
सोशल मीडियात टाकलेल्या पोस्टवरून शहरातील देवणे गल्ली येथे विद्यमान नगरसेवकासह 25 ते 30 जणांनी येऊन तोडफोड करत सहाजणांना मारहाण केली. या प्रकरणी बार्शी शहर पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.
बार्शी (सोलापूर) : सोशल मीडियात टाकलेल्या पोस्टवरून शहरातील देवणे गल्ली येथे विद्यमान नगरसेवकासह 25 ते 30 जणांनी येऊन तोडफोड करत सहाजणांना मारहाण केली. या प्रकरणी बार्शी शहर पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. नगरसेवकासह सात जणांना पोलिसांनी अटक करून न्यायालयात उभे केले असता न्यायदंडाधिकारी एन. एस. सबनीस यांनी त्यांना 6 मार्चपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. यात आरोपींतर्फे ऍड. भारत कट्टे यांनी काम पाहिले.
नगरसेवक अमोल चव्हाण, नाथा मोहिते, भगवान साठे, अतुल शेंडगे, रोहित अवघडे, प्रमोद कांबळे, बाबा वाघमारे (सर्व रा. लहूजी वस्ताद चौक) अशी पोलिस कोठडी मिळालेल्यांची नावे आहेत. जखमी सगीर रहिम सय्यद यांनी फिर्याद दाखल केली. ही घटना मंगळवारी रात्री साडेआठच्या दरम्यान घडली. बापू तेलंग, बादशहा बागवान, साजिद शेख, सूरज भालशंकर, मयूर शिनगारे अशी जखमींची नावे आहेत.
बार्शी नगरपरिषदेवर 5 मार्च रोजी मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे, असे भाऊसाहेब आंधळकर यांनी सोशल मीडियात लाईव्ह करून सांगितले होते. त्याचा राग मनात धरून अमोल चव्हाण यांनी चोळी बांगडीचा आहेर, तुम्ही काय देता आम्हीच तुम्हाला चोळी, बांगडी घालून नाचवू, अशी पोस्ट टाकली. यानंतर आंधळकर यांच्या कार्यकर्त्यांनी अमोल चव्हाण यांच्या विरोधात पोस्ट टाकली.
याचा राग मनात धरून चव्हाणसह 25 ते 30 जणांनी देवणे गल्लीत येऊन तेथील अन्न छत्रालयातील अन्न फेकून दिले, डिजिटल पोस्टर फाडले, खुर्च्यांची तोडफोड करून मारहाण केली, असे सय्यद यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. पोलिस उपनिरीक्षक प्रेमकुमार केदार याचा तपास करीत आहेत.
संपादन : श्रीनिवास दुध्याल