महाळुंग कोविड केअर सेंटरला आयएसओ

logo
logo

सोलापूर : माळशिरस तालुक्‍यातील महाळुंग येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील कोविड केअर सेंटरला आयएसओ - 9001 : 2015 मानांकन प्राप्त झाले आहे. आरोग्य वर्धिनी इमारतीत अत्याधुनिक सोयी-सुविधायुक्त कोविड केअर सेंटर उभारण्यात आले आहे. या सेंटरमध्ये हॅण्ड वॉश स्टेशन, ऍटोमॅटिक सॅनिटायझर यंत्रणा, आर.ओ. प्लांट, अखंडित वीज पुरवठ्यासाठी जनरेटरची सुविधा लोकसहभागातून करण्यात आली आहे. उपचारासाठी वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी तसेच स्वच्छतेसाठी पुरेसे मनुष्यबळ 24 तास उपलब्ध आहे. कोरोना बाधित रुग्ण व संशयित रुग्ण तपासणीसाठी व्यवस्था करण्यात आली आहे. 

या सेंटरमधील आरोग्य अधिकारी कर्मचारी यांना पी. पी. ई. किट, फेस शील्ड, एन. 95 मास्क, हॅण्ड ग्लोव्हज्‌ तसेच उपचारासाठी पुरेसा औषध साठा उपलब्ध आहे. या कोविड केअर सेंटरला आयएसओ मानांकन मिळाल्याबद्दल पालकमंत्री दत्तात्रेय भरणे यांनी अधिकाऱ्यांचे कौतुक केले आहे. त्याचबरोबर या आरोग्य केंद्राला अशा प्रकारे बहुमान मिळाल्याचा जिल्हा प्रशासनाला अभिमान असल्याची प्रतिक्रिया जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी व्यक्त केली.

माळशिरस तालुक्‍यातील कोणत्याही प्राथमिक आरोग्य केंद्रातून अथवा इतर ठिकाणाहून संशयित रुग्णांना सेंटरमध्ये आणले जाते. तपासणीनंतर तो संशयित आहे का कोरोना बाधित रुग्ण आहे. त्यानुसार विभागणी करून संस्थात्मक क्वारंटईन करण्यात येते. संशयित रुग्णांसाठी 34 बेडची तर कोरोना बाधित रुग्णांसाठी 18 बेडची व्यवस्था करण्यात आल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी रामचंद्र मोहिते यांनी दिली. दाखल रुग्णांना प्राथमिक सुविधा देण्यात येतात. त्यामध्ये दैनंदिन वापरासाठी हॅण्डवॉश, सॅनिटायझर, मास्क, कपड्यांचा व अंगाचा साबण, तेल, पावडर, टॉवेल, नॅपकिन आदी वस्तू दिल्या जातात. रुग्णांना पौष्टिक आणि सकस आहार दिला जातो. आहार प्रत्येकाला डिस्पोजेल प्लेट व ताट दिले जाते. 

जिल्हाधिकारी शंभरकर यांनी दिली केंद्रास भेट 
जिल्हाधिकारी शंभरकर यांनी नुकतीच महाळुंग कोविड केअर सेंटरला भेट देवून पाहणी केली. यावेळी त्यांनी आयुष वैद्यकीय अधिकारी, परिचारिका, यांच्याशी संवाद साधला. यावेळी प्रांताधिकारी शमा पवार, तहसीलदार अभिजित पाटील, उपविभागीय पोलिस अधिकारी नीरज राजगुरू, गटविकास अधिकारी स्मिता पाटील, तालुका वैद्यकीय अधिकारी रामचंद्र मोहिते आदि उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com