
पंढरपूर उपविभागातील पंढरपूर व मोहोळ तालुक्यातील प्रकल्पग्रस्तांकडून संत ज्ञानेश्वर माउली पालखी मार्गावरील (क्र. 965) चौपदरीकरणासाठी 160.42 हेक्टर क्षेत्र संपादित करावयाचे असून, त्यापैकी 100.19 हेक्टर क्षेत्र ताब्यात घेण्यात आले आहे. पंढरपूर तालुक्यातील 13 गावे तर मोहोळ तालुक्यातील 6 गावे अशा एकूण 19 गावांचा समावेश आहे.
पंढरपूर (सोलापूर) : मोहोळ ते आळंदी या संत ज्ञानेश्वर माउली पालखी मार्गावरील (क्र. 965) पंढरपूर उपविभागातील पंढरपूर व मोहोळ तालुक्यातील 19 गावांचा समावेश असून, या महामार्गासाठी 100.19 हेक्टर क्षेत्र संपादित करण्यात आले असल्याचे प्रांताधिकारी सचिन ढोले यांनी सांगितले.
पंढरपूर उपविभागातील पंढरपूर व मोहोळ तालुक्यातील प्रकल्पग्रस्तांकडून संत ज्ञानेश्वर माउली पालखी मार्गावरील (क्र. 965) चौपदरीकरणासाठी 160.42 हेक्टर क्षेत्र संपादित करावयाचे असून, त्यापैकी 100.19 हेक्टर क्षेत्र ताब्यात घेण्यात आले आहे. पंढरपूर तालुक्यातील 13 गावे तर मोहोळ तालुक्यातील 6 गावे अशा एकूण 19 गावांचा समावेश आहे. या महामार्गावरील 85 टक्के प्रकल्पग्रस्तांना मोबदला देण्यात आला आहे. उर्वरित प्रकल्पग्रस्तांना लवकरच भूसंपादनाचा मोबदला वाटप करण्यात येणार असल्याचेही प्रांताधिकारी सचिन ढोले यांनी सांगितले.
संत ज्ञानेश्वर माउली पालखी मार्गावरील (क्र. 965) चौपदरीकरणाचे काम गतीने सुरू असून, भीमा नदीवरील पंढरपूरला जोडणाऱ्या गुरसाळे - कौठाळी पुलाचे भूमिपूजन प्रांताधिकारी ढोले यांच्या हस्ते आज (गुरुवारी) पार पडले.
मोहोळ - पंढरपूर - पुणे - आळंदी हा राष्ट्रीय महामार्ग बायपाससाठी गुरसाळे - कौठाळी यादरम्यान हा नवीन पूल उभा राहतो आहे. या पुलाची रुंदी 32 मीटर तर लांबी 525 मीटर इतकी आहे. महापुरामुळे पंढरपूरशी अनेक गावांचा संपर्क तुटतो. तसेच नगर, मराठवाडा, विदर्भातून पंढरपूरकडे येणाऱ्या वाहनांचाही संपर्क तुटत असतो. पुलाची उंची व रुंदी जास्त असल्याने वाहतूक व्यवस्था सुरळीत सुरू राहील. वारी कालावधीत वाहतूक नियंत्रणासाठी या पुलाचा वापर होईल.
महामार्गावरील पुलामुळे वाखरी गुरसाळे, आढीव, देगाव आदी गावांच्या विकासाला चालना मिळणार आहे. संबंधित गावे पंढरपूर शहराशी जोडल्याने विकासाला चालना मिळणार आहे. तसेच या भागात साखर कारखाने असल्याने शेतकऱ्यांना याचा फायदा होणार आहे. संत ज्ञानेश्वर माउली पालखी मार्गासाठी पंढरपूर आणि मोहोळ तालुक्यातील 19 गावांतील प्रकल्पग्रस्तांनी व नागरिकांनी योग्य सहकार्य केल्याने महामार्गाचे काम गतीने सुरू असल्याचे प्रांताधिकारी ढोले यांनी सांगितले.
संपादन : श्रीनिवास दुध्याल