शिरढोणच्या माळावर दरवळतोय आंब्याच्या मोहराचा सुगंध ! अन्नद्रव्याच्या व्यवस्थापनामुळे गळ नाही 

Mango Tree
Mango Tree

रोपळे बुद्रूक (सोलापूर) : शिरढोण (ता. पंढरपूर) येथील माळरानावरच्या शेतातील आंब्याची झाडे सध्या मोहराने लगडली असून, त्याचा सुगंध आसमंतात दरवळू लागला आहे. कोरोनाच्या संकटात लॉकडाउनच्या काळात डॉ. शीतल मोहनलाल फडे यांनी शेतीत चांगले लक्ष घातले. त्यामुळे त्यांना तब्बल आठ वर्षांनंतर प्रथमच ही किमया साधता आली. आता ऊस पट्ट्यातील हे पीक सध्या अनेकांचे लक्ष वेधून घेत आहे. 

आंब्याचे पीक हवामानाला संवेदनक्षील असते. एखाद्या वर्षी थंडी कमी पडली, तर झाडे मोहराने डवरत नाहीत. कमी-जास्त प्रमाणात मोहोर लागतो. यावर्षी मोठ्या प्रमाणात पाऊस झाला. त्यानंतर वेळेत थंडीला सुरवात झाली. त्यामुळे सगळीकडे आंब्याच्या झाडांना मोहोर निघू लागला आहे. यावर्षी थंडी जरी पडली असली तरी सगळीकडे सारख्या प्रमाणात मोहोर निघाल्याचे चित्र दिसत नाही. अशा परिस्थितीत व्यवसायाने डॉक्‍टर असलेल्या शीतल फडे यांनी मात्र शेतीनिष्ठ पुरस्कार विजेते शेतकरी भारत रानरुई यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या आमराईतील सर्व झाडांना मोठ्या प्रमाणात मोहोर काढला आहे. 

जुन्या रुढी-परंपरेतील औषधांच्या काढ्यांबरोबरच अन्नद्रव्याच्या व्यवस्थापनाची अंमलबजावणी काटेकोरपणे केली. शिवाय रोग व कीड नियंत्रणाच्या उपाययोजना केल्यामुळे निघालेल्या मोहराची गळ झाली नाही. त्यामुळे दोन एकरातील केशर जातीच्या आंब्याच्या प्रत्येक झाडाला मोठ्या प्रमाणात मोहोर निघाला आहे. त्यामुळे त्यांच्या आमराईतील झाडे आता मोहराने डवरलेली दिसत आहेत. अन्नद्रव्ये व रोग-कीड नियंत्रणामुळे तब्बल आठ वर्षांनंतर प्रथमच त्यांच्या आमराईतील आंब्याची झाडे मोहराने लगडून गेली आहेत. फळांचे सेटिंग चांगले झाले आहे. मोहोर व सेटिंग झालेल्या फळांची गळ झाली नसल्यामुळे यंदा उत्पादनात दुप्पट वाढ होईल, असा त्यांनी अंदाज व्यक्त केला आहे. 

आमची आठ वर्षांची केशर जातीच्या आंब्याची बाग आहे. या बागेला आजवर कधीही एवढ्या मोठ्या प्रमाणात मोहोर निघाला नाही आणि फळांचे सेटिंगही झाले नव्हते. त्यामुळे यंदा उत्पादनात दुप्पट वाढ होईल. 
- डॉ. शीतल फडे,
आंबा उत्पादक शेतकरी, शिरढोण, ता. पंढरपूर 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com