जेवणाच कसं हाय ते एकदा बघाच, अहो रोग्यास तरी चांगल द्यावं या शासनान !

दत्तात्रय खंडागळे
Wednesday, 16 September 2020

सांगोला तालुक्‍यातील फॅबटेक येथील कोविड सेंटरवर सेंटरची परिस्थिती जाणुन घ्यावी या उद्देशाने कोविड सेंटरवर प्रस्तुत प्रतिनिधीने भेट दिली. 

सांगोला(सोलापूर)ः अहो, कोरोना..कोरोना नुसतचं म्हणत्यात, कोरोना झाला म्हणून आणलं, पण हीत तर आमच्याकडं कोणीच लक्ष देत नायं. खरं सांगू साहेब, कोरोना म्हणजे कोणताच रोग नायं. पणं नाही म्हणलं तर सगळं एकाच रोगात हाय. मला तर काय करावं कळंना झालय इथं मोकळं बसण्यापेक्षा पळुनच जावं वाटत बघा. कोरोना म्हणुन मोठा बोभाटा केला हाय. कोरोना हाय काय? नाय काय? कायचं कळंना झालंय... एक कोविड रुग्ण आपल्या अंतःकरणापासुन कोरोना रोगाबाबत व कोविड सेंटरबाबत बोलत होता. 

हेही वाचाः सर्व खासगी रुग्णालये या पुढे सरकारनेच चालवावीत ः राज्य कृती समिती व आयएमएची टिका 

सांगोला तालुक्‍यातील फॅबटेक येथील कोविड सेंटरवर सेंटरची परिस्थिती जाणुन घ्यावी या उद्देशाने कोविड सेंटरवर प्रस्तुत प्रतिनिधीने भेट दिली. 

हेही वाचाः तत्वचिंतक जीवनभाष्यकार ः सूर्यकांतशास्त्री होनमुटे 

कोविड सेंटरच्या गेटवर एका झाडाखाली सावलीत नातेवाईकाशी बोलत असतानाच सेंटरमधील दुसऱ्या झाडाखाली उभा असलेला एक कोरोना बाधित रुग्ण जवळ येऊन बोलू लागला, 'पाहुणं तुम्ही पत्रकार आहेस ना? या कोरोनाची नेमकी माहिती सांगा'. तेव्हा काय बोलावे कळेना. मग तेच बोलू लागले, 'अहो कोरोना झाला म्हणून इथं आणलं, पण इथं काहीच केलं जात नाही. सुरुवातीला रोग झाला म्हणून फार भीती वाटली होती. परंतु दोन दिवसाने काहीच होत नाही म्हणल्यावर जीवाला बरं वाटलं. मला तर काहीच होत नाही. कोरोना म्हणजे कोणताच रोग नायं. पण या रोगानं माणसं मारत्यात यामुळे बी खूप भिती पणं वाटती. येथं जेवणाच कसं हाय ते तुम्ही एकदा बघाच. अहो रोग्यास तरी चांगल द्यावं या शासनान. काय करावं काय कळत नाही. यथं ना व्यवस्थित जेवण ना काय काम. आम्ही काम केलेली माणसं. इथं मोकळं बसून काय करायचं. मला तर काय करावं कळंना झालय इथं मोकळं बसण्यापेक्षा पळुनच जावं वाटत बघा. कोरोना म्हणुन मोठा बोबाटा केला हाय. कोरोना हाय काय? नाय काय? कायचं कळंना झालंय तुम्ही या रोगाचं बी अनं इथंल्या जेवनाच बी छापा अस म्हणत नमस्कार घालून हसत निघूनही गेला. 

सुसज्ज नवीन कोविड सेंटरची गरज 
तालुक्‍यात कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. 15 सप्टेंबर पर्यंत तालुक्‍यातील एकूण कोरोना रुग्ण संख्या 1213 झाली आहे. यातील 523 रुग्णांना उपचार कालावधीनंतर घरी सोडण्यात आले आहे तर 678 बाधितांवर उपचार सुरू आहेत. रुग्णांची वाढती संख्या पाहता नवीन कोविड सेंटरची गरज असुन जास्त लक्षणे दिसणाऱ्या रुग्णांवर कोविड सेंटरमध्ये उपचार व्हायला हवे. 

रुग्ण घरून मागवतात जेवणाचा डबा 
कोविड सेंटरमध्ये रुग्णाला देण्यात येणाऱ्या सुविधांबाबत प्रशासनाने लक्ष घालावे. अनेक कोविड रुग्ण कोविड सेंटरमधील जेवण न घेता घरुनच जेवण मागवितात. कोविड सेंटरमधील नाष्टा आणि जेवणाकडे प्रशासनाने विशेष लक्ष द्यावे अशी मागणी रुग्णांकडुन होत आहे.  
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Let's take a look at how the meal is, hi, this government should give good to the patient!