प्रेमाने आयुष्यात घडविली "सुवर्णक्रांती' 

The love story of Babasaheb Karande and Suvarna Karnde
The love story of Babasaheb Karande and Suvarna Karnde

सोलापूर : प्रेमाला वासनेचा वास असतोच. प्रेम फक्त वासनेपुरतेच केले तर ते चिरकाल टिकत नाही. प्रेमात फक्त वर्तमान बघून चालत नाही तर प्रेमात भविष्याकडेही पाहावे लागते. मी जिल्हा परिषदेचा वाहनचालक. माझ्या आयुष्यात बदल घडला तो प्रेमामुळे. ज्या काळात प्रेमविवाह फक्त चित्रपटात शोभून दिसायचे, त्याकाळात (1984) मी प्रेमविवाह केला, नुसता प्रेमविवाहच नाही तर आंतरजातीय प्रेमविवाह. संसार असो की माझी राजकीय जडणघडण, प्रत्येक ठिकाणी सुवर्णा ठामपणे पाठीशी उभा राहिल्याने माझ्या आयुष्यात सुवर्णक्रांती घडली, अशी भावना सोलापूर जिल्हा लेबर फेडरेशनचे अध्यक्ष बाबासाहेब करंडे यांनी व्यक्त केली. 
जिल्हा परिषदेत मी मैलकोलीचा वाहनचालक मदतनीस झालो, त्यानंतर माझी पदोन्नतीने वाहनचालक म्हणून गादेगाव (ता. पंढरपूर) येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात बदली झाली. त्याच आरोग्य केंद्रात सुवर्णा खेडकर या आरोग्य सहायिका म्हणून रुजू झाल्या होत्या. 1984 मध्ये आमचे प्रेम जुळले. समाजाचा आणि कुटुंबाचा विरोध पत्करून आम्ही 1985 मध्ये प्रेमविवाह केला. माझ्या प्रेमविवाहात कै. प्रतापसिंह मोहिते-पाटील यांनी आमच्या बाजूने घेतलेली ठाम भूमिका खूप मोलाची ठरली. ज्या गावात मी मैलकोली म्हणून काम केले, त्याच गावाचा जिल्हा परिषद सदस्य म्हणून मी काम पाहावे अशी सुवर्णाची खूप इच्छा होती. तुम्ही राजकारणात आणि समाजकारणात सक्रिय व्हा! मी संसार सांभाळते, असे भक्कम पाठबळ सुवर्णाने दिल्यामुळे 2007 मध्ये मी सांगोला तालुक्‍यातील महूद जिल्हा परिषद गटातून सदस्य झालो. 
मी राजकारण आणि समाजकारण सांभाळत असताना मुलगा सुमीत आणि मुलगी सुविद्याचे शिक्षण व त्यांना त्यांच्या पायावर उभा करण्याची जबाबदारी सुवर्णाने पार पाडली. मुलगा सुमीतचा आंतरधर्मीय प्रेमविवाह आम्ही थाटात पार पाडला. या दोन्ही कुटुंबांत समन्वय घडविण्याची भूमिका माझ्या मुलीने पार पाडली. प्रेम करणे हा गुन्हा नाही. आपल्या प्रेमामुळे कुटुंब आणि समाज तुटता कामा नये. समाजानेही प्रेमविवाहाला समजून घेतले पाहिजे. आमच्या दोघांचेही कुटुंब तुटू नये याची खबरदारी आम्ही दोघांनीही घेतली. आमच्या लग्नानंतर अवघ्या एका वर्षात आमच्या दोघांच्याही कुटुंबाने आमचा स्वीकार केला. प्रेमविवाहाबद्दल आज समाजात ज्या विदारक घटना घडतात, त्या घटना टाळण्यासाठी समाजाने आणि मुला-मुलींच्या कुटुंबाने प्रेमविवाहाचा स्वीकारला करायला पाहिजे, असे आवाहनही करंडे यांनी यावेळी केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com