Gram Panchayat Results : करमाळ्यात नारायण पाटलांची आघाडी; आमदार शिंदे गटाचा विस्तार ! 

KarmalaGP
KarmalaGP

करमाळा (सोलापूर) : करमाळा पंचायत समितीचे शिवसेनेचे सभापती गहिनीनाथ ननवरे यांच्या देवळाली गावात बागल गटाची सत्ता, तर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष संतोष वारे यांचा जातेगाव ग्रामपंचायतीत पराभव झाला. देवळालीत 13 पैकी सात जागा बागल गटाला मिळाल्या, तर ननवरे यांना सहा जागांवर समाधान मानावे लागले. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष संतोष वारे यांना पराभवाला सामोरे जावे लागले. 

करमाळा तालुक्‍यातील 51 ग्रामपंचायत निवडणूक निकालात शिवसेनेचे माजी आमदार नारायण पाटील-बागल यांनी आघाडी घेतली असली, तर महत्त्वाच्या उमरड, सावडी या ग्रामपंचायतीवर विद्यमान आमदार संजय शिंदे यांनी सत्ता हस्तगत करत या ग्रामपंचायत निवडणुकीच्या माध्यमातून आपल्या गटाचा विस्तार करण्यात यश आल्याचे सिद्ध करून दाखवले आहे. 

देवळालीत बागल गटाने आपला झेंडा फडकावला आहे. देवळाली ग्रामपंचायत निवडणुकीत शिवसेनेचे आमदार नारायण पाटील गटाचे करमाळा पंचायत समीतीचे सभापती गहिनीनाथ ननवरे यांच्या नेतृत्त्वाखालील लढणाऱ्या पॅनेलचा पराभव झाला, तर युवा नेते आशीष गायकवाड यांनी सत्ता खेचून आणली. पाटील गटाचे राजू शिंदे यांनी गायकवाड यांच्याबरोबर जाण्याची घेतलेली भूमिका पाटील गटाचा पराभव होण्यास कारणीभूत ठरली. जातेगाव ग्रामपंचायतमध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष संतोष वारे यांच्याविरोधात आमदार शिंदे जगता पागल पाटील एकत्र येत संतोष वारे यांची सत्ता घालवली आहे. या ग्रामपंचायत निवडणुकीत संतोष वारे यांनी एकाकी झुंज दिली, मात्र त्यांना आपली सत्ता राखण्यात अपयश आले आहे. 9 च्या 9 जागांवर बागल- शिंदे- पाटील- जगताप गटाने विजय मिळवला आहे. 

तालुक्‍यातील चुरशीने मतदान झालेल्या जातेगाव, पोथरे, सावडी, उमरड, साडे, कुंभेज, देवळाली, झरे या ग्रामपंचायतींच्या निकालाकडे तालुक्‍याचे लक्ष लागले होते. झरे ग्रामपंचायतीवर माजी आमदार नारायण पाटील गटाचे समर्थक प्रशांत पाटील यांना सत्ता राखण्यात यश आले आहे. येथे उद्योगपती नारायण अमृळे, माजी जिल्हा परिषद सदस्य दादासाहेब गुळवे, शेतकरी संघटनेचे बाळासाहेब गायकवाड यांनी एकत्र येत पॅनेल उभा केला, मात्र त्यांना केवळ 4 जागांवर समाधान मानावे लागले. 

उमरड ग्रामपंचायतीवरील नारायण पाटील यांची सत्ता गेली असून येथे आमदार शिंदे समर्थक माजी जिल्हा परिषद सदस्य वामनराव बदे यांच्या गटाची सत्ता आली आहे. या निवडणुकीत सात जागांवर यश मिळाले असून पाटील -बागल गटाला चार जागेवर समाधान मानावे लागले आहे. 

पाटील गटाच्या विजयी उमेदवारांचा सत्कार 
शिवसेनेचे माजी आमदार नारायण पाटील गटाच्या उमेदवारांचा सत्कार करून माजी आमदार नारायण पाटील, जिल्हा परिषद अध्यक्ष अनिरुद्ध कांबळे, सभापती गहिनीनाथ ननवरे, उपमहाराष्ट्र केसरी अतुल पाटील यांनी अभिनंदन केले. 

शिंदे गटाच्या विजयी उमेदवारांचा सत्कार तानाजी झोळ, सरपंच चंद्रकांत सरडे, विलास पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. तर जगताप गटाच्या वतीने माजी आमदार जयवंतराव जगताप, युवा नेते शंभूराजे जगताप यांनी विजयी उमेदवारांचा सत्कार केला. बागल गटाच्या वतीने मकाईचे अध्यक्ष दिग्विजय बागल, बागल गटाच्या नेत्या रश्‍मी बागल, मार्गदर्शक विलासराव घुमरे यांनी विजयी उमेदवारांचे अभिनंदन केले. 

