करकंब ग्रामपंचायत निवडणुकीत रंगत ! एकाच घरातील तीन पिढ्या निवडणूक रिंगणात 

Karkamb_GP
Karkamb_GP

करकंब (सोलापूर) : पंढरपूर तालुक्‍यातील सर्वांत मोठ्या करकंब ग्रामपंचायत निवडणुकीत तिसऱ्या आघाडीचा बार फुसकाच निघाला असून, येथील देशमुख बंधूंमध्येच काट्याची टक्कर होणार आहे. विशेष म्हणजे, दोन्हीही देशमुख बंधूंनी आपापल्या घरातील तीन-तीन उमेदवार निवडणूक रिंगणात उतरविले आहेत. 

अर्ज काढून घेण्याच्या शेवटच्या दिवशी सोमवारी 124 पैकी तब्बल 81 जणांनी अर्ज काढून घेतल्याने आता 17 जागांसाठी 43 जणांमध्ये लढत होत आहे. विशेष म्हणजे मोठा गाजावाजा करत गाठीभेटींवर जोर दिलेल्या तिसऱ्या आघाडीने आपले सर्व अर्ज काढून घेतले असून, काही ठिकाणी अपक्षांनी डोके वर काढले आहे. मारुती देशमुख आणि नरसाप्पा देशमुख या सख्ख्या भावांच्या दोन प्रमुख गटांत ही निवडणूक होत आहे. त्यातच सरपंचपदाचे आरक्षण महिला सर्वसाधारणसाठी निघण्याची शक्‍यता गृहीत धरून या दोन्ही बंधूंनी आपापल्या घरातील महिलांना निवडणूक रिंगणात उतरविले आहे. 

विशेष म्हणजे माजी सरपंच मारुती देशमुख हे स्वतःसह सून बबिता देशमुख आणि नातू महेश देशमुख यांच्यासह निवडणूक रिंगणात उतरले आहेत. त्यामुळे ग्रामपंचायतीच्या निवडणुकीमध्ये पहिल्यांदाच तीन पिढ्या एकाच वेळी रिंगणात उतरल्याचे पाहायला मिळत आहे. दुसरीकडे, नरसाप्पा देशमुख गटातून त्यांचे पुत्र विद्यमान सरपंच आदिनाथ देशमुख आणि दोन सुना वैशाली देशमुख व कल्पना देशमुख असे तिघेजण निवडणूक लढवीत आहेत. साहजिकच सरपंचपद आपल्याच घरात राहण्याच्या दृष्टीने दोन्ही पक्षप्रमुखांचा प्रयत्न आहे. 

प्रभाग एकमध्ये विद्यमान पंचायत समिती सदस्य राहुल पुरवत आणि अभिषेक पुरवत या काका-पुतण्यामध्ये लढत होत आहे. येथेही सरपंचपदाचे आरक्षण इतर मागासवर्ग पुरुष गटासाठी निघाले तर सरपंचपदाची हीच सुवर्णसंधी असल्याचा विचार करून राहुल पुरवत यांनी कंबर कसली आहे. 

लक्षवेधक लढती 
विद्यमान सरपंच आदिनाथ देशमुख आणि माजी जिल्हा परिषद सदस्य बाळासाहेब देशमुख यांचे पुत्र महेश देशमुख या काका-पुतण्यामध्ये प्रभाग दोनमध्ये लढत होत आहे. प्रभाग चारमधून मारुती देशमुख यांची सून बबिता देशमुख आणि नरसाप्पा देशमुख यांची सून कल्पना देशमुख या सख्ख्या चुलत जावा-जावांमध्ये लढत होत आहे. प्रभाग एकमधून राहुल पुरवत आणि अभिषेक पुरवत या काका-पुतण्यामध्ये लढत होत आहे तर प्रभाग तीनमधून तृप्ती पांढरे (देवकते) - तेजमाला पांढरे या नणंद - भावजया समोरासमोर उभ्या ठाकल्या आहेत. बापूराव शिंदे - महेंद्र शिंदे, रेखा गायकवाड - सीमा गायकवाड, लुमावती खारे - बाळूबाई खारे, सतीश माने - तुकाराम माने, दिलीप व्यवहारे - महादेव व्यवहारे व मनीषा शिंगटे - ज्योती शिंगटे या जवळच्या भावकीतील लढती लक्षवेधक ठरणार आहेत. एकंदरीतच, करकंब ग्रामपंचायतीचे निवणुकीचे चित्र स्पष्ट झाले असून, आता नात्या - नात्यामधील आणि भाव-भावकीतील लढतीमुळे चांगलीच रंगत निर्माण झाली आहे. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com