
वार्षिक बजेटनुसार वसुली नाही, अतिक्रमण विभाग असतानाही शहरात जागोजागी अतिक्रमणाची स्थिती तर लिपिक असताना संबंधित विभागाच्या प्रमुखपदी नियुक्ती देण्याचा प्रकार महापालिकेत पाहायला मिळतो. दुसरीकडे, शहराचा पाणीपुरवठा विस्कळित असतानाही वर्षानुवर्षे या विभागाचे अधिकारी त्याच जागेवर कार्यरत आहेत. तर तीन वर्षातून एकदा बदली अपेक्षित असतानाही 2011 पासून अनेकांची बदलीच झाली नाही, अशी स्थिती महापालिकेत आहे.
सोलापूर : वार्षिक बजेटनुसार वसुली नाही, अतिक्रमण विभाग असतानाही शहरात जागोजागी अतिक्रमणाची स्थिती तर लिपिक असताना संबंधित विभागाच्या प्रमुखपदी नियुक्ती देण्याचा प्रकार महापालिकेत पाहायला मिळतो. दुसरीकडे, शहराचा पाणीपुरवठा विस्कळित असतानाही वर्षानुवर्षे या विभागाचे अधिकारी त्याच जागेवर कार्यरत आहेत. तर तीन वर्षातून एकदा बदली अपेक्षित असतानाही 2011 पासून अनेकांची बदलीच झाली नाही, अशी स्थिती महापालिकेत आहे. लोकप्रतिनिधी, महापालिकेतील पदाधिकारी व वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या वशिलेबाजीने व त्यांच्या हस्तक्षेपाशिवाय प्रशासकीय कामकाज होतच नसल्याची चर्चा आहे.
महापालिकेतील आवेक्षक अब्दुलरशीद मुंढेवाडी यांच्याकडे मुख्य लेखापरीक्षकाची तर आरोग्य निरीक्षक श्रीराम कुलकर्णी यांच्याकडे अन्न व परवाना विभागाचा पदभार सोपविला आहे. उपअभियंता संजय धनशेट्टी यांच्याकडे सार्वजनिक आरोग्य अभियंता म्हणून तर सहाय्यक अभियंता सारिका आकुलवार यांच्याकडे भूमी व मालमत्ता विभागाचा पदभार सोपविण्यात आला आहे. क्रीडा विभागातील कनिष्ठ लिपिक असतानाही नजीर शेख हे थेट क्रीडाधिकारीपदी विराजमान झाले आहेत, तर स्थानिक संस्था कर विभागातील लिपिक विश्वनाथ इरकल हे या विभागाचे प्रमुख बनले आहेत. विशेष म्हणजे यातील बहुतेक अधिकाऱ्यांच्या कामकाजावर नगरसेवकांनी सभागृहात व सभागृहाबाहेर आवाज उठविला, तरीही काहीच बदल झाल्याचे दिसत नाही. विभागीय कार्यालयासह महापालिकेतील कर्मचारी रजेचा अर्ज न देताच, तीन- चार दिवस सुटी घेतात, असेही प्रकार सुरू असल्याची चर्चा आहे. त्यामुळे नवनियुक्त अधिकारीही महापालिकेतील सर्व प्रकार पाहून अवाक् झाले आहेत.
लिपिकांना एक महिन्याची मुदतवाढ
महापालिकेतील लिपिकांना पदोन्नती मिळूनही त्यांना टंकलेखन व संगणकाची माहिती नसल्याचे वास्तव समोर आले. त्यानंतर आयुक्त पी. शिवशंकर यांनी महापालिकेचे कामकाज गतिमान होण्याच्या दृष्टीने त्यांना दोन्ही गोष्टी यायला हव्यात, असे आदेश काढले. ज्या लिपिकांना टंकलेखन व संगणक हाताळता येणार नाही, त्यांना मूळ वेतनावर आणले जाईल, असे आदेश आयुक्तांनी काढले. त्यानुसार एक परीक्षा झाली आणि लोकप्रतिनिधी, कामगार संघटनांच्या मागणीनुसार आयुक्तांनी त्यांना दुसरी संधी देण्याचे मान्य केले. ऑगस्टमध्ये परीक्षा पार पडल्यानंतर 28 नोव्हेंबरला परीक्षा घेण्याचे नियोजन करण्यात आले. मात्र, आयुक्तांनी लिपिकांना पुन्हा एक महिन्याचा वेळ वाढवून दिला आहे. आता ही परीक्षा 26 डिसेंबरला घेतली जाणार आहे.
बदल्यांमध्ये पाळली जातेय कमालीची गुप्तता
महापालिकेतील विभागीय कार्यालयासह विविध विभागांमध्ये 2011 व 2015 पासून एकाच ठिकाणी ठाण मांडून असलेल्या कनिष्ठ अधिकारी व कर्मचाऱ्यांची संख्या लक्षणीय आहे. आता यातील बहुतांश कर्मचाऱ्यांची अन्य विभागांमध्ये बदली करण्याचा निर्णय आयुक्त पी. शिवशंकर यांनी घेतला. मात्र, अनेकजण वशिलेबाजी करतील म्हणून बदलीबाबत कमालीची गुप्तता पाळली जात असल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले. या सर्व पार्श्वभूमीवर महापौर श्रीकांचना यन्नम "सकाळ'शी बोलताना म्हणाल्या, महापालिकेतील बहुतांश विभागातील अधिकारी, कर्मचारी वशिलेबाजी करूनच बदली होऊन आले आहेत. काही अधिकारी, कर्मचारी उत्तम काम करतात, तर काहीजण काम सांगूनही वेळेत करत नाहीत.
संपादन : श्रीनिवास दुध्याल