esakal | मुखबोली तेलुगु जरी मनबोली मराठी (Video)
sakal

बोलून बातमी शोधा

Interaction with Budharam on the Marathi Language Day

माझ्या मराठी मातीचा 
लावा ललाटास टिळा 
हिच्या संगाते जागल्या 
दऱ्याखोऱ्यातील शिळा...

मुखबोली तेलुगु जरी मनबोली मराठी (Video)

sakal_logo
By
सुस्मिता वडतीले

सोलापूर : ज्ञानपीठ पुरस्कार विजेते कवी, लेखक, शब्द मेरुमणी वि. वा. शिरवाडकर तथा कवी कुसुमाग्रज यांचा जन्म दिवस मराठी भाषा दिन म्हणून साजरा केला जातो. याच पार्श्वभुमीवर तेलुगु भाषिक रेणुका बुधाराम यांनी ‘सकाळ’शी बोलाताना मराठीबद्दल व्यक्त केले मत... 
माझ्या मराठी मातीचा 
लावा ललाटास टिळा 
हिच्या संगाते जागल्या 
दऱ्याखोऱ्यातील शिळा... ही कविता असो किंवा 
हासरा नाचरा 
जरासा लाजरा 
सुंदर साजिरा 

श्रावण आला... ही कविता असो. लहानपणापासून कथा, कविता वाचणे, ऐकणे, गाणी-कविता गुणगुणने हा माझा जणू छंदच बानून गेला. एकेकाळी उदरनिर्वाहासाठी आलेल्या आम्हास या मायमराठीने जवळ केले आणि या मातीशी आमची नाळ जुळली गेली. 
मुखबोली तेलुगु जरी मनबोली मराठी 
देवकीच्या उदरी जन्म जरी 

यशोदेशी गळामिठी... अशी आमची स्थिती. मराठी भाषा गोड आहे. कितीही वाचन केले तरी आणखी काय वाचावे, अशी उत्कंठा वाढते. तेजस्वी साहित्यिक म्हणून कुसुमाग्रजांची ओळख आहे. साहित्य क्षेत्रातील ते मेरुमणी होत. या साहित्यसूर्याचे तेज इतके की, त्या साहित्य किरणात रसिक न्हाऊन निघतात. कुसुमाग्रज यांची साहित्य संपदा अफाट आहे. त्यांनी केलेली मराठी सेवा अप्रतिम म्हणावी लागेल. मराठी भाषा नेहमीच समृद्ध होती. समृद्ध आहे आणि समृद्ध राहणार. या ज्ञानीयाच्या भाषेला लवकरच अभिजात दर्जा प्राप्त होणार, हे निश्‍चित. 

प्रेम कुणावर करावं 
प्रेम कुणावरही करांव... असे तत्त्वज्ञान आपल्या कवितेतून सांगणारे शब्द प्रतिभास्कर म्हणजे वि. वा. शिरवाडकर. 
सोलापूर शहर हे बहुभाषिक शहर आहे. या मातीने (महाराष्ट्र) सर्वांना आपलेसे केले असून या महाराष्ट्र मातीला मानाचा मुजरा. शालेय जीवनात जेव्हापासून पाऊल टाकले तेव्हापासून मराठीची गोडी लागली. मराठीचे शब्द मनाला भावले. तेव्हापासून आजपर्यंत श्‍वास असेपर्यंत मराठीची सेवा करायची संधी मिळावी म्हणून मी त्या शारदामायीची प्रार्थना करते. कवी कुसुमाग्रज हे श्रेष्ठ दर्जाचे साहित्यिक होते. विचारवंतही होते. ज्ञानपीठ हा पुरस्कार भारतीय साहित्यातील सर्वोच्च पुरस्कार कुसुमाग्रज यांना म्हणजेच आपल्या सारख्या पुत्राला मिळणे म्हणजे ही बहुभाग्याची गोष्ट. अशा बहुआयामी व्यक्तिमत्त्वाला, मराठीच्या ध्रुवताऱ्याला, ज्येष्ठ आणि श्रेष्ठ ठरलेल्या वि. वा. शिरवाडकर तथा कवी कुसुमाग्रजांना विनम्र अभिवादन. माझ्यासारख्या पामराला त्यांच्या साहित्याविषयी लिहिणे म्हणजे फारच अवघड काम आहे. परंतु मोडकं तोडक का होईना लिहिण्याचे मराठी भाषा दिनामुळे भाग्य मिळते. एका अमराठी भाषिक लेकीला मराठी यशोदामायीने जवळ करत आशीर्वाद दिले म्हणून माय मराठीची मी फार ऋणी आहे. 
गुरुवर्य (स्व.) लक्ष्मीनारायण बोल्ली सर म्हणत असत.... 
जगणे सुंदर आहे 
मरणे सुंदर आहे 
जगण्या मरण्यामध्ये 

उरणे सुंदर आहे.... अगदी त्याप्रमाणे साहित्य क्षेत्र माझ्यासाठी सुंदर बनले असून म्हणावेस वाटते.... हे जीवन सुंदर आहे.