लाल परी लॉकडाउनपासून आजारी; सोलापूर विभागाचे प्रतिदिन उत्पन्न आले 81 लाखांवरून एक लाखावर 

ST
ST

सोलापूर : कोरोना तुम्हाला होईल की नाही, हे सांगता येणे कठीण आहे. कोरोना रोखण्यासाठी पुकारण्यात येणाऱ्या लॉकडाउनचा फटका मात्र समाजातील प्रत्येक घटकाला बसणार, हे ठामपणे सांगता येईल. सर्वसामान्यांच्या हक्काची असलेली लाल परी लॉकडाउनपासून आर्थिकदृष्ट्या आजारी पडली आहे. लॉकडाउनपूर्वी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या सोलापूर विभागाचे दररोज सरासरी उत्पन्न 81 लाखांच्या घरात होते. आज सोलापूरच्या एसटीला दररोज सरासरी एक लाख रुपये मिळत आहेत. आजारी पडलेली लाल परी केव्हा सुरळित होणार का, या प्रश्‍नावरच हजारो जणांची रोजीरोटी अवलंबून आहे. 

कोरोना संकटाच्या काळात प्रवाशांनी एसटीकडे पाठ फिरविली म्हणून एसटीने स्वत:मध्ये बदल करून घेतला. प्रवाशांसाठी असलेले सीट काढण्यात आले. खिडक्‍या झाकण्यासाठी बसवर ताडपत्री लावून मागील बाजूस मोठा दरवाजा तयार करण्यात आला. प्रवाशांसाठी धावणारी बस आता मालवाहतुकीसाठी धावत आहे. सोलापूर विभागातील जवळपास 50 बसचे रूपांतर मालट्रकमध्ये झाले आहे. जुलै महिन्यात माल वाहतुकीने एसटीला 11 लाख 77 हजारांचे उत्पन्न मिळवून दिले आहे. सध्या एसटीची जिल्ह्यातल्या जिल्ह्यात प्रवासी वाहतूक सुरू आहे. लवकरच एसटी जिल्ह्याबाहेर धावण्याची शक्‍यता आहे. या आदेशाची वाट महामंडळातील सर्वचजण पाहात आहेत. या आदेशानंतरच एसटी पूर्वपदावर येण्यास सुरवात होणार आहे. 

सोलापूर विभाग नियंत्रक रमाकांत गायकवाड म्हणाले, कोरोना रोखण्यासाठी आवश्‍यक असलेल्या सर्व नियमांचे पालन एसटीने केले. एसटीने या कालावधीत कोणतीही दरवाढ केली नाही. एका सीटवर एकच व्यक्ती हा नियम पाळला. या नियमाचे पालन करत असताना त्या प्रवाशाकडून एकाच व्यक्तीच्या तिकिटाचे पैसे आकारले जात आहेत. एसटी सर्वसामान्यांच्या हक्काचे साधन आहे. "प्रवाशांच्या सेवेसाठी' हे एसटीचे ब्रीदवाक्‍य आहे. कोरोनाच्या संकटातही एसटी सर्वसामान्यांच्या मदतीला धावत आहे. आता एसटीला गरज आहे सर्वसामान्यांच्या मदतीची आणि सहकार्याची. 

अशी असेल भविष्यातील एसटी 
दोघांच्या सीटवर लहान मुलगा असेल तर जरा ऍडजेस्ट करा, सरकून बसा, लेकराला मांडीवर घ्या, हा संवाद येत्या काळात बंद होणार आहे. एका सीटवर एकच प्रवासी हा नियम कोरोना जाईपर्यंत तरी कायम राहणार आहे. एसटीमध्ये स्टॅंडिंग प्रवास, ड्रायव्हरच्या केबिनमध्ये प्रवासी, पायऱ्यांवर प्रवासी या सर्व गोष्टी देखील कोरोनाचा नायनाट होईपर्यंत तरी बंदच असणार आहे. 

व्यापारी, शेतकऱ्यांना विश्‍वासाची मालवाहतूक 
उत्पन्नापेक्षा तोटा अधिक असूनही प्रवाशांसाठी धावणारी एसटी कोरोना आणि लॉकडाउनमध्ये प्रचंड तोट्यात गेली. कोरोनाच्या दहशतीत प्रवाशांनी एसटीकडे पाठ फिरविली, परंतु कर्मचाऱ्यांची रोजीरोटी टिकविण्यासाठी एसटीने माल वाहतुकीत पदार्पण केले. सोलापुरातून मुंबई, पुणे, कोल्हापूर, नाशिक यासह महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात एसटीने लॉकडाउनमध्ये माल वाहतुकीची सेवा दिली. खासगी ट्रान्स्पोर्टने माल पाठविणाऱ्यांना शेवटपर्यंत धाकधूक असते. एसटीने व्यापारी आणि शेतकऱ्यांना हक्काची व विश्‍वासाची मालवाहतूक सेवा उपलब्ध करून दिली आहे. खासगी ट्रान्स्पोर्टच्या तुलनेत एसटीच्या माल वाहतुकीचे दर कमी असून मालवाहतूक सेवा आता कायमस्वरूपी सुरू राहणार असल्याची माहिती सोलापूरचे विभागीय वाहतूक अधिकारी विलास राठोड यांनी दिली. 

लॉकडाउनमध्ये एसटीचा असा झाला प्रवास 

  • एसटी पूर्णत: बंद : 22 मार्च ते 22 मेपर्यंत 
  • 23 मेपासून : एसटीची 5 टक्के वाहतूक सुरू 
  • स्थानिक लॉकडाउनचा फटका : 16 ते 26 जुलै : एसटी पुन्हा ठप्प 
  • 1 ऑगस्टपासून : एसटीची 10 टक्के वाहतूक सुरू 
  • सोलापूर विभागातील 750 पैकी 55 बस सुरू 
  • एसटीवर अवलंबून 4500 कर्मचाऱ्यांचे कुटुंब 
  • वेतन व पेन्शनसाठी दरमहा लागतात 12 कोटी रुपये 
  • राज्य सरकारच्या मदतीतून सोलापूरला मिळाले 17 कोटी रुपये 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com