आरक्षणासाठीचा संघर्ष व्यर्थ होऊ नये : आडम मास्तर; माकपचा "सकल मराठा'च्या "सोलापूर बंद'ला पाठिंबा 

Adam Master
Adam Master

सोलापूर : सकल मराठा समाज सोलापूर जिल्हा यांच्यावतीने मराठा आरक्षणाबाबत सोमवारी (ता. 21) सोलापूर बंदची हाक दिली आहे. त्यास मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पक्षाकडून जाहीर पाठिंबा घोषित करण्यात आल्याची माहिती ज्येष्ठ कामगार नेते तथा माजी आमदार नरसय्या आडम यांनी प्रसिद्धिपत्रकाद्वारे दिली. 

माजी आमदार म्हणाले, आधुनिक भारताच्या निर्मितीनंतर भारतासारख्या विविधतेत एकता असणाऱ्या देशात बारा बलुतेदार व अठरापगड जातीचे लोक आपले जीवनमान आपापल्या परीने उंचावण्याचा प्रयत्न करीत आहेत. प्राधान्याने देशातील सामाजिक, आर्थिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासलेल्या समाजाला सर्वांगीणदृष्ट्या स्थैर्य प्राप्त व्हावे याकरिता संविधानावर आधारित आरक्षण लागू करणे महत्त्वाचे होते. रयतेचा राजा शिवछत्रपती महाराजांनी स्वराज्याची निर्मिती करताना महाराष्ट्रातील सर्व समाजघटकांचा समान विकास व्हावा व त्यांना समान संधी मिळावी याकरिता लोकशाही राज्याची संकल्पना मांडली. छत्रपती संभाजी राजे, छत्रपती शाहू महाराज यांनीही पुढे हा वारसा चालवला. तसेच लोकनेते राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांनी महाराष्ट्रातील विविध समाजांच्या सर्वांगीण विकासासाठी आरक्षणाची संकल्पना मांडत असताना मराठा समाजाचाही समावेश त्यात केला होता. याला घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दुजोरा दिला होता. 

प्रामुख्याने महाराष्ट्रात मराठा समाज मोठ्या संख्येने असून मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून विविध उच्च न्यायालयांत याचिका दाखल करण्यात आल्या असून याबाबत तमिळनाडू उच्च न्यायालयाने मराठा समाजाला असणाऱ्या 50 टक्के आरक्षणाची मर्यादा ओलांडून 69 टक्के आरक्षनाची तरतूद केली असून, गेल्या 26 वर्षांपासून त्याची अंमलबजावणी तिथे सुरू आहे. त्या धर्तीवर महाराष्ट्रात आरक्षणाची अंमलबजावणी करण्यात यावी. तसेच महाराष्ट्र शासनाने नेमलेल्या न्यायमूर्ती गायकवाड आयोगाने दिलेले व उच्च न्यायालयाने वैध ठरवलेल्या मराठा आरक्षणास सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील मराठा समाजावर मोठा अन्याय झाला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून कित्येक तरुणांनी आपल्या प्राणांची आहुती दिली. गल्लीपासून दिल्लीपर्यंत रस्त्यावरची लढाई लढली. न्यायालयीन लढा दिला. संघर्ष करून मिळवलेले आरक्षण व्यर्थ होऊ नये. 

याबाबत केंद्र व राज्य सरकारने मराठा आरक्षणाबाबत विविध तज्ज्ञ व जाणकार अभ्यास समितीच्या अहवालाची दखल घेऊन मराठा समाजाला आरक्षण देणे आवश्‍यक आहे. ही न्याय्य हक्काची मागणी आहे. सकल मराठा समाज सोलापूर जिल्हा यांच्या वतीने सोमवारी सोलापूर जिल्हा बंदची हाक देण्यात आली असून याला मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने जाहीर पाठिंबा देत आहोत. तरी सर्व श्रमिक, कष्टकऱ्यांनी बंद पाळून मराठा आरक्षण लढ्याला पाठिंबा द्यावा, असे आवाहन श्री. आडम यांनी केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com