पर्यटन विकासासाठी व्हावे समाज माध्यमातून मार्केटींग : प्रदीप हिरडे यांचे मत  

विजय थोरात
Sunday, 17 January 2021

"सकाळ'कार्यालयात त्यांनी "कॉफी विथ सकाळ' या उपक्रमात संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते. 

 
सोलापूर : सोलापूर जिल्ह्यात अनेक धार्मिक स्थळे आहेत. त्यामुळे सोलापूर शहर व जिल्ह्यातील पर्यटन व्यावसायाला मोठा वाव मिळू शकेल. मात्र, याला समाज माध्यमांची जोड मिळाली तर जिल्ह्यातील पर्यटनाला वाव मिळेल, असा विश्वास मध्य रेल्वेचे वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक प्रदीप हिरडे यांनी व्यक्त केला.

"सकाळ'कार्यालयात त्यांनी "कॉफी विथ सकाळ' या उपक्रमात संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते. 
मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागात 2012 पासून दुहेरीकरण आणि विद्युतीकरणाचे काम सुरू आहे. मात्र, मागील दीड वर्षापासून या कामाने गती घेतली आहे. दौंड ते वाडी हे काम येत्या मार्च 2021 अखेर पूर्ण होणार आहे. भाळवणी ते भिगवण हे 55 किलोमीटरचे अंतर राहिले असून हेदेखील मार्च 2021 पर्यंत पूर्ण होणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. 
विद्युतीकरणाचे काम दौंड ते कुर्डूवाडी दरम्यान पूर्ण झाले आहे. येथे इलेक्‍ट्रिक इंजिनची चाचणी देखील घेण्यात आली आहे व ती पूर्णपणे यशस्वी झाली आहे. 

कोरोना काळात रेल्वेचे आघाडी 

देशभरात 23 मार्चपासून कोरोना महामारीमुळे देशभरातील सर्व प्रवासी रेल्वे गाड्या बंद ठेवण्यात आल्या होत्या. जीवनावश्‍यक वस्तू पोहोचविण्यासाठी रेल्वे प्रशासनाकडून मालवाहतूक गाड्या सुरू ठेवण्यात आल्या. त्याचबरोबर शेतकऱ्यांच्या मालाची विक्री वाढावी व सामान्य लोकांना जीवनावश्‍यक वस्तू मिळाव्यात यासाठी किसान रेल्वे प्रशासनाकडून चालविण्यात आली. पंजाब, हरियाणा येथून गहू मोठ्या प्रमाणावर देशभरात पाठविण्यात आले. कोरोना महामारीच्या काळात कामगारांचा तुटवडा भासत होता. त्यामुळे कामगारांना कामाच्या जागी योग्य ती काळजी घेत रेल्वे प्रशासनाकडून मालाची चढ-उतार करण्यात येत होती. कोरोना महामारीमुळे अनेक परप्रांतीय मजूर, अडकून पडले होते. हाताला काम मिळत नसल्याने अनेकजण रस्त्याने पायी जात होते. श्रमिकांसाठी रेल्वेने श्रमिक स्पेशल गाड्या सुरू केल्या. 

किसान रेल्वेमुळे 6 कोटीचे उत्पन्न 
सोलापूर विभागातील 50 ते 55 टक्के उत्पन्न प्रवासी वाहतुकीतून व 45 ते 50 टक्के उत्पन्न मालवाहतुकीमधून मिळते. भुसावळ येथून देवळाली ते दानापूर ही पहिली किसान रेल्वे सुरू झाली. किसान रेल्वे सुरू करीत असताना सर्वप्रथम पाच डब्यांची गाडी सुरू करण्यात आली. यातून प्रथमत: 60 ते 70 टन माल वाहतूक झाली. किसान रेल्वेने सोलापूर विभागातून आतापर्यत 12 हजार टनाहून जास्त फळे आणि भाज्यांची वाहतूक केली आणि यातून सोलापूर विभागाला 6 कोटीहून अधिक उत्पन्न मिळाले आहे. यामुळे शेतकऱ्यांना मोठा फायदा झाला आहे. सांगोल्याचे प्रसिध्द डाळिंब आणि कंदारची प्रसिध्द केळी उत्तर आणि पूर्व भारतात किसान रेल्वेने पोहोचविली आहे. 

आसरा पुलासाठी सहमती, 
पंढरपूर-फलटणसाठी सर्व्हे 

सोलापूर येथील आसरा पूल हा नव्याने बांधण्यासाठी रेल्वे प्रशासनाकडून सहमती देण्यात आली आहे. मागील काही महिन्यात सोलापूर येथून रो-रो सेवा सुरू झाली होती. यासाठी कोकण रेल्वेकडून खुल्या वॅगणचा रेक हा भाडेतत्त्वावर घेण्यात आला होता. रो-रो सेवेतून जास्तीत जास्त मालाची वाहतूक होण्यासाठी रेकमध्ये सुधारणा होणे गरजेचे आहे. जेणेकरून जास्तीत जास्त यावर मालट्रकची वाहतूक करता येईल. पंढरपूर-फलटण या मार्गाचे देखील सर्व्हेचे काम पूर्ण झाले आहे. 

कुर्डुवाडीत आता दरमहा 120 डबे दुरुस्ती 
लातूर येथील कोच फॅक्‍टरीमध्ये नवीन डबे तयार केले जाणार आहेत. तर कुर्डूवाडी येथील कारखान्यांमध्ये महिन्याला 120 डबे दुरुस्ती केले जाणार आहे. सोलापूर विभागातील 9 रेल्वे स्थानकांना आएसओ 14001, 2015 हे मानांकन देखील मिळाले आहे. हे मानांकन पर्यावरणपूरक निकष पूर्ण केल्याने मिळाले आहे. 
 

ठळक बाबी 
कोरोना काळातील रेल्वे हॉस्पिटलमध्ये उपचार 
हॉस्पिटलसाठी एका उत्कष्ट रोबोटची निर्मिती 
रेल्वे कर्मचाऱ्यासाठी रेल परिवार मोहीम 
कोरोना काळात कमी पायाभूत सुविधांची आणि दुरुस्तीची कामे पूर्ण 
 
वैयक्तिक माहिती 
मूळगाव ः श्रीगोंदा जि.अहमदनगर 
शिक्षण ः एमएससी ऍग्रीकल्चर 
कौटुंबिक स्थिती ः मध्यमवर्गीय शेतकरी कुटुंब 
सोलापूर जिल्ह्यात नियुक्‍ती ः फेब्रुवारी 2019  

 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Marketing through social media should be for tourism development: Opinion of Pradip Hirde