चीनमध्ये अडकलेले भारतीय अधिकारी-कर्मचारी लवकरच मायदेशी परतणार : आमदार मोहिते-पाटील 

Navy
Navy

नातेपुते (सोलापूर) : गेल्या पाच महिन्यांपासून चीनमध्ये अडकलेल्या 23 भारतीय अधिकारी व कर्मचाऱ्यांना दिलासा मिळाला असून, ते येत्या आठ दिवसांत मायदेशी परततील, असा विश्वास आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील यांनी व्यक्त केला. चीनमध्ये अडकून पडलेल्यांमध्ये पंढरपूरचे सुपुत्र वीरेंद्रसिंह भोसले यांचा देखील समावेश आहे. 

ग्रेट ईस्टर्न शिपिंग कंपनी या मुंबई येथील भारतीय मर्चंट नेव्ही कंपनीचे जहाज ऑस्ट्रेलिया येथून कोळसा सप्लाय करण्यासाठी चीन देशातील बंदराजवळ गेल्यानंतर चीन सरकारने कोळसा स्वीकारण्यास नकार दिला होता. त्यामुळे तब्बल गेल्या पाच महिन्यांपासून हे जहाज व या जहाजावर कार्यरत असलेले भारतातील 23 अधिकारी व कर्मचारी अडकून पडले आहेत. यात पंढरपूरचे सुपुत्र वीरेंद्रसिंह भोसले हे देखील आहेत. त्यांच्या जवळचा औषध- गोळ्यांचा साठा संपत आलेला असल्याने अधिकारी व कर्मचाऱ्यांची मानसिकता देखील ढासळत चाललेली होती. या सर्वांची सुटका करण्यासाठी वीरशैव सभेचे पंढरपूर शहराध्यक्ष विशाल आर्वे यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व आमदार रणजितसिंह मोहिते- पाटील यांची प्रत्यक्ष भेट घेऊन निवेदन दिले व या सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांची सोडवणूक करावी, अशी विनंती केली होती. 

आमदार रणजितसिंह मोहिते- पाटील यांनी जी20, जी7 चे शेरफा सुरेश प्रभू यांच्याशी दूरध्वनीद्वारे संपर्क साधत न्याय मिळवून देण्याची विनंती केली होती. यावर तत्काळ सुरेश प्रभू यांनी राष्ट्रीय - आंतरराष्ट्रीय पातळीवर संपर्क साधत सूत्रे हलविली होती. काही संबंधित अधिकाऱ्यांशीही आमदार रणजितसिंहांनी दूरध्वनीवरून संपर्क साधत प्रकरणाचे गांभीर्य लक्षात आणून दिले होते. चार दिवस यासाठी त्यांनी प्रयत्नांची पराकाष्ठा केली आणि शेवटी मिनिस्टर ऑफ एक्‍स्टर्नरी कार्यालयाकडून जहाज कंपनीचे अधिकारी यांनी त्वरित कागदपत्रे घेऊन चीनमध्ये जात आपले जहाज व जहाजेवर कार्यरत असलेले 23 अधिकारी, कर्मचारी यांना भारतात घेऊन येण्याची ऑर्डर इश्‍यू करण्यात आल्याचे कळविले होते. 

भारतीय अधिकारी, कर्मचारी यांची आता अधिक गैरसोय होऊ नये याकरिता चीनमधील भारतीय दूतावासात त्यांना हलवण्याची देखील सोय करण्यात आलेली होती. 
आज जी20, जी7 चे शेरफा सुरेश प्रभू यांचे आमदार मोहिते- पाटील यांना पत्र आले. त्यामध्ये चीन दूतावासाकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाल्याचे त्यांनी नमूद केले आहे. 23 भारतीय अधिकारी व कर्मचाऱ्यांची येत्या आठवडाभरात पाठवण केली जाणार असून, ते आठवडाभरात मायदेशी परततील असे, आमदार रणजितसिंह मोहिते- पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com