"शिरनांदगी'च्या पाण्याचे योग्य नियोजन करून द्या लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना पाणी : आमदार भालके

हुकूम मुलाणी 
Monday, 21 September 2020

शिरनांदगी तलावामध्ये म्हैसाळ योजनेच्या माध्यमातून सोडण्यात आलेल्या पाण्याने भरलेल्या तलावातील पाण्याचे पूजन आज (सोमवारी) आमदार भारत भालके यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी त्यांनी शिरनांदगी तलावातील पाणी वाटपाचे नियोजन करून लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना शेतीसाठी पाणी देण्याची व्यवस्था करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. 

मंगळवेढा (सोलापूर) : शिरनांदगी तलावातील पाणी वाटपाचे नियोजन करून लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना शेतीसाठी पाणी देण्याची व्यवस्था करण्याच्या सूचना आमदार भारत भालके यांनी संबंधित अधिकाऱ्यांना केल्या. 

शिरनांदगी तलावामध्ये म्हैसाळ योजनेच्या माध्यमातून सोडण्यात आलेल्या पाण्याने भरलेल्या तलावातील पाण्याचे पूजन आज (सोमवारी) आमदार भारत भालके यांच्या हस्ते करण्यात आले. त्या वेळी त्यांनी या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. या वेळी त्यांच्यासमवेत उपविभागीय अधिकारी उदयसिंह भोसले, तहसीलदार स्वप्नील रावडे, पोलिस निरीक्षक ज्योतिराम गुंजवटे, प्र. गटविकास अधिकारी संतोष राऊत, म्हैसाळ योजनेचे उपअभियंता बाबासाहेब पाटील, शाखा अभियंता सुभाष देवकते, मारुती वाकडे, सरपंच मायाक्का थोरबोले, गुलाब थोरबोले, ज्ञानेश्वर खांडेकर, दादा दौलतडे, भारत बेदरे, जगन्नाथ रेवे, मच्छिंद्र खताळ, यशवंत होळकर, अंबादास थोरबोले, उत्तम थोरबोले, दत्ता खांडेकर आदींसह या परिसरातील नागरिक उपस्थित होते. 

म्हैसाळ योजनेचे पाणी शिरनांदगी तलावात येण्यासाठी तब्बल 21 वर्षांची प्रतीक्षा करावी लागली, त्यानंतर आपण केलेल्या पाठपुराव्यानंतर हे पाणी या तलावात आले असून, तलावात मुबलक पाणीसाठा झाला आहे. शिरनांदगी, रड्डे, चिक्कलगी, निंबोणी येथील शेतकऱ्यांना पाणी देण्याच्या दृष्टीने सध्या कालव्यात चिलारीचे व घाणीचे साम्राज्य पसरलेले साम्राज्य दूर करून या लाभक्षेत्रात येत असलेल्या गावातील शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काचे पाणी देण्यासंदर्भात अधिकाऱ्यांनी योग्य ते नियोजन करावे, अशा सूचना देण्यात आल्या. लघु पाटबंधारे विभागाकडील भोसे, हुलजंती, लवंगी, मारोळी, पडोळकरवाडी येथील साठवण तलाव व या भागातील छोट्या पाझर तलावात कृष्णा खोऱ्यातील पावसाळ्यात वाया जाणारे पाणी म्हैसाळ उपसा सिंचन योजनेतून भरून देण्याबाबत प्रकल्प अहवालात समावेश करून घेतला आहे. त्यानुसार तलाव पाण्याने भरून देण्याबाबत त्यानुसार पाहणी करून अहवाल सादर करण्याबाबत म्हैसाळच्या अधिकाऱ्यांना सांगितले. त्यामध्ये येणाऱ्या अडचणी जलसंपदामंत्री जयंत पाटील यांच्या माध्यमातून हा प्रश्न मार्गी लावणे शक्‍य होईल, असेही आमदार भालके यांनी म्हणाले. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: MLA Bharat Bhalke suggested proper planning of Shirnandagi water