"हॉटेल, बार, एसटी, रेल्वेही होणार सुरू; आता विठ्ठल-रुक्‍मिणी मंदिरही व्हावे दर्शनासाठी खुले' 

अभय जोशी 
Thursday, 1 October 2020

राज्यातील हॉटेल आणि बार 50 टक्के क्षमतेने सुरू करण्यास राज्य सरकारने परवानगी दिली आहे. एसटी वाहतूक पूर्ववत सुरू झाली असून, रेल्वेगाड्याही सुरू होणार आहेत. राज्यातील मंदिरे भाविकांना खुली करण्याचा निर्णय मात्र अद्याप प्रलंबितच आहे. मंदिरावर अवलंबून असलेले हजारो व्यापारी व्यापार ठप्प असल्यामुळे अडचणीत आले आहेत. आवश्‍यक नियम, अटी घालून मंदिरे त्वरित सुरू केली जावीत, अशी मागणी या व्यापाऱ्यांमधून होत आहे. 

पंढरपूर (सोलापूर) : राज्यातील हॉटेल आणि बार 50 टक्के क्षमतेने सुरू करण्यास राज्य सरकारने परवानगी दिली आहे. एसटी वाहतूक पूर्ववत सुरू झाली असून, रेल्वेगाड्याही सुरू होणार आहेत. राज्यातील मंदिरे भाविकांना खुली करण्याचा निर्णय मात्र अद्याप प्रलंबितच आहे. मंदिरावर अवलंबून असलेले हजारो व्यापारी व्यापार ठप्प असल्यामुळे अडचणीत आले आहेत. आवश्‍यक नियम, अटी घालून मंदिरे त्वरित सुरू केली जावीत, अशी मागणी या व्यापाऱ्यांमधून होत आहे. 

पंढरपूरला श्री विठ्ठल-रुक्‍मिणीच्या दर्शनासाठी यात्राकाळात लाखोंच्या संख्येने भाविक येतात तर वर्षभर अन्य काळात दररोज 25 ते 30 हजारांहून अधिक भाविकांची गर्दी होत असते. या भाविकांकडून चुरमुरे, बत्तासे, पेढे, फोटोफ्रेम, तुळशीच्या माळा, सोलापुरी चादरी, विविध देवतांच्या मूर्तींची खरेदी केली जाते. मंदिरात जाताना भाविक हार-फुले देवाला अर्पण करण्यासाठी घेऊन जातात. परगावाहून येणाऱ्या अशा भाविकांवर शहरातील हॉटेल्स अवलंबून आहेत. येणाऱ्या या भाविकांना राहण्यासाठी घरातील जागा उपलब्ध करून देऊन उदरनिर्वाह करणारे लोकही पंढरपुरात आहेत. अनेक स्थानिक नागरिकांनी भाविकांना राहण्यासाठी भाड्याने देण्यासाठी लाखो रुपये खर्च करून खोल्या बांधलेल्या आहेत. भाविकांसाठी चंद्रभागा नदीमध्ये नौकानयन करून पोट भरणारे अनेक कोळी बांधव आहेत. एकंदरीतच परगावाहून दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांवर पंढरपुरातील शेकडो कुटुंबांचा प्रपंच अवलंबून आहे. 

दर्शनासाठी आलेल्या भाविकांना कोरोनाचा संसर्ग होऊ नये यासाठी दक्षता म्हणून 17 मार्चपासून श्री विठ्ठल-रुक्‍मिणी मंदिर भाविकांसाठी बंद ठेवण्यात आले आहे. आषाढी, चैत्री यात्रा भरू शकल्या नाहीत. त्यामुळे पंढरपूरचे अर्थकारण अडचणीत आले आहे. वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ऍड. प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली मागील महिन्यात पंढरपूर येथे मंदिर भाविकांसाठी खुले करावे या मागणीसाठी आंदोलन करण्यात आले होते. परंतु अद्याप शासनाकडून राज्यातील मंदिरे भाविकांसाठी खुली करण्याचे आदेश देण्यात आलेले नाहीत. त्यामुळे श्री विठ्ठल-रुक्‍मिणी मंदिर समितीला देखील मंदिर भाविकांसाठी सुरू करता आलेले नाही. श्री विठ्ठल-रुक्‍मिणी मंदिर समितीला भाविकांच्या माध्यमातून मिळणारे उत्पन्नही बंद आहे. त्यामुळे समितीचे आतापर्यंत सुमारे 17 कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. 

गेल्या काही दिवसांपासून राज्यातील एसटी वाहतूक पूर्ववत सुरू करण्यात आली आहे. बाजारपेठेतील व्यवहार नेहमीप्रमाणे सुरू झाले आहेत. काल 30 सप्टेंबर रोजी राज्य शासनाने राज्यातील हॉटेल आणि बार 50 टक्के क्षमतेने 5 ऑक्‍टोबरपासून सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यातील रेल्वेगाड्या देखील धावणार असून, मुंबईतील उपनगरी रेल्वेगाड्यांची वारंवारता वाढवण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर आता मंदिरे भाविकांसाठी खुली केली जावीत, अशी मागणी जोर धरू लागली आहे. श्री विठ्ठल-रुक्‍मिणी मंदिर समितीने देखील पहिल्या टप्प्यात भाविकांसाठी मुखदर्शन सुरू करण्याविषयीचे नियोजन केले आहे; परंतु याविषयी शासनाचे निर्देश नसल्यामुळे मंदिर समितीला मुखदर्शन सुरू करता आलेले नाही. 

दरम्यान, दर तीन वर्षांनंतर येणारा अधिक महिना सध्या सुरू आहे. अधिक महिन्यात श्री विठ्ठल-रुक्‍मिणीच्या दर्शनासाठी भाविक मोठ्या संख्येने पंढरपूरला येत असतात. हे लक्षात घेऊन शासनाने श्री विठ्ठल-रुक्‍मिणी मंदिर समितीस मंदिर भाविकांसाठी खुले करण्याच्या सूचना द्याव्यात, अशी अपेक्षा स्थानिक व्यापाऱ्यांमधून व्यक्त होत आहे. 

कोरोना संदर्भातील नियमांचे पालन करत किमान मुखदर्शन तरी त्वरित सुरू करावे, अशी मागणी भाविकांमधून होत आहे. त्याचा विचार करून मंदिर भाविकांसाठी सुरू केल्यास स्थानिक व्यापाऱ्यांना दिलासा मिळेल, असे मत प्रासादिक वस्तूंचे व्यापारी कौस्तुभ गुंडेवार आणि सादिक तांबोळी यांनी व्यक्त केले. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Merchants of Pandharpur demanded that the Vitthal Rukmini temple be opened for Darshan