भिती खरी ठरली; पंढरपूर तालुक्‍यात शेतकऱ्यावर बिबट्यासदृश्‍य प्राण्याचा हल्ला 

सकाळ वृत्तसेवा 
शुक्रवार, 22 मे 2020

हल्ल्यातून वाचण्याचा प्रयत्न 
आज पहाटे रामेश्वर पाटील हे आपल्या शेतात उसाला पाणी देण्यासाठी शेतात गेले होते. यावेळी दबा धरून बसलेल्या बिबट्यासदृष्य प्राण्याने त्यांच्यावर हल्ला केला. या हल्ल्यातून पाटील यांनी बचाव करण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्या प्राण्याने पाटील यांच्या नाकाचा चावा घेऊन गंभीर जखमा केले. 

पंढरपूर (जि. सोलापूर) : बिबट्यासदृश्‍य वन्य प्राण्याने तुंगत (ता. पंढरपूर) येथील एक शेतकऱ्यावर हल्ला केल्याची धक्कादायक घटना आज पहाटे घडली. शेतकरी रामेश्वर आनंद पाटील या प्राण्याच्या हल्ल्यात गंभीर जखमी झाले असून त्यांचे नाक तोडले आहे. गंभीर जखमी झालेल्या पाटील यांना उपचारासाठी सोलापूर येथे पाठवण्यात आले आहे. या घटनेने पंढरपूर तालुक्‍यात मोठी खळबळ उडाली आहे. ही घटना आज पहाटेच्या सुमारास घडली. 
गेल्या पंधरा दिवसांपासून तुंगत व परिसरात बिबट्या सदृश वन्य प्राण्याने धुमाकूळ घातला आहे. आतापर्यंत सहा ते सात जनावरांची शिकार देखील या प्राण्याने केली आहे. शिकारीला चाटवलेल्या या वन्य प्राण्याला पकडण्यासाठी वन विभागाने तुंगत येथे पिंजरा लावला आहे. तरीही गुंगारा देत त्याचे हल्ले सुरूच आहेत. आज पहाटे रामेश्वर पाटील हे आपल्या शेतात ऊसाला पाणी देण्यासाठी गेले असता दबा धरून बसलेल्या बिबट्याने त्यांच्यावर हल्ला केला. बचाव करताना त्यांच्या नाकाचा चावा घेऊन गंभीर जखमा केले. गंभीर जखमी झालेल्या पाटील यांना तातडीने उपचारासाठी सोलापूर येथील रूग्णालयात दाखल केले आहे. या घटनेने नंतर तालुक्‍यात घबराट पसरली आहे. दरम्यान, वन विभागाच्या अधिकार्यानी घटना स्थळी जाऊन पंचनामा केला आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: leopard attacks farmers in Pandharpur taluka