तब्बल 32 आठवड्यांनंतर भरला केत्तूरचा आठवडा बाजार ! 

Bajar
Bajar

केत्तूर (सोलापूर) : कोरोना महामारीमुळे लागू झालेल्या लॉकडाउनमुळे बंद असलेला केत्तूर (ता. करमाळा) येथील आठवडा बाजार तब्बल 32 आठवड्यांनंतर शनिवारी (ता. 7) पुन्हा सुरू झाला. तालुक्‍यातील प्रमुख आठवडे बाजारांपैकी हा मोठा बाजार आहे. या बाजारासाठी परिसरातील 20 ते 22 गावांचा संपर्क असतो. त्यातच परिसरात दाखल झालेल्या ऊसतोड मजूर कामगारांमुळे पहिल्याच दिवशी बाजार फुल्ल झाल्याचे दिसून आले. 

लॉकडाउनच्या मोठ्या ब्रेकनंतर आठवडा बाजार सुरू होत असल्याने व हा दिवाळी सणाचा बाजार असल्याने पहिल्याच दिवशी सर्व प्रकारचे व्यापारी आवर्जून बाजारासाठी आले. दुपारनंतर बाजार फुल्ल झाला होता. कोरोनाचा संसर्ग वाढू नये यासाठी गेल्या नऊ महिन्यांपासून आठवडी बाजार बंद होता. जिल्हाधिकारी तसेच तहसीलदार यांच्या आदेशानुसार ग्रामपंचायत प्रशासनामार्फत आठवडा बाजार सुरू करण्यात आला आहे. 

आठवडे बाजार बंद असल्याने छोट्या व्यावसायिकांची मोठी गैरसोय झाली होती. लॉकडाउनमुळे बाजारपेठेत मंदीचे सावट होते. त्यामुळे शेतकरी, व्यापारी आर्थिक संकटात सापडले होते. आता बाजार सुरू झाल्याने शेतमालाची खरेदी-विक्री सुरू झाली आहे. आठवडे बाजार सुरू झाल्याने गृहिणीही खूश दिसत आहेत. बाजारात फिरताना मास्कचा वापर करावा, सोशल डिस्टन्स ठेवावे, तसेच स्वतःची काळजी स्वतःच घ्यावी असे आवाहन ग्रामपंचायत प्रशासनाने केले आहे. 

सुमारे 32 आठवड्यांनंतर आठवडा बाजार भरला असून, बाजार पूर्वपदावर येण्यासाठी निश्‍चितच काही कालावधी लागणार आहे, असे राजेंद्र कटारिया यांनी "सकाळ'शी बोलताना सांगितले. 

बाजार सुरू झाल्याने इतर व्यापारावरही त्याचा अनुकूल परिणाम होत आहे, असे केत्तूर येथील व्यापारी हनुमंत नवले यांनी सांगितले. 

केत्तूर येथील रहिवासी संतोष कानतोडे म्हणाले, बाजार बंद असल्याने ग्रामपंचायतीला करातून मिळणारे उत्पन्न, शेतकऱ्यांचे, शेतमजुरांचे पगार, व्यापारी व दुकानदार यांचे व्यवहार कोलमडले होते; ते आता हळूहळू पूर्वपदावर येण्यास मदत होणार आहे. 

केत्तूर येथील व्यापारी अतुल राऊत म्हणाले, कोरोनामुळे ग्रामीण भागातील अर्थकारणाचे चाक बंदमुळे रुतले होते, ते बाजार सुरू झाल्याने निश्‍चितच बाहेर निघून ग्रामीण अर्थव्यवस्था पूर्वपदावर येईल असे वाटते. 

केत्तूर येथील गृहिणी सारिका माने म्हणाल्या, आठवडा बाजार सुरू झाल्याने एरव्ही महाग घ्यावा लागणारा भाजीपाला बाजारात मात्र स्वस्तात मिळाला. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com