यात कटिंग केलेले सुटे कापड आपापल्या घरात नेऊन शिवून आणतात. त्यांना काम देण्यासाठी कारखाने सकाळी चार तास सुरू केल्यास कारखान्यात कटिंग केलेले कापड कामगार आपापल्या घरी घेऊन जातील व काम पूर्ण झाल्यावर कारखान्यात आणून जमा करतील. कारखान्यात सोशल डिस्टन्सिंगचे पालन करून कापड कटिंग व पॅकिंगची कामे केली जातील. यामुळे कोरोनाचा संसर्ग टाळला जाईल व उत्पादक व कामगारांचे हित साधले जाईल. 

त्यांना रोजगार तरी सूरू होईल 
प्रशासनाच्या नियमावलीनुसार छोटे उद्योग व लहान गारमेंट कारखानदार कामगारांना कारखान्यात 24 तास ठेवू शकत नाहीत. परंतु ये-जा करून कामगार काम करू इच्छितात. कित्येक कामगार आपापल्या घरी कामे घेऊन जाऊन शिलाई करून आणून देतात. त्यासाठी नियोजन होऊ शकेल. 
- राजेंद्र कोचर, सचिव, श्री सोलापूर रेडिमेड गारमेंट असोसिएशन 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: household garment workers demand permission to work at home