माने, सोनवणेंना क्षीरसागरांच्याविरोधात तक्रारीचा अधिकार, सोलापूर जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचा निर्णय 

प्रमोद बोडके
Thursday, 21 January 2021

चौकट 
3 फेब्रुवारीला सुनावणी 
नागनाथ क्षीरसागर यांच्या जात प्रमाणपत्र बद्दल केलेल्या तक्रारीवर आता 3 फेब्रुवारी रोजी सुनावणी होणार आहे. हनुमंत माने व शिवाजी सोनवणे यांना क्षीरसागर यांच्या जात प्रमाणपत्राबद्दल तक्रार करण्याचा अधिकार असल्याचे आज स्पष्ट झाल्याने आता पुढील सुनावणीत काय होणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 

सोलापूर : मोहोळचे (जि. सोलापूर) शिवसेना नेते नागनाथ क्षीरसागर यांच्याकडे असलेल्या अनुसूचित जातीच्या हिंदू खाटीक दाखल्या विरोधात मोहोळ राष्ट्रवादीचे आमदार यशवंत माने यांचे बंधू हनुमंत माने व जिल्हा परिषद सदस्य शिवाजी सोनवणे यांना तक्रार करण्याचा अधिकार आहे. याबाबतचा निर्णय आज सोलापूरच्या जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीने दिला आहे. 
या प्रकरणावर समितीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर सूळ, सचिव संतोष जाधव, सदस्य छाया गाडेकर यांच्यासमोर झालेल्या सुनावणीत हा निर्णय घेण्यात आला आहे. नागनाथ क्षीरसागर यांच्याकडे असलेल्या हिंदू खाटीक जातीच्या प्रमाणपत्र बद्दल ही तक्रार करण्यात आली आहे. एकदा जातीचा दाखला रद्द झाल्यानंतर पुन्हा दाखला काढता येत नाही, क्षीरसागर हे हिंदू खाटीक जातीचे नसल्याचे सर्वोच्च न्यायालयात सिद्ध झाले असतानाही त्यांनी 27 जून 2014 रोजी पुन्हा हिंदू खाटीक जातीचा दुसरा दाखला मिळविल्याची तक्रार हनुमंत माने व शिवाजी सोनवणे यांनी केली आहे.

क्षीरसागर यांच्या दाखल्या विरोधात झालेली तक्रार जास्तीत जास्त दिवस लांबविण्यासाठी क्षीरसागर यांनी वकिलामार्फत 29 ऑक्‍टोबर 2020 रोजी लोकस स्टॅंडीचा (जातीच्या दाखल्या विरोधात तक्रार करण्याचा अधिकार) मुद्दा उपस्थित करणारा अर्ज दाखल केला आहे. क्षीरसागर यांचा लोकस स्टॅंडीचा अर्ज नामंजूर करावा, अशी मागणी तक्रारदार माने व सोनवणे यांनी केली होती. त्यांची ही मागणी आज मंजूर झाली आहे. 
 

क्षीरसागर यांचे वकील ऍड. खोले यांनी युक्तिवाद करत तक्रारदार हनुमंत माने व शिवाजी सोनवणे हे बाधित व्यक्ती नाहीत. क्षीरसागर यांच्यामुळे तक्रारदार माने व सोनवणे यांचे कसलेही नुकसान झालेले नाही. तक्रारदार माने हे जातीने काकडी विमुक्त प्रवर्गातील आहेत. त्यांनी व त्यांची मुलगी सुजाता हनुमंतराव माने यांनी कैकडी विमुक्त जातीचे जात वैधता प्रमाणपत्र घेतले आहे हा असा मुद्दा उपस्थित केला.

कायदा व नियमातील तरतुद विचारात घेता तक्रारदार हनुमंत माने व शिवाजी सोनवणे यांना क्षीरसागर यांच्या जात प्रमाणपत्र बद्दल तक्रार करण्याचा कायदेशीर अधिकार असल्याचा निष्कर्ष सोलापूरच्या जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीने काढला आहे. त्यामुळे नागनाथ क्षीरसागर यांनी लोकस स्टॅंडीचा आधार घेत 29 ऑक्‍टोबर 2020 व 7 जानेवारी 2021 रोजी केलेला अर्ज सोलापूर जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीने नामंजूर केला आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Mane, Sonawane have the right to lodge a complaint against Kshirsagar

टॉपिकस