कोरोनामुळे राज्यातील मानसेवी शिक्षकांवर बेरोजगारीची कुऱ्हाड

श्‍याम जोशी 
Tuesday, 1 September 2020

मानसेवी शिक्षकांना 1 जुलै ते 31 मार्च या शैक्षणिक वर्षात नऊ महिन्यांसाठी प्रतिमाह पाच हजार रुपये मानधन दिले जाते. या शिक्षकांची नेमणूक दरवर्षी योजना पुढे सुरू ठेवण्याच्या आदेशावर अवलंबून असते. हा आदेश प्रतिवर्षी नवीन शैक्षणिक वर्ष सुरू झाल्यानंतर म्हणजे जुलैमध्ये काढण्यात येतो. मात्र यंदा कोरोना महामारीच्या संकटामुळे जुलैमध्ये नवीन शैक्षणिक वर्ष सुरूच झाले नाही. 

दक्षिण सोलापूर (सोलापूर) : गेल्या दहा वर्षांपासून राज्यातील अल्पसंख्याक अमराठी माध्यमाच्या शाळांमध्ये सुरू असलेली "मराठी भाषा फउंडेशन वर्ग' ही योजना यंदा कोरोनामुळे संकटात सापडल्याने राज्यातील सुमारे एक हजार 45 शिक्षकांवर बेरोजगारी ओढवली आहे. 

हेही वाचा : माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांना वाहिली जिल्ह्यातील मान्यवरांनी आदरांजली 

राज्य शासनाच्या वतीने अल्पसंख्याक अमराठी शाळांमधील विद्यार्थ्यांना मराठीचे ज्ञान अवगत करून देण्यासाठी मराठी भाषा फाऊंडेशन वर्ग घेतले जातात. त्यासाठी मानधन तत्त्वावर शिक्षकांची नेमणूक केली जाते. या शिक्षकांना 1 जुलै ते 31 मार्च या शैक्षणिक वर्षात नऊ महिन्यांसाठी प्रतिमाह पाच हजार रुपये मानधन दिले जाते. या शिक्षकांची नेमणूक दरवर्षी योजना पुढे सुरू ठेवण्याच्या आदेशावर अवलंबून असते. हा आदेश प्रतिवर्षी नवीन शैक्षणिक वर्ष सुरू झाल्यानंतर म्हणजे जुलैमध्ये काढण्यात येतो. मात्र यंदा कोरोना महामारीच्या संकटामुळे जुलैमध्ये नवीन शैक्षणिक वर्ष सुरूच झाले नाही. त्यामुळे मराठी भाषा फाउंडेशन वर्ग ही योजना सुरू ठेवण्याचे आदेशच निघाले नसल्याने राज्यातील सुमारे एक हजार 45 शिक्षकांवर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळली आहे. 

हेही वाचा : बंद घरातून मारला चोरट्याने अडीच लाखांचा डल्ला ! 

तुटपुंज्या मानधनावर काम करणाऱ्या या शिक्षकांना दरवर्षी काम मिळत असल्याने आधार होता. आता तोही आधार संपल्याने त्यांची कोंडी झाली आहे. आता शैक्षणिक वर्ष कधी सुरू होणार अन्‌ ही योजना सुरू राहणार का, असा प्रश्‍न या शिक्षकांपुढे आहे. मराठी भाषा संवर्धनाचा पुरस्कार करणाऱ्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील सरकारने याकडे लक्ष देण्याची गरज आहे. गेल्या वर्षी अल्पसंख्याकमंत्री नवाब मलिक यांची भेट घेऊन निवेदन दिल्यानंतर या शिक्षकांच्या मानधनात वाढीचे आश्‍वासन त्यांनी दिले होते. परंतु तसे न होता उलट यावर्षी नियुक्तीचाच पत्ता नसल्याने या शिक्षकांतून संताप व्यक्त होत आहे. शासनाने या सर्व शिक्षकांच्या नियुक्तीचे आदेश देऊन मानधनात वाढ करण्याची मागणी मराठी भाषा फाउंडेशन मानसेवी शिक्षक संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे. 

याबाबत मराठी भाषा फाउंडेशन मानसेवी शिक्षक संघटनेचे जिल्हाध्यक्ष उमर फारुक सय्यद म्हणाले, अमराठी शाळेतील आठवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांना आम्ही गेल्या 10 ते 12 वर्षांपासून मराठी विषय शिकवतो. जिल्ह्यात 45 तर राज्यात एक हजार 45 शिक्षक कार्यरत आहेत. अत्यंत अल्प मानधनावर काम करतो. त्यामध्ये वाढ करावी अशी मागणी करूनही अजून त्याकडे दुर्लक्षच आहे. दरवर्षीप्रमाणे यंदा अजून नियुक्ती न मिळाल्याने आमच्यापुढे रोजगाराचा प्रश्‍न आहे. मराठी भाषा सक्ती व संवर्धनाचे ब्रीद घेऊन काम करणाऱ्या या सरकारने आमचा प्रश्‍न सोडवण्याकडे लक्ष द्यावे. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Mansevi teachers in the state on the path of unemployment due to Corona