ठाकरे व पवारांच्या घरासमोर ढोल वाजवून आंदोलन करणार; आमदार पडळकर यांचा गर्भित इशारा 

Pdr Dhangar Agitation
Pdr Dhangar Agitation

पंढरपूर (सोलापूर) : राज्यातील सत्ताधारी महाविकास आघाडीने धनगर आरक्षणाचा प्रश्न तातडीने निकालात काढावा; अन्यथा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्या घरांसमोर ढोल वाजवून आंदोलन केले जाईल, असा इशारा भाजप आमदार तथा धनगर समाजाचे नेते गोपीचंद पडळकर यांनी आज पंढरपुरात दिला. 

धनगर समाजाला एसटी प्रवर्गाचे आरक्षण द्यावे, या मागणीसाठी आज राज्यभरात राज्य सरकारच्या विरोधात "ढोल बजाओ - सरकार जगाओ' आंदोलन करण्यात आले. पंढरपुरातही भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्या नेतृत्वाखाली चंद्रभागा वाळवंटात सरकार विरोधात ढोल वाजवून आंदोलन करण्यात आले. या वेळी बोलताना श्री. पडळकर यांनी सरकारला इशारा दिला. 

आमदार पडळकर म्हणाले, आरक्षणाच्या मागणीसाठी धनगर समाज गेल्या अनेक वर्षांपासून लढाई करत आहे. सत्ताधारी महाविकास आघाडीने धनगर समाजाला एसटी प्रवर्गाचे दाखले द्यावेत, ही प्रमुख मागणी आहे. आतापर्यंत सनदशीर मार्गाने आंदोलन केले आहे. सरकारने आंदोलनाची दखल घेऊन आरक्षणाचा प्रश्न निकालात काढावा; अन्यथा यापुढच्या काळात आंदोलन अधिक तीव्र केले जाईल. राज्यातील मंत्र्यांच्या घरांपुढे आंदोलन केले जाणार आहे. त्यानंतरही सरकार जागे झाले नाही तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री आणि शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक घरासमोर ढोल वाजवून आंदोलन केले जाईल, असा गर्भित इशाराही आमदार पडळकर यांनी दिला. 

"ढोल बजाओ...' आंदोलनासाठी धनगर समाजबांधवांनी आज सकाळपासूनच चंद्रभागा नदीकाठावर मोठी गर्दी केली होती. हातात पिवळे ध्वज घेऊन आणि भंडाऱ्याची उधळण करत आंदोलकांनी सरकारच्या विरोधात घोषणाबाजी केली. गावोगावचे धनगर बांधव ढोल वाजवत आंदोलनामध्ये सहभागी झाले होते. दुपारी 11 वाजता आमदार पडळकर पंढरपुरात दाखल झाले. त्यानंतर त्यांनी गळ्यात ढोल बांधून सरकार विरोधात ढोल वाजवला. 

आंदोलनानंतर आमदार पडळकर यांनी नामदेव पायरीचे व तेथूनच विठ्ठलाचे दर्शन घेतले. या वेळी त्यांनी "आरक्षण देण्याची ठाकरे - पवार सरकारला सुबुद्धी द्यावी' असे साकडेही विठ्ठलाला घातले. 

दुपारी एक वाजता तहसीलदार वैशाली वाघमारे यांना आरक्षण मागणीचे लेखी निवेदन दिले. या वेळी अहिल्यादेवी होळकर यांचे वंशज भूषणसिंहराजे होळकर, धनगर आरक्षण समितीचे प्रा. सुभाष मस्के, माऊली हळणवर, संजय माने आदींसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने आंदोलनात सहभागी झाले होते. आंदोलनादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मोठा पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com