बिबट्याची शिकार केलेले धवल"सिंह' कॉंग्रेसमध्ये दाखल ! 

dhavalsing new.jpg
dhavalsing new.jpg

नातेपुते (सोलापूर): महिनाभरापूर्वी करमाळा तालुक्‍यात आलेल्या नरभक्षक बिबट्याची शिकार करणाऱ्या धवल"सिंह' मोहिते पाटील हे आज मुंबई येथे कॉंग्रेसच्या छावणीत डेरेदाखल झाले आहेत. यामुळे सोलापूर शहरात तग धरून असलेल्या कॉंग्रेस पक्षाला बळ मिळेल का असा प्रश्‍न सध्या राजकीय विश्‍लेषकांना पडला आहे. 
लोकनेते प्रतापसिंह मोहिते पाटील यांचे सुपुत्र डॉ. धवलसिंह मोहिते पाटील यांनी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केल्यामुळे सोलापूर जिल्ह्यात कॉंग्रेस पक्ष उभारी धरणार का? याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. स्व. प्रतापसिंह यांचा झंजावात संपूर्ण राज्यांने अनुभवलेला आहेय त्यांच्या संघटन चातुर्यामुळे, कुशल नेतृत्वामुळे संपूर्ण जिल्ह्यातच नव्हे तर आसपासच्या पाच-सात जिल्ह्यावर मोहिते पाटील परिवारांची जबरदस्त पकड होती. सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील यांचे सवंगडी असणारे गणपतरावजी देशमुख, स्वर्गीय सुधाकरपंत परिचारक, मारवाडी वकील, माजी मंत्री दिलीप सोपल, आमदार बबनराव शिंदे आदी नेते विजयसिंह मोहिते पाटील गटापासून दुरावले गेले आहेत. जिल्ह्यावरील मोहिते-पाटील गटाची पकड कमी झाली हे वास्तव कुणीही नाकारू शकणार नाही. 
प्रतापसिंह मोहिते-पाटील यांनी आपल्या संघटन चातुर्यामुळे व कुशल नेतृत्वामुळे खासदारकी आणि आमदार की मिळवली होती. हे करीत असताना सर्व पक्षांमध्ये त्यांचे जवळचे स्नेही वरिष्ठ पदावर होते. ज्येष्ठ बंधू विजयसिंह मोहिते पाटील यांच्यामुळे त्यांनी प्रत्येक गोष्टीत बंधू प्रेमासाठी माघार घेतल्याचे त्यांच्या कुटुंबीयांकडून सांगितले जाते. मात्र, राजकारणात विविध कारणांमुळे अंतर पडत गेले व ते शेवटपर्यंत पडतच राहिले होते. लोकनेते स्वर्गीय प्रतापसिंह मोहिते-पाटील यांच्या पश्‍चात श्री. शंकर साखर कारखाना डॉ. धवलसिंह मोहिते पाटील यांच्या नेतृत्वाखाली सुरू होता. तो आर्थिक अडचणीमुळे बंद होता. शासनाने तो अवसायनात काढण्याचा प्रयत्न केला. डॉ. धवलसिंह यांनी या कारखान्यासाठी आर्थिक मदत मिळण्यासाठी सर्व स्तरावर प्रयत्न केले होते. परंतु त्यांचे प्रयत्न हाणून पाडल्याचे बोलले जाते व त्यातूनच संचालक मंडळाच्या निवडणुकीत त्यांच्या पॅनेलचा पराभव झाला व आज उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आमदार रणजितसिंह मोहिते पाटील या कारखान्याचे नेतृत्व करीत आहेत. बुधवार ता. 27 रोजी या कारखान्याचा गळीत हंगाम सुरू झाला आहे. 
अशा परिस्थितीत डॉ. धवलसिंह राष्ट्रीय पक्षाच्या पाठिंब्याशिवाय राष्ट्रीय व राज्य पातळीवरील कार्य करणे सोपे जावे यासाठी तसेच लोकनेते प्रतापसिंह मोहिते पाटील याचे स्व. इंदिराजी गांधी, स्व. राजीव गांधी याचे थेट संबंध होते. राजीव गांधींसोबत त्यांचे मैत्रीचे संबंध होते. इंदिराजी गांधी यांना अटक झाली त्या वेळी प्रतापसिंह मोहिते-पाटील यांनी संपूर्ण जिल्ह्यात मोठे आंदोलन उभे केले होते, रक्तदान चळवळ संपूर्ण राज्यात प्रथम क्रमांकाने केली होती. हा सगळा वारसा त्यांच्या पाठीशी आहे. कॉंग्रेस भवनमध्ये प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात, ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे, आमदार धीरज देशमुख, आदी मान्यवरांच्या उपस्थितीत डॉ. धवलसिंह मोहिते-पाटील यांनी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. प्रवेशामुळे सोलापूर जिल्ह्याला युवकांचा आणि ग्रामीण भागाचा चांगला चेहरा मिळालेला आहे. सोलापूर जिल्ह्याचे माजी आमदार रामहरी रूपनवर, विद्यमान जिल्हा अध्यक्ष प्रकाश बापू पाटील, श्रीलेखा पाटील व सुशीलकुमार शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आणि मार्गदर्शनाखाली संपूर्ण सोलापूर जिल्ह्यात मरगळलेला कॉंग्रेस पक्ष डॉ.धवलसिंह पुन्हा नव्याने उभा करतील का याकडे राजकीय विश्‍लेषकांचे लक्ष लागले आहे. 
सध्या देशात शेतकरी आंदोलन मोठ्या प्रमाणात सुरू आहे. केंद्र सरकारचे शेती संदर्भातील कायदे ग्रामीण भागातील लोकांना मान्य नाहीत. या संधीचा डॉ.धवलसिंह यांना फायदा होणार आहे. सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील यांचा जनमानसातील वारसा डॉ. धवलसिंह यांनी राबवला तर पुन्हा कॉंग्रेस पक्ष सोलापूर जिल्ह्यात चांगले यश मिळवू शकतो. आज ग्रामीण भागात कॉंग्रेस पक्षाला खंबीर नेतृत्व नसल्याचा फायदा डॉ. धवलसिंह यांनी पूर्ण वेळ पक्ष वाढीसाठी देऊन उठवणे गरजेचे आहे. 

जनसेवा संघटनेचे मोठे जाळे 
जनसेवा संघटनेचे राज्यात लाखो कार्यकर्ते आहेत, जनसेवेच्या मुशीतून तयार झालेले अनेक जण आज विविध पक्षात आमदार, खासदार, मंत्री म्हणून कार्यरत आहेत. डॉ. धवलसिंह यांनी सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील, प्रतापसिंह यांच्याप्रमाणे पूर्णवेळ जनमानसात राहून कार्य केले तर लोकनेते प्रतापसिंह यांना अभिप्रेत कार्य उभारण्यास वेळ लागणार नाही. 

संपादन ः अरविंद मोटे  

 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com