आज दुपारी सरकोली येथे आमदार भालके यांच्यावर होणार अंत्यसंस्कार; शरद पवारांसह इतर नेतेमंडळी राहणार उपस्थित 

अभय जोशी 
Saturday, 28 November 2020

पंढरपूर - मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे हॅट्ट्रिक आमदार भारत भालके यांच्या पार्थिवावर आज (शनिवारी) त्यांच्या सरकोली गावी दुपारी चार वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह अनेक नेतेमंडळी उपस्थित राहण्याची शक्‍यता आहे. 

पंढरपूर (सोलापूर) : पंढरपूर - मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे हॅट्ट्रिक आमदार भारत भालके यांच्या पार्थिवावर आज (शनिवारी) त्यांच्या सरकोली गावी दुपारी चार वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह अनेक नेतेमंडळी उपस्थित राहण्याची शक्‍यता आहे. 

शुक्रवारी रात्री (कै.) भालके यांचे निधन झाल्याचे पुण्यातील रुबी हॉल क्‍लिनिकमधील डॉक्‍टरांनी घोषित केले. ही बातमी सर्वत्र वाऱ्यासारखी पसरली आणि पंढरपूर, मंगळवेढा तालुक्‍यावर शोककळा पसरली. 

30 ऑक्‍टोबरला आमदार श्री. भालके यांना कोरोनाचा संसर्ग झाला. त्यांनी तातडीने पुण्यात उपचार घेतले. त्यानंतर कोरोनामुक्त झाल्यानंतर एक दिवस ते पंढरपूरला आले होते; परंतु त्यानंतर त्यांना डेंगीची लक्षणे दिसू लागल्याने पुन्हा पुण्यात त्यांच्यावर उपचार सुरू करण्यात आले होते. श्वसनाचा त्रास वाढल्याने रुबी हॉल क्‍लिनिकमध्ये त्यांना दाखल करण्यात आले. त्यातच त्यांना न्यूमोनिया झाला. अशाही परिस्थितीत तज्ज्ञ डॉक्‍टरांनी अहोरात्र शर्थीचे प्रयत्न सुरू ठेवले होते. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह अनेक नेतेमंडळींनी हॉस्पिटलमध्ये जाऊन भालके यांच्या प्रकृतीची विचारपूस केली होती. 

अखेर शुक्रवारी रात्री साडेअकरा वाजता भालके यांचे निधन झाले आणि पंढरपूर व मंगळवेढा तालुक्‍यावर शोककळा पसरली. 

शनिवारी सकाळी भालके यांचे पार्थिव पुण्याहून पंढरपूरकडे आणण्यात येणार आहे. गुरसाळे येथील श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्यावर अंत्यदर्शनासाठी काही वेळ पार्थिव ठेवण्यात येणार असून, नंतर पंढरपूर येथे श्री विठ्ठल मंदिराला वळसा घालून प्रदक्षिणा मार्गावरून सरकोली येथे नेण्यात येणार आहे. दुपारी चारच्या सुमारास सरकोली येथे अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: MLA Bhalke will be cremated at Sarkoli this afternoon