पावणेचार लाख ग्राहकांनी पाठवले मीटरचे रीडिंग 

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 5 May 2020

वीजग्राहकांनी मोबाईल ऍप व वेबसाइटमध्ये लॉगीन करून दिलेल्या मुदतीत मीटर रीडिंगचा फोटो अपलोड करून मीटर रीडिंग पाठवावे, असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.  

सोलापूर : महावितरणच्या आवाहनाला प्रतिसाद देत राज्यातील तीन लाख 63 हजार वीजग्राहकांनी पोर्टल व मोबाईल ऍपद्वारे एप्रिल महिन्याचे स्वतःहून मीटर रीडिंग पाठविले आहे. या सर्व ग्राहकांना त्यांच्या वीजवापरानुसार महावितरणकडून वीजबिल दिलेले आहे. यामध्ये पुणे परिमंडलातील सर्वाधिक 69 हजार 912 तर त्यापाठोपाठ कल्याण परिमंडलातील 58 हजार 210 वीजग्राहकांचा समावेश आहे. 

मीटर रीडिंग घेण्याची प्रक्रिया तात्पुरती बंद 
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत असल्याने शासनाकडून लॉकडाउनसारख्या प्रभावी उपाययोजना केल्या जात आहेत. याचाच एक भाग म्हणून महावितरणने गेल्या 23 मार्चपासून वीजग्राहकांकडे जाऊन मीटर रीडिंग घेण्याची प्रक्रिया तात्पुरती बंद केली आहे. यासोबतच वीजबिलांची छपाई करणे व त्याचे वितरण करणेही बंद केले आहे. लॉकडाउनच्या कालावधीत मीटर रीडिंग उपलब्ध होणे शक्‍य नसल्याने वीजग्राहकांना सरासरीनुसार वीजबिल पाठविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 

हेही वाचा- आषाढी वारीच्या चर्चेसाठी पुढाकार कोण घेणार? वारकरी संभ्रमात 

ऍपद्वारे वीजग्राहकांना सुविधा 
मात्र, महावितरणची www.mahadiscom.in वेबसाइट व "महावितरण' मोबाईल ऍपद्वारे वीजग्राहकांना मीटरच्या रीडिंगचे फोटो पाठवून स्वतः रीडिंग घेण्याची सोय उपलब्ध आहे. या रीडिंगप्रमाणे वीजवापराचे अचूक बिल तयार करण्यासाठी जास्तीत जास्त वीजग्राहकांनी मीटरच्या रीडिंगचे फोटो पाठविण्याचे आवाहन करण्यात आले होते. त्यासाठी वीजग्राहकांना नोंदणी केलेल्या मोबाईलवर महावितरणकडून "एसएमएस'ही पाठविला जात असून त्यामध्ये मीटर रीडिंग पाठविण्याची मुदत नमूद करण्यात येत आहे. महावितरणच्या या आवाहनाला प्रतिसाद देत गेल्या एप्रिल महिन्याच्या वीजवापराचे तब्बल तीन लाख 63 हजार 175 वीजग्राहकांनी पोर्टल व मोबाईल ऍपद्वारे दिलेल्या मुदतीमध्ये मीटर रीडिंग पाठविले आहे.

 

मीटर रीडिंगचा फोटो अपलोड करावा 
महावितरणने वीजग्राहकांना उपलब्ध करून दिलेल्या या सुविधेचा जास्तीतजास्त ग्राहकांनी लाभ घ्यावा. महावितरणकडून प्रत्यक्ष रीडिंग घेण्याची प्रक्रिया सुरू होईपर्यंत वीजग्राहकांनी मोबाईल ऍप व वेबसाइटमध्ये लॉगीन करून दिलेल्या मुदतीत मीटर रीडिंगचा फोटो अपलोड करून मीटर रीडिंग पाठवावे, असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.  

  • मीटर रीडिंग पाठविलेले वीजग्राहक 
  • पुणे परिमंडल : 69912, कल्याण : 58210, भांडूप : 37543, नागपूर : 27720, नाशिक : 25831, कोल्हापूर : 22728, बारामती : 20941, जळगाव : 17664, औरंगाबाद : 16374, अकोला : 13767, अमरावती : 13540, चंद्रपूर : 8824, कोकण : 8542, नांदेड : 7348, गोंदिया : 7268 आणि लातूर परिमंडल : 6963. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Meter readings sent by customers