पूरग्रस्त शेतकऱ्यांसह मच्छिमारांना दिले आमदार प्रणिती शिंदे यांनी मदतीचे आश्‍वासन 

अश्‍पाक बागवान 
Friday, 23 October 2020

भीमा नदी काठावरील पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या नुकसानीची भरपाई तातडीने व रोख स्वरूपात मिळावी, यासाठी शासनाकडे पाठपुरावा करणार असून, मच्छिमार व्यावसायिकांना स्वतः आर्थिक मदत देणार आहे, असे आश्‍वासन आमदार प्रणिती शिंदे यांनी बेगमपूर, मिरी, अरबळी (ता. मोहोळ) भागातील पूरग्रस्त भागाच्या पाहणी दौऱ्यादरम्यान दिले. 

बेगमपूर (सोलापूर) : भीमा नदी काठावरील पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या नुकसानीची भरपाई तातडीने व रोख स्वरूपात मिळावी, यासाठी शासनाकडे पाठपुरावा करणार असून, मच्छिमार व्यावसायिकांना स्वतः आर्थिक मदत देणार आहे, असे आश्‍वासन आमदार प्रणिती शिंदे यांनी बेगमपूर, मिरी, अरबळी (ता. मोहोळ) भागातील पूरग्रस्त भागाच्या पाहणी दौऱ्यादरम्यान दिले. 

महापुरामुळे भीमा नदी काठावरील माचणूर, बेगमपूर, अरबळी,मिरी या भागातील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. पिकांबरोबरच शेतातील मातीही पुराच्या पाण्यात वाहून गेली आहे. यामुळे शेतकरी वर्ग आर्थिक संकटात सापडला आहे. अशा परिस्थितीत महसूल विभागाने तत्काळ व योग्य पद्धतीने पंचनामे करावेत. पूर काळात पडलेले विजेचे खांब, बंद पडलेल्या डीपींची तातडीने दुरुस्ती करून वीजपुरवठा तत्काळ सुरळीत करावा व सुरू असलेला वीजपुरवठा नियमित व अखंड सुरू ठेवावा, अशा सूचना आमदार शिंदे यांनी महावितरण अधिकाऱ्यांना दिल्या. तसेच पूरस्थिती व झालेले नुकसान पाहता पूरग्रस्त कुटुंबीय व शेतकऱ्यांना अन्नधान्य वाटपासह नुकसान भरपाईची रक्कम रोख स्वरूपात व तातडीने मिळावी आदी सूचनाही आमदार शिंदे यांनी महसूल प्रशासनाला दिल्या. 

अनेक मच्छिमार व्यावसायिकांचे माशांचे जाळे पुराच्या पाण्यात वाहून गेले आहेत. अशा मच्छिमार व्यावसायिकांना जाळे खरेदीसाठी स्वतः रक्कम देणार असल्याचे आश्वासन आमदार शिंदे यांनी दिले. 

या वेळी कॉंग्रेस सेवादलाचे जिल्हाध्यक्ष राजेश पवार, अनुसूचित विभागाचे जिल्हाध्यक्ष गौरव खरात, तालुकाध्यक्ष अशोक देशमुख, जिल्हा सरचिटणीस तथा माजी सरपंच रफिक पाटील, कॉंग्रेस निरीक्षक सुलेमान तांबोळी, सरपंच हरिभाऊ काकडे, माजी सरपंच लक्ष्मण माने, नुरुद्दीन शेख, अशोक सतपळ, उपसरपंच बसाप्पा पुजारी, अशोक पुजारी, भीमाशंकर पुजारी, श्रीशैल्य पाटील, मनोहर पाटील, महिबूब पटेल, हरिदास कांबळे, संग्राम चव्हाण, आरिफ पठाण, संतोष शिंदे, महादेव सुरवसे, तलाठी गणेश साठे, भागवत महाडिक, ग्रामसेवक हरीश पवार आदींसह मच्छिमार उपस्थित होते. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: MLA Praniti Shinde assured help to the fishermen along with the flood affected farmers