कोरोनामुळे खरीप फेल तर पावसामुळे रब्बी हंगामही संकटात ! 

राजाराम माने 
Saturday, 31 October 2020

कोरोना महामारीच्या संकटामुळे लॉकडाउन मार्च महिन्यापासून सुरू असल्याने शेतकऱ्यांच्या खरिपातील पिकांची अक्षरशः वाट लागली आहे. वाहतूक सेवा बंद असल्याने शेतात तयार झालेला शेतमाल मार्केटला नेता न आल्याने शेतकऱ्यांवर आर्थिक संकट कोसळले. त्यामुळे खरिपाचा बार मात्र फुसकाच गेला. 

केत्तूर (सोलापूर) : कोरोना महामारीच्या संकटामुळे लॉकडाउन मार्च महिन्यापासून सुरू असल्याने शेतकऱ्यांच्या खरिपातील पिकांची अक्षरशः वाट लागली आहे. वाहतूक सेवा बंद असल्याने शेतात तयार झालेला शेतमाल मार्केटला नेता न आल्याने शेतकऱ्यांवर आर्थिक संकट कोसळले. त्यामुळे खरिपाचा बार मात्र फुसकाच गेला. 

त्यानंतर आलेल्या परतीच्या पावसाने धुमाकूळ घातल्याने हातातोंडाशी आलेली पिकेही पार हातातून निसटली. शेतात मोठ्या प्रमाणावर पाणी साचून राहिल्याने पिके सडून व नासून गेली. यामुळे खरिपाचा हंगाम गेल्याने आता शेतकऱ्यांच्या नजरा रब्बी हंगामाकडे लागल्या आहेत. 

कोरोना लॉकडाउनमुळे खरीप हंगामातील ज्वारी, मका, बाजरी, कपाशी, मटकी, हुलगा, उडीद व इतर कडधान्ये बाजारपेठा बंद असल्याने व्यापारी वर्गाने कमी दरात खरेदी केल्या; तर तयार झालेली भाजीपाला पिके तसेच केळी उत्पादकांना मोठा फटका बसला. तसेच कलिंगड, खरबूज, पपई आदी पिकांचे भरघोस उत्पादन मिळूनही हातात मात्र काहीच शिल्लक राहिले नाही. कांद्यालाही योग्य दर मिळाला नाही. 

आता परतीच्या पावसाने ब्रेक घेतल्याने रब्बी हंगामातील गहू, ज्वारी, हरभरा, सूर्यफूल, तूर आदी पेरण्यांचा मार्ग मोकळा झाला असला तरी शेतात मात्र अजून पेरणीयोग्य वाफसा झाला नसल्याने शेतकरी वाफसा होण्याची वाट पाहात आहेत. गेल्या दोन दिवसांपासून परिसरात थंडीचे आगमन झाले. शेतकरी येऊन गेलेल्या संकटातून पेरणीसाठी सज्ज झाला आहे. मात्र यंदाचा खरीप हंगाम पहिल्या टप्प्यातच संकटात आला आहे, हे मात्र खरे ! 

खरीप हंगामाच्या पिके काढणीच्या काळात व रब्बी हंगामाच्या पेरणी करण्याच्या काळात अतिवृष्टी झाल्याने यामध्ये मका, सोयाबीन व इतर कडधान्ये भिजून त्यांना कोंब फुटले. तर कांदा रोपे जागेवरच सडून गेली. भाजीपाला पिकेही जागेवरच सडून, नासून गेली. यातून वाचलेल्या पिकांवर हवामान बदलामुळे रोगांचा प्रादुर्भाव वाढला. सध्या शेतात वाफसा नसल्याने रब्बीच्या पेरण्या मात्र लांबल्या आहेत. 

गेल्या सात महिन्यांपासून शेतकरी संकटात सापडला आहे, निसर्गही त्याला साथ देत नाही, अशा दुहेरी कात्रीत शेतकरी सापडला आहे. नुकसानग्रस्तांना शासनाने जाहीर केलेली मदत कशी आणि केव्हा मिळणार, याकडे शेतकरी राजा मात्र नजर लावून बसला आहे. 

गुलमोहरवाडी येथील शेतकरी सुरेश माने म्हणाले, कोरोनामुळे सुरू झालेल्या लॉकडाउनमुळे शेतकऱ्यांचा उत्पादित शेतमाल मार्केटमध्ये जाऊ शकला नाही. त्यानंतर सततच्या अतिवृष्टीमुळे शेतीचा हंगाम वाया गेला आहे. या सर्व संकटांतून शेतकरी कशी उभारी घेणार? 

संपादन : श्रीनिवास दुध्याल


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The kharif season failed due to corona, while the rabbi season is in crisis due to rains