कल्याणराव काळेंचा प्रवेश चौथ्या पक्षात ! मात्र त्यांचे "कल्याण' कोणत्या पक्षात?

Kale
Kale

पंढरपूर (सोलापूर) : दोन साखर कारखाने, एक बॅंक, एक पतसंस्था, एक शैक्षणिक संस्थां हाताशी असून देखील आमदारकीचा मान कल्याणराव काळेंना अद्याप मिळू शकलेला नाही. दुर्दैवाने कोणत्याही एका पक्षात ते स्थिर होऊ शकलेले नाहीत. कॉंग्रेस, शिवसेना, भाजपनंतर आज (गुरुवारी) त्यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस या चौथ्या पक्षाचा झेंडा हाती घेतला आहे. शांत, संयमी प्रतिमा असलेल्या कल्याणरावांचे आता राष्ट्रवादीत तरी "कल्याण' होईल, अशी त्यांच्या समर्थकांची अपेक्षा आहे. 

माजी आमदार (कै.) औदुंबरअण्णा पाटील यांच्या नेतृत्वाखाली काम करणाऱ्या (कै.) वसंतराव काळे यांनी चंद्रभागा कारखान्याच्या उभारणीसाठी शिवसेनेत प्रवेश केला होता. त्यांच्या पश्‍चात काळे गटाचे नेतृत्व करण्याची जबाबदारी कल्याणराव यांच्यावर आली. त्यांनी अनेक वर्षे कॉंग्रेसमध्ये माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे आणि माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या नेतृत्वाखाली प्रामाणिकपणे काम केले. माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते- पाटील यांच्याशी देखील त्यांचे जिव्हाळ्याचे संबंध राहिले आहेत. कारखान्यावर को-जनरेशन, डिस्टिलरी उभा करून त्यांनी कारखान्याला प्रगतिपथावर नेले. तेवढ्यावरच न थांबता त्यांनी धाडस करून खर्डी येथे सीताराम महाराजांच्या नावाने खासगी साखर कारखाना उभा केला. परंतु दुर्दैवाने दुष्काळी परिस्थिती आणि अन्य काही कारणांमुळे हे दोन्ही कारखाने अडचणीत आले. 

2009 मध्ये त्यांनी विधानपरिषद निवडणूक लढवली परंतु दीपक साळुंखे यांनी त्यांचा पराभव केला. त्यानंतर त्यांनी 2014 मध्ये माढा विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आणि उमेदवारी मिळेल या आशेने शिवसेनेत प्रवेश केला. परंतु उमेदवारी न मिळाल्याने अवघ्या काही तासांत त्यांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र करून पुन्हा कॉंग्रेसचा झेंडा हाती घेतला होता. माढा विधानसभा मतदारसंघात 65 हजार मते मिळून देखील त्यांना बबनराव शिंदे यांच्याकडून पराभूत व्हावे लागले होते. 

राज्यात भाजपच्या नेतृत्वाखालील सरकार पुन्हा सत्तेत येईल आणि साखर कारखानदारीसाठी आवश्‍यक मदत भाजपकडून मिळेल या विचाराने त्यांनी 2019 मध्ये ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर कॉंग्रेस सोडून भाजपमध्ये प्रवेश केला होता. परंतु त्यांचा राजकीय अंदाज चुकला. त्या निवडणुकीनंतर राज्यात भाजपऐवजी महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर आले आणि कल्याणरावांनी केलेला हिशेबच चुकला. गेल्या वर्षभरात पुन्हा राज्यात सत्तांतर घडून येईल या आशेने ते भाजपमध्ये थांबले होते; परंतु सध्या राज्यात भाजपचे सरकार येण्याची चिन्हे दिसत नसल्याचे पाहून त्यांनी साखर कारखान्यांच्या अडचणी सोडवून घेण्यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात प्रवेश करण्याशिवाय पर्याय नाही, असा विचार करून त्यांनी पावले उचलली आहेत. 

आमदार भारत भालके यांच्या निधनानंतर श्री. काळे यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली काम करण्याचे संकेत दिले होते. श्री. पवार यांच्यामुळेच विठ्ठल, सहकार शिरोमणी आणि सीताराम हे कारखाने सुरू होऊ शकले आहेत, असे सांगून श्री. काळे यांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार असल्याचे अधोरेखित केले होते. फडणवीस यांच्याशी चांगले संबंध टिकवत त्यांना अडचणी सांगून कल्याणरावांनी त्यांना "बाय-बाय' केला आहे. 

साखर कारखान्यांपुढील अडचणी सुटाव्यात यासाठी आपण भाजपमध्ये गेलो होतो आणि आता त्याच कारणासाठी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करत असल्याचे कल्याणराव यांनी स्पष्ट केले आहे. आता किमान राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये तरी कल्याणरावांचे "कल्याण' व्हावे अशी त्यांच्या समर्थकांची अपेक्षा आहे. 

पंढरपूर- मंगळवेढा विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीत श्री. काळे हे काय भूमिका घेतात, याविषयी उत्सुकता निर्माण झाली होती. भगीरथ भालके यांना राष्ट्रवादीची उमेदवारी निश्‍चित झाल्यावर भाजपकडे थांबण्याऐवजी राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश करावा अशी मागणी त्यांच्या समर्थकांमधून होत होती. दुसरीकडे काळे यांनी भाजपमध्येच राहावे यासाठी भाजपमधील नेते प्रयत्न करत होते. परंतु काळे यांनी अखेर राष्ट्रवादीत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला. 

पंढरपूर तालुक्‍यातील अनेक गावांमध्ये त्यांना मानणारे कार्यकर्ते मोठ्या संख्येने आहेत. त्या तुलनेत पंढरपूर शहरात श्री. काळे यांचा संपर्क मर्यादित आहे. परंतु मतदारसंघातील 22 गावांमध्ये मात्र त्यांचा गट सक्रिय आहे. त्यामुळे काळे यांच्या राष्ट्रवादी प्रवेशाने भगीरथ भालके यांना बळ मिळणार आहे, हे निश्‍चित. 

कल्याणरावांकडील संस्था 
भाळवणी येथील सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष, खर्डी येथील सीताराम महाराज साखर कारखान्याचे संस्थापक, सोलापूर जिल्हा कॉंग्रेसचे उपाध्यक्ष, श्रीराम शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष, निशिगंधा सहकारी बॅंकेचे अध्यक्ष अशा विविध माध्यमातून काळे यांनी चांगले काम करून दाखवले आहे. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com