करमाळा तालुक्‍यातील मांगी तलाव तब्बल 11 वर्षानंतर भरला 

नानासाहेब पठाडे 
Friday, 23 October 2020

पोथरे येथील शेतकरी आजिनाथ झिंजाडे म्हणाले, मांगी तलावावरच आमच्या शेतीचे भवितव्य आहे. तलाव भरल्याने रब्बीसह उन्हाळा हंगामातील पिके घेता येणार आहेत. 

पोथरे (सोलापूर) : सततच्या पावसाने व कुकडी प्रकल्पातील आलेल्या पाण्याने अखेर मांगी (ता. करमाळा) तलाव 11 वर्षानंतर पूर्ण क्षमतेने भरून सांडवा वाहू लागला आहे. त्यामुळे तलाव लाभ क्षेत्रातील पोथरे, मांगी आदी गावातील शेतकऱ्यांनी पाण्याचे पूजन करून आनंद व्यक्त केला. या पाण्यावर तालुक्‍यातील उत्तर भागातील 15 गावांमध्ये आता उसाचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात वाढणार असल्याने बळीराजा सुखावला आहे. 

मांगी तलाव हा कान्होळा नदीवर असून तो ब्रिटिश कालीन तलाव आहे. एक टीएमसी पाणी क्षमता असून यावर साडेचार हजार हेक्‍टर क्षेत्र ओलिताखाली येत आहे. मात्र सतत दुष्काळ पडत असल्याने व कुकडीचे पाणी हे मृगजळ ठरत असल्याने तलाव कोरडा राहत आहे. यापूर्वी 2009ला तलाव पूर्ण क्षमतेने भरला होता. त्यानंतर 2017 ला 95 टक्के पाणी साठा झाला होता. मात्र गेली दोन वर्ष तलाव निरंक होता. यावर्षी जूनपासून पावसाने हजेरी लावल्याने तलावातील पाणीसाठ्यात वाढ होत गेली व कुकडी प्रकल्पाचेही तीन वेळा काही प्रमाणात पाणी आल्याने तलाव पूर्ण क्षमतेने भरून सांडवा वाहू लागला आहे. अकरा वर्षांनंतर तलाव पूर्ण क्षमतेने भरल्याने येथील शेतकरी समाधानी झाला असून शेतकऱ्यांनी पाणी पूजन करून आनंद व्यक्त केला. 

पोथरे येथील शेतकरी आजिनाथ झिंजाडे म्हणाले, मांगी तलावावरच आमच्या शेतीचे भवितव्य आहे. तलाव भरल्याने रब्बीसह उन्हाळा हंगामातील पिके घेता येणार आहेत. पोथरे येथील शेतकरी हरिश्‍चंद्र झिंजाडे म्हणाले, तलाव भरला असला तरी रब्बी हंगामाला तातडीने पाणी सोडण्याचे नियोजन होणे गरजेचे आहे. वेळेत पाणी सुटले तर ज्वारी गावासह उसाचे क्षेत्रही वाढवता येईल. शेतकरी रमेश आमटे म्हणाले, रब्बी हंगाम सुरू झाला आहे. त्यामुळे तलावाच्या सांडव्यातून वाहून जाणारे पाणी कॅनॉलद्वारे सोडावे. त्यामुळे पिकासह पाणी पातळी वाढण्यास मदत होईल. 

संपादन : वैभव गाढवे 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Mangi dam in Karmala taluka filled up after 11 years