65 एकर परिसरात रुग्णालय उभारण्यास निधी देऊ : आमदार परिचारक

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 29 मे 2020

65 एकरची पाहणी 
आज आमदार श्री. परिचारक यांनी नगराध्यक्ष साधना भोसले, उपनगराध्यक्ष अनिल अभंगराव, माजी नगराध्यक्ष लक्ष्मण शिरसट, मर्चंट बॅंकेचे अध्यक्ष नागेश भोसले, पक्षनेते ऍडव्होकेट संग्राम अभ्यंकर, मुख्याधिकारी अनिकेत मानोरकर यांच्यासह 65 एकर परिसरात कशा पद्धतीने हॉस्पिटलची उभारणी करता येईल याची पाहणी केली. 

पंढरपूर (सोलापूर) : कोरोना विषाणू नियंत्रणासाठी पंढरपूर शहराबाहेर नागरी वस्तीपासून दूर 65 एकर परिसरातील इमारतीत कोविड 19 रुणालयाची उभारणी करावी, अशी मागणी सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री दत्ता भरणे यांच्याकडे आमदार प्रशांत परिचारक यांनी केली. आमदार प्रशांत परिचारक यांनी या हॉस्पिटलसाठी सोलापूर आणि माढा मतदारसंघाचे खासदार तसेच आपल्या आमदार फंडातून प्रत्येकी 10 लाख, पंढरपूर नगरपालिकेकडून 20 लाख असा 50 लाख रुपयांचा निधी उपलब्ध करता येईल. उर्वरित निधी जिल्हा नियोजन मंडळकडून द्यावा, असा पर्याय सुचवला आहे. 
आमदार श्री. परिचारक यांनी पालकमंत्री श्री. भरणे यांच्याकडे एक लेखी निवेदन दिले आहे. त्यात त्यांनी असे नमूद केले की, पंढरपूर येथे कोरोना नियंत्रणासाठी जागेची पाहणी करण्यात येत आहे. त्यात पंढरपूर येथील उपजिल्हा रुग्णालय येथे कोविड- 19 हॉस्पिटल निर्मितीसाठी चर्चा होत असल्याने त्या भागातील नागरिक रस्त्यावर उतरून विरोध करत आहेत. 
उपजिल्हा रुग्णालय परिसरात अंबाबाई पटांगण, व्यासनारायण, रामबाग, अण्णाभाऊ साठेनगर, मेहतर कॉलनी, नगरपालिका कामगार कॉलनी, कोळी गल्ली, अनिलनगर यासह अनेक झोपडपट्ट्या असून तेथे अंदाजे आठ ते 10 हजार नागरिक दाटीवाटीने राहात आहेत. त्यामुळे उपजिल्हा रुग्णालयात कोविड हॉस्पिटल उभारण्यास त्या परिसरातील नागरिकांकडून विरोध केला जात आहे. त्या भागातील नागरिकांची ही मागणी रास्त असून भविष्यात कोरोनाचा संसर्ग तेथील झोपडपट्टीत पसरल्यास रोगावर नियंत्रण करणे अवघड होईल. प्रशासनातर्फे एक ते दीड महिन्यापूर्वी उपजिल्हा रुग्णालयाची पाहणी करण्यात आली होती. त्या रुग्णालयात लहान-मोठे आजार, सर्दी, ताप, खोकला, अपघात अशा अन्य उपचारासाठी शहर व ग्रामीण भागातील रुग्णांची नेहमी सोय होत असल्याचे कारण देत तेथे हॉस्पिटल होऊ नये असा निर्णय घेण्यात आला होता. परंतु, मागील काही दिवसांपूर्वी अचानक निर्णय बदलून उपजिल्हा रुग्णालयात कोविड हॉस्पिटल करण्याविषयी चर्चा चालू झाली आहे. 
शहरातील खासगी दवाखान्यांच्या परिसरातील व उपजिल्हा रुग्णालय परिसरातील नागरिकांचा विरोध लक्षात घेता सदर कोविड-19 हॉस्पिटलची उभारणी 65 एकरांतील प्रशस्त शासकीय जागेवर केली तर सगळ्यांच्या दृष्टीने योग्य असेल. 65 एकर परिसरात कोविड-19 हॉस्पिटल उभाणीसाठी सुमारे एक कोटी रुपये खर्च करावे लागतील. या कामासाठी सोलापूर आणि माढा या दोन्ही मतदारसंघांचे खासदार तसेच आपल्या आमदार फंडातून प्रत्येकी 10 लाख रुपये आणि नगरपालिकेकडून 20 लाख रुपयांचा निधी उपलब्ध होऊ शकतो. उर्वरित 50 लाख रुपयांचा निधी आपण जिल्हा नियोजन अंतर्गत उपलब्ध करून दिल्यास हॉस्पिटल उभा राहू शकेल. 
दरम्यान, आज दुपारी माजी नगराध्यक्ष लक्ष्मण शिरसट, बांधकाम समितीचे सभापती विक्रम शिरसट, नगरसेवक अक्षय गंगेकर यांच्यासह तेथील शेकडो नागरिकांनी उपजिल्हा रुग्णालय परिसरात जाऊन विरोध दर्शवला. पोलिसांनी हस्तक्षेप करून गर्दी हटवली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: MLA Paricharak say We will provide funds to build a hospital in an area of 65 acres