राज्यातील खाजगी सूतगिरणी संघटनेच्या अध्यक्षपदी आमदार संजय शिंदे 

विजयकुमार कन्हेरे 
Wednesday, 28 October 2020

सहकारी व खासगी गिरण्यांच्या दिलेल्या सवलतीतील भेदभावामुळे उत्पादन खर्चामध्ये सुमारे पंचवीस रुपये प्रतिकिलो फरक पडत आहे. खासगी सुतगिरणी संघटनेच्या माध्यमातून विविध प्रश्न सोडविण्यासाठी, शासनाकडे पाठपुरावा करण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत एका बैठकीचे आयोजन करणार असल्याचे आमदार शिंदे यांनी सांगितले. 

कुर्डुवाडी (सोलापूर) : महाराष्ट्र राज्यातील खासगी सूतगिरणी संघटनेच्या विविध पदाधिकाऱ्यांच्या म्हैसगाव येथील विठ्ठल कार्पोरेशनमध्ये झालेल्या बैठकीत आमदार संजय शिंदे यांची संघटनेच्या अध्यक्षपदी सर्वानुमते निवड करण्यात आली. 

यावेळी संघटनेचे उपाध्यक्ष व त्रिमुर्ती स्पिनर्सचे उल्हासराव सुर्यवंशी, यशवंत शिंदे, विराज स्पिनर्सचे किरण तारळेकर, विठ्ठल कार्पोरेशनचे संजय जमदाडे, अरविंद ग्रुपचे शामसुंदर मर्दा, त्रिमुर्ती स्पिनर्सचे भुषण म्हेत्रे, लक्ष्मी कॉटस्पिनचे संजय राठी, औताडे स्पिनर्सचे सुनिल कमते, धनस्मृती स्पिनर्सचे आबासाहेब कोटकर व इंडिया टेरीटॉवेलससह अनेक सुतगिरणीचे प्रतिनिधी उपस्थित होते. 

आमदार शिंदे म्हणाले, राज्यात सुमारे 130 सहकारी सूतगिरण्या असून त्यातील साठ ते सत्तर टक्केच्या आसपास सध्या उत्पादनाखाली आहेत. 90 ते 95 खासगी सूतगिरण्यामध्ये सुमारे 19 लाख चात्या सुरु असून सुमारे पाच हजार कोटी रुपयाची गुंतवणुक झाली आहे. खासगी सूतगिरण्या गेल्या चार वर्षापासून वस्त्रोद्योगातील मंदी, कापसाच्या दरातील चढउतार तसेच केंद्र व राज्य शासनाच्या काही धोरणांमुळे आर्थिक अडचणीत आहेत. 2011 ला राज्य शासनाने कापसाच्या हिंसक तेजी मंदीच्या नुकसानीपोटी फक्त सहकारी गिरण्यांना त्या काळातील सूत उत्पादनास प्रतिकिलो वीस रुपयांप्रमाणे अनुदान दिले. 2017-18 ला प्रती स्पिंडलला तीन हजार रुपयांचे व्याजमुक्त कर्ज दिले. 2018 च्या वस्त्रोद्योग धोरणात सहकारी गिरण्यांना एक रुपया जादा वीजदर सवलत दिली व आता फक्त सहकारी गिरण्यांना गेल्या दोन वर्षातील कापूस खरेदीच्या 10 टक्के कापूस अनुदान देण्यासाठी कार्यवाही सुरु केली आहे. सहकारी व खासगी गिरण्यांच्या दिलेल्या सवलतीतील भेदभावामुळे उत्पादन खर्चामध्ये सुमारे पंचवीस रुपये प्रतिकिलो फरक पडत आहे. खासगी सूतगिरणी संघटनेच्या माध्यमातून विविध प्रश्न सोडविण्यासाठी, शासनाकडे पाठपुरावा करण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत एका बैठकीचे आयोजन करणार असल्याचे आमदार शिंदे यांनी सांगितले. खासगी सूतगिरणी संघटनेचे संचालक किरण तारळेकर म्हणाले, की आमदार संजय शिंदे यांच्या नेतृत्वाखाली राज्यभरातील खासगी सूतगिरणी चालकांचे प्रश्न सोडविण्यासाठी आम्ही सर्व पदाधिकारी प्रयत्नशील राहणार आहोत. 

संपादन : वैभव गाढवे 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: MLA Sanjay Shinde as the president of the states private spinning mill association