पतीने केली पत्नी व सासरच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या ! 

दत्तात्रय खंडागळे 
Wednesday, 4 November 2020

पोलिसात केलेली तक्रार मिटविण्यासाठी 10 लाख रुपयांची मागणी करून पत्नीने तिच्या माहेरच्या लोकांच्या सहकार्याने पतीला व मुलीला जिवे मारण्याची धमकी दिली. सततच्या पैशाच्या मागणीला व पत्नी, सासू, सासरा, मेहुणा व पत्नीचा मामा यांच्या त्रासाला कंटाळून सरगरवाडी (नाझरे, ता. सांगोला) येथील एकाने लिंबाच्या झाडाला गळफास लावून घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली.

सांगोला (सोलापूर) : पोलिसात केलेली तक्रार मिटविण्यासाठी 10 लाख रुपयांची मागणी करून पत्नीने तिच्या माहेरच्या लोकांच्या सहकार्याने पतीला व मुलीला जिवे मारण्याची धमकी दिली. सततच्या पैशाच्या मागणीला व पत्नी, सासू, सासरा, मेहुणा व पत्नीचा मामा यांच्या त्रासाला कंटाळून सरगरवाडी (नाझरे, ता. सांगोला) येथील एकाने लिंबाच्या झाडाला गळफास लावून घेऊन आत्महत्या केल्याची घटना 2 नोव्हेंबर रोजी साडेआठ वाजता घडली. 

स्वप्नील उत्तम शिराळे (वय 36, रा. सरगरवाडी, नाझरे, ता. सांगोला) याची पत्नी पूजा शिरदाळे, सासू कस्तुराबाई बुरकुल, सासरा मल्लिकार्जुन बुरकुल, मेव्हणा तुकाराम बुरकुल (सर्वजण रा. आंधळगाव, ता. मंगळवेढा) व पत्नीचा मामा चंदू पाटील (रा. धर्मगाव, ता. मंगळवेढा) हे वारंवार स्वप्नील यास धमकी देत होते. ते यापूर्वी दाखल केलेल्या केसेस मिटवून घेण्यासाठी स्वप्नील यांच्याकडे 10 लाख रुपये आणून दे, असा तगादा लावला होता. पैसे नाही दिले तर तुला व तुझ्या मुलीला जिवे मारू, अशी धमकी देत होते. 

स्वप्नील याने पत्नी, सासू, सासरा, मेव्हणा व पत्नीचा मामा यांच्या त्रासाला कंटाळून सोमवारी (ता. 2) सकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास शेतातील लिंबाच्या झाडाला गळफास लावून घेऊन आत्महत्या केली. तत्पूर्वी मयताने हा मेसेज सोशल मीडियावरून स्वतःची आई व त्याच्या मित्राच्या मोबाईलवर पाठविला. वरील लोक त्रास देत असल्याची माहितीही त्याद्वारे दिली. याबाबत मयताचा भाऊ प्रकाश शिरदाळे (रा. सरगरवाडी, नाझरे, ता. सांगोला) याने सांगोला पोलिसांत फिर्याद दिली आहे. यावरून पोलिसांनी पत्नी, सासू, सासरा, मेव्हणा व पत्नीचा मामा यांच्याविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या कारणावरून गुन्हा दाखल केला आहे. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल 

महाराष्ट्र 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Husband commits suicide due to harassment of wife and father-in-law