"माझ्याच गटाची सत्ता आली' 
या ग्रामपंचायत निवडणुकीत प्रत्येक गटाच्या कार्यकर्त्यांनी गावपातळीवर सोयीनुसार युत्या व आघाड्या केल्या. पाटील - बागल - शिंदे- जगताप तर काही ठिकाणी पाटील - शिंदे - जगताप- बागल, शिंदे - बागल - पाटील - जगताप अशा आघाडया व युत्या झाल्या मात्र निवडणुकीचा निकाल लागताच माझ्याच गटाची ग्रामपंचायतीवर सत्ता आली, अशा वल्गना करण्यास सुरवात केली. 

दावे - प्रतिदावे 
ग्रामपंचायत निवडणुकीचे निकाल लागताच आमदार संजय शिंदे, माजी आमदार नारायण पाटील, माजी आमदार श्‍यामल बागल, माजी आमदार जयवंतराव जगताप यांच्या कार्यकर्त्यांकडून तालुक्‍यातील ग्रामपंचायवर आमचीच सत्ता आल्याचे दावे व प्रतिदावे करण्यात येत आहेत. 

मांगी ग्रामपंचायत निवडणुकीत बागल काठावर पास 
मांगी हे माजी राज्यमंत्री कै. दिगंबरराव बागल यांचे जन्मगाव असून, या गावावर गेल्या अनेक वर्षांपासून बागल गटाची एकहाती सत्ता आहे. या ग्रामपंचायत निवडणुकीत मात्र नऊ पैकी पाच जागा मिळवत बागल गटाने आपली सत्ता कायम ठेवली असली तरी आमदार संजय शिंदे गटाने जोरदार मुसंडी मारत चार जागा मिळवल्या आहेत. शिंदे गटाचे सुजित बागल यांच्या नेतृत्वाखाली ही निवडणूक लढवली गेली. येथे माजी आमदार नारायण पाटील यांचे समर्थक देवानंद बागल यांनी सुजित बागल यांना मोलाची साथ दिली. 

जातेगाव ग्रामपंचायत निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष संतोष वारे यांचा पराभव झाला आहे. संतोष वारे यांच्याविरोधात आमदार संजय शिंदे, माजी आमदार नारायण पाटील, माजी आमदार श्‍यामल बागल, माजी आमदार जयवंतराव जगताप या सर्व गटांच्या कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन ही निवडणूक लढवली. जरी या ग्रामपंचायत निवडणुकीत संतोष वारे यांचा पराभव झाला असला तरी संतोष वारे यांच्याविरोधात नेमकी एवढी ताकद का वापरली गेली? याविषयी मात्र चर्चा रंगली आहे. 

निकालाची ठळक वैशिष्ट्ये 

  • आमदार संजय शिंदे गटाने ग्रामपंचायत सत्ता हस्तगत करत गट विस्तारण्यास केली सुरवात 
  • माजी आमदार नारायण पाटील गटाचे अस्तित्व कायम ठेवत काही ग्रामपंचायतीवर थेट तर काही ठिकाणी आघाडी युतीतून सत्ता 
  • या ग्रामपंचायत निवडणुकीत अनेक ठिकाणी पाटील -बागल विरुद्ध शिंदे -जगताप गट अशा निवडणुकीचे चित्र 
  • जगताप गटाचे कार्यकर्ते आमदार शिंदे गटासोबत अधिक सक्रिय होऊ लागल्याचे चित्र 
  • बागल गटाने म्हणावे तसे या ग्रामपंचायत निवडणुकीत लक्ष घातले नाही, तरीही कार्यकर्त्यांनी बागल यांच्या नावेच आपले अस्तित्व रेटून नेण्याचा केला प्रयत्न 
  • आतापर्यंत तालुक्‍यात पाटील विरुद्ध बागल अशा चुरशीच्या होणाऱ्या लढती देवळाली वगळता इतर ठिकाणी असे चित्र दिसले नाही 
  • या ग्रामपंचायत निवडणुकीत स्थानिक सर्वच गटांच्या पुढाऱ्यांनी गावपातळीवर सोयीनुसार युती-आघाडी करण्यावर भर दिला. याला त्या- त्या गटाच्या नेत्यांची सहमती 
  • विधानसभा निवडणुकीत नारायण पाटील यांची उमेदवारी कट करून रश्‍मी बागल यांना शिवसेनेची उमेदवारी मिळाल्यापासून एकमेकांना वैरी समजणारे बागल -पाटील गटाच्या कार्यकर्त्यांची एकमेकांविरुद्धची विरोधाची धार बोथट झाल्याचे दिसून आले 
  • विद्यमान आमदार संजय शिंदे यांच्या नावाने पॅनेल उभे राहणाऱ्या गावांच्या संख्येत मोठी वाढ 
  • राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष संतोष वारे यांची जाते वा ग्रामपंचायतीवरील सत्ता घालवण्यासाठी आमदार शिंदे - पाटील- बागल- जगताप गट एकत्र 
  • झरे ग्रामपंचायत निवडणुकीसाठी वयाच्या 90व्या वर्षी पंचायत समितीचे विलास पाटील प्रचारात आघाडीवर 
  • सालसे व जेऊरवाडी ग्रामपंचायत बिनविरोध 
  • उमरड, सावडी ग्रामपंचायतीवर शिंदे गटाची सत्ता 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com