पालखीमार्ग ः माळशिरसधील 24 गावांचे प्रस्ताव मंजूर 

पालखीमार्ग ः माळशिरसधील 24 गावांचे प्रस्ताव मंजूर 

नातेपुते (जि. सोलापूर) ः माळशिरस तालुक्‍यातून जात असलेल्या श्रीसंत ज्ञानेश्वर महाराज व श्रीसंत तुकाराम महाराजांच्या पालखी महामार्गावरील 24 गावांचे प्रस्ताव मंजूर झाले आहेत. अकलूज, वेळापूर व महाळुंग या तीन गावांचे पालखी महामार्गासाठीचे प्रस्ताव अद्याप प्रलंबित असल्याचे माहिती प्रांताधिकारी शमा पवार यांनी दिली. 

हेही वाचा ः कोल्हे म्हणतात, कोरोनाबरोबर राहण्याची तयारी ठेवा
माळशिरस तालुक्‍यातून संतज्ञानेश्वर व संततुकाराम महाराज पालखी मार्ग जातो. या पालखी महामार्गाच्या कामाचा आढावा घेण्यासाठी शिवरत्न बंगल्यावर माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत ही बैठक झाली. यावेळी आमदार रणजितसिंह मोहिते पाटील, प्रांताधिकारी शमा पवार, तहसीलदार अभिजीत पाटील, पालखी महामार्गाचे प्रकल्प संचालक एस. एस. कदम, कार्यकारी संचालक अनिल विपत, प्रकल्प संचालक चेतन गावडे, शिवामृत दूध संघाचे अध्यक्ष धैर्यशील मोहिते पाटील, जिल्हा परिषद सदस्या स्वरुपाराणी मोहिते पाटील, उपसभापती अर्जुनसिंह मोहिते पाटील, गटविकास अधिकारी स्मिता पाटील, अकलूजचे सरपंच शिवतेजसिंह मोहिते पाटील, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष बाबाराजे देशमुख, नातेपुतेचे सरपंच ऍड. भानुदास राऊत, गटनेते दादासाहेब उराडे, मार्केट कमिटीचे उपसभापती मामासाहेब पांढरे, रामचंद्र सावंत पाटील, धनंजय सावंत, गटशिक्षणाधिकारी धनंजय देशमुख यांच्यासह अकलूज, महाळुंग, दसूर व धर्मपुरी गावचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. 


नातेपुते, माळशिरस, महाळुंग येथे बाह्यवळण रस्ता मंजूर असून वेळापूरच्या जुन्या पालखी मार्गाचा सर्वे झाला आहे. वेळापूर येथे पुरातत्त्व खात्याने अद्याप मंजुरी न दिल्याने 200 मिटरचा रस्ता सोडून इतर कामाला सुरुवात करावी, असा प्रस्ताव महसूल विभागाने दिला आहे. महाळुंग येथे पालखी मार्गालगत श्री यमाई देवीचे पुरातन मंदिर आहे. या मंदिरापासून 150 मिटर अंतरावरुन पालखी मार्ग जातो. पुरातत्त्व खात्याचा 300 मिटरचा आग्रह असला तरी येथे पुरातत्त्व खाते मंजुरी देईल, असा विश्वास प्रकल्प संचालक कदम यांनी सांगितले. 


नातेपुते येथील श्री संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी तळाचा पश्न अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. नातेपुते ग्रामस्थांची आहे तेथेच माऊली मुक्कामी रहावी, अशी आग्रही मागणी आहे. शासनाने सध्याच्या पालखी तळाची जमीन अधिग्रहण केली आहे. दोन जमीन मालकांना पैसे हि दिले आहेत. तिसरा जमीन मालक हि जागा देण्यास तयार आहे. हा पालखी तळ एकूण 6 एकराचा होत आहे. उर्वरित कमी पडणारी जमीन लगत असावी. जमीन मालकांना शासनाने योग्य मोबदला द्यावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली. बायपास लगत पालखी तळासाठी 25 एकर जागा उपलब्ध करण्यात आली होती. परंतु ही जागा हि वन खात्याची असल्याची कागदपत्रे निघाली आहेत. भविष्यात पालखी तळाचा प्रश्न निर्माण झाला तर अधिकची जागा असावी. तोपर्यंत जुन्या पालखी तळालगत असलेली खासगी जागा शासनाने खरेदी करावी, अशी मागणी बाबाराजे देशमुख व ऍड. भानुदास राऊत यांनी केली. महाराष्ट्र

अकलूजचा पालखी मार्गाचा प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. त्याला अद्याप मंजुरी मिळाली नसल्याचे प्रांताधिकारी पवार यांनी सांगितले. 

शाळा पालखी मार्गात जाणार, 
मुलांच्या शिक्षणाचे काय? 

धर्मपुरी, जाधववाडी व दसूर, सावंतवाडी येथील शाळेच्या इमारती या पालखी मार्गात आल्या आहेत. या इमारतीचे व जमिनीचे अधिगृहण झाले आहे. या तीनही शाळेत सुमारे 300 विद्यार्थी पहिली ते सातवीपर्यंत शिक्षण घेतात. या मुलांच्या शिक्षणाचे काय असा प्रश्न दोन्ही गावच्या सरपंचानी उपस्थित केला. जागा उपलब्ध करुन द्या इमारत बांधून देवू, असे कदम यांनी सांगितले. धर्मपुरी, जाधववाडी व दसूर येथील जिल्हा परिषदेच्या जागेचा मोबदला जिल्हा परिषदेला देण्यात आला असून ही रक्कम जिल्हा परिषदेने खासगी जागा खरेदी करण्यासाठी द्यावी, अशी मागणी सरपंचांनी केली. याबाबत आमदार मोहिते पाटील यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश वायचळ यांच्याशी चर्चा करुन प्रश्न सोडवू असे सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com