नवीन गाइडलाइनमध्ये शिथिलता देऊ

 Let's relax in the new guideline
Let's relax in the new guideline

सोलापूर : गृह मंत्रालयाचे गाइडलाइन आहेत, की जेथे रेड झोन आहे, तेथे कामगारांना फॅक्टरीमध्ये राहण्या-जेवण्याची व्यवस्था करावी. कामगार घरी व कारखाना अशी ये-जा करू शकत नाही. त्यामुळे आजच्या घडीला तरी काही करता येणार नाही. मात्र, 1 जूनपासून नवीन गाइडलाइन येणार आहे, त्यात जी काही शिथिलता देता येतील, ती नक्की देऊ, असे आश्‍वासन पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी गारमेंट उद्योजकांच्या बैठकीत दिली.


पालकमंत्री श्री. भरणे यांच्या उपस्थितीत शहरातील गारमेंट उत्पादकांची शुक्रवारी बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत श्री. भरणे यांनी, सर्व उद्योग सुरू व्हायला पाहिजेत, यासाठी राज्य शासन प्रयत्नशील आहे. त्यासाठी आवश्‍यक त्या उपाययोजना सुरू असल्याचे सांगितले. तसेच त्यांनी गारमेंट उत्पादकांनी उत्पादित केलेले पीपीई किट व मास्कची चौकशी केली व त्याची प्रशंसाही केली.


या वेळी श्री सोलापूर रेडिमेड कापड उत्पादक संघाचे अध्यक्ष रामवल्लभ जाजू, संचालक नीलेश शहा व अमित जैन यांनी गारमेंट उद्योजकांच्या अडचणी मांडल्या. कामगारांना फॅक्टरीमध्ये निवास व भोजनाची व्यवस्था करणे सर्वच उत्पादकांना शक्य नाही. ज्या 10 उत्पादकांनी अशी व्यवस्था करून फॅक्टरी सुरू केले त्यांचा उत्पादन खर्च वाढला असून, एक फॅक्टरी बंदही झाली आहे. कामगार दीर्घकाळापर्यंत फॅक्टरीमध्ये राहून काम करू शकत नाहीत. एक दिवस जरी कामगार घरी गेला तर त्याला पुन्हा कामावर घेता येत नाही. दोन-तीन महिने इतक्या दीर्घ कालावधीपर्यंत फॅक्टऱ्या बंद राहिल्यास उत्पादक मोठ्या नुकसानीत येतील. त्याचे कर्ज, व्याज, गुंतवलेले भांडवल, उधारी वसुली, व्यापाऱ्यांची देणी, कामगारांचा पगार अशा समस्या निर्माण होत आहेत. यामुळे उत्पादक संपला तर सोलापूरचे अर्थचक्र कोलमडून जाईल. सोलापुरात मोठ्या प्रमाणात रोजणार देणाऱ्या वस्त्रोद्योगाला मोठा फटका बसणार असून, हे उद्योग त्वरित सुरू करण्यासंदर्भात उपाययोजना करायला हव्यात. निदान महिला कामगारांना ये-जा करण्याची परवानगी द्यावी. किंवा एक वेळ निश्‍चित करावी, की कामगार सकाळी नऊ ते 10 या वेळेत येणार व सायंकाळी सहा ते सात वाजेपर्यंत घरी जाणार. आजच्या घडीला वस्त्रोद्योग ठप्प झाला आहे. त्यामुळे राज्यस्तरावर सोलापूरच्या उत्पादनांचे मार्केटिंग शासनाने करावे, अशा उपाययोजना या वेळी उत्पादकांनी मांडल्या. महापालिका आयुक्त दीपक तावरे यांनी उद्योजकांना, उद्या (शनिवारी) सायंकाळी बैठक घेऊ व यातून मार्ग काढू. तुम्हीही काही मार्ग सुचवा, असे आश्‍वासन दिले.


या वेळी आमदार भारत भालके, खासदार रणजित निंबाळकर, जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, अतिरिक्त जिल्हाधिकारी संजय जाधव, पोलिस अधीक्षक मनोज पाटील, पोलिस उपायुक्त बापू बांगर, चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष राजू राठी, संचालक पेंटप्पा गड्डम, निमंत्रित संचालक रमेश डाकलिया, श्री सोलापूर रेडिमेड कापड उत्पादक संघाचे अध्यक्ष रामवल्लभ जाजू, उपाध्यक्ष सतीश पवार, सचिव राजेंद्र कोचर, सहसचिव प्रकाश पवार, खजिनदार प्रफुल्ल वेद, संचालक नीलेश शहा, अमित जैन, रमणिक मोहता (बारामती) आदी उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com