सभागृह नेत्यांचे पत्र ! दोनशे कोटींचे कर्ज काढून मागितला भांडवली निधी; शहरातील नगरसेवकांचा निधी मिळणार हद्दवाढसाठी

324WhatsApp_20Image_202020_04_30_20at_202.36.48_20PM_0_3.jpeg
324WhatsApp_20Image_202020_04_30_20at_202.36.48_20PM_0_3.jpeg

सोलापूर : महापालिकेची आर्थिक स्थिती दिवसेंदिवस बिकट होऊ लागली असून मागील तीन वर्षांत महापालिकेला उद्दिष्टाच्या तुलनेत सुमारे एक हजार कोटींचे उत्पन्न कमी मिळाले आहे. दुसरीकडे भांडवली कामांचे अद्याप 68 कोटी रुपये कंत्राटदारांना देणेबाकी आहेत. अशा परिस्थितीत प्रशासनाने दोनशे कोटींचे कर्ज काढून नगरसेवकांना विकासकामांसाठी भांडवली निधी द्यावा, असे पत्र सभागृह नेते श्रीनिवास करली यांनी दिल्याचे वरिष्ठ सूत्रांकडून सांगण्यात आले.

कर्ज काढण्याचा अधिकार महापालिकेस नाही
कर्ज काढून भांडवली निधी देण्याची मागणी आमच्यापर्यंत आली आहे. मात्र, आपल्या स्तरावरुन कर्ज काढता येणार नाही. त्यासाठी राज्य शासनाची परवानगी लागेल आणि तत्पूर्वी, महापालिकेची पत निश्‍चित करावी लागेल. त्यानंतर कर्ज काढता येईल, मात्र खर्च कमी करुन महापालिकेचे उत्पन्नवाढीसाठी प्रयत्न सुरु आहेत.
- पी. शिवशंकर, महापालिका आयुक्‍त, सोलापूर

पारंपारिक सत्ताधारी कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेसचा पराभव करुन मोदी लाटेत महापालिकेवर भाजपचे कमळ फुलले. मात्र, मागील तीन वर्षांत सत्ताधाऱ्यांनी एकदाही वेळेवर बजेट सादर केले नसून आता 2020-21 मधील बजेट 28 जानेवारीला सादर केले जाणार आहे. दरम्यान, कोरोनामुळे महापालिकेच्या तिजोरीत उद्दिष्टाच्या तुलनेत 20 टक्‍केदेखील उत्पन्न जमा झालेले नाही. अशा परिस्थितीत मार्च 2021 चा अंदाज करुन सत्ताधाऱ्यांकडून नगरसेवकांना भांडवली निधी वाढवून देण्याची मागणी केली जात आहे. त्यामुळे महापालिका आयुक्‍त पी. शिवशंकर हे प्रशासनाची बाजू घेणार की महापालिकेवरील बोजा वाढत असतानाही सत्ताधाऱ्यांची मागणी मान्य करणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. नगरसेवकांना आर्थिक अडचणीच्या काळात वाढीव भांडवली निधी दिल्यास महापालिकेवरील दायित्व वाढेल आणि महापालिका दिवाळखोरीत निघेल, अशी शक्‍यताही अधिकारी वर्तवू लागले आहेत. नगरविकास मंत्री आणि त्यांच्या प्रधान सचिवांनीही खर्च कमी करुन उत्पन्न वाढीसाठी प्रयत्न करण्याच्या सूचना केल्या आहेत. या पार्श्‍वभूमीवर आगामी काळात प्रशासन आणि पदाधिकाऱ्यांमध्ये निधीवरुन वाद निर्माण होण्याची शक्‍यता वर्तविली जात आहे.


हद्दवाढमधील 62 नगरसेवकांना वाढीव निधी
शहरातील एकूण 26 पैकी 11 प्रभाग एबीडी एरियात (मध्यवर्ती ठिकाणी) असून उर्वरित 15 प्रभाग हद्दवाढ भागात येतात. शहरात 45 नगरसेवक असून त्यात पाच स्वीकृत नगरसेवक आहेत. तर हद्दवाढ भागात सर्वाधिक 62 नगरसेवक आहेत. शहरातील मध्यवर्ती भागाचा विकास स्मार्ट सिटी योजनेतून केला जात आहे. त्यामुळे त्याठिकाणच्या नगरसेवकांचा भांडवली निधी कमी करुन हद्दवाढ भागातील नगरसेवकांना वाढीव निधी दिला जाणार आहे. त्यानुसार हद्दवाढ भागातील नगरसेवकांना प्रत्येकी 30 लाखांचा तर शहरातील नगरसेवकांना 15 लाखांपर्यंत भांडवली निधी देण्याच्या दृष्टीने सत्ताधाऱ्यांनी नियोजन केल्याची चर्चा आहे. बजेटच्या अनुषंगाने बैठका सुरु असून लवकरच पार्टी मिटींग होणार आहे. 28 जानेवारीला बजेट होईल, असे महापौर श्रीकांचना यन्नम यांनी "सकाळ'शी बोलताना स्पष्ट केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com