
राष्ट्रीय महामार्गाचा अडथळा झाला दूर
शेळगी परिसरातील सब स्टेशनच्या कामामधील दोन मिटरच्या कामास राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी हरकत घेतली होती. ही बाब आमदार विजयकुमार देशमुख यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांशी बोलून तात्काळ मार्ग काढून दिला. त्यामुळे या कामाला अधिक गती येणार आहे.
सोलापूर : सोलापुरातील शेळगी, मित्र नगर, सन्मित्र नगर, विद्या नगर या परिसरात सतत विद्युत पुरवठा खंडित होत होता. सततच्या या खंडीत विद्युत पुरवठ्यामुळे येथील नागरिक हैराण झाले होते. शेळी परिसराला विद्युत पुरवठा करणारे सबस्टेशन दक्षिण सोलापूर तालुक्यातील उळे येथे आहे. या सबस्टेशनमधून विद्युतपुरवठा होताना कोणतीही तांत्रिक अडचण आल्यास त्याचा संपूर्ण परिणाम शेळगी व परिसरातील विद्युत पुरवठ्यावर होत होता. सोलापूर शहर उत्तरचे भाजप आमदार विजयकुमार देशमुख यांनी हा प्रश्न कायमस्वरुपी मार्गी लावला आहे. सोलापूरचे पालकमंत्री म्हणून काम करताना आमदार विजयकुमार देशमुख यांनी शेळगी व परिसरासाठी स्वतंत्र सब स्टेशन मंजूर करुन घेतले. हे काम आता अंतिम टप्प्यात आले आहे.
आमदार विजयकुमार देशमुख यांनी सोलापूरचे पालकमंत्री म्हणून काम करताना जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून या कामासाठी 26 लाख रुपये मंजूर केले होते. त्यामुळे शेळगी भागासाठी स्वतंत्र सब स्टेशन तयार झाले आहे. शेळगीतील या सब स्टेशनसाठी विद्युत पुरवठ्याचे स्वतंत्र 35 खांब टाकून त्यावरून स्वतंत्र एक्सप्रेस लाईन टाकण्यात आली आहे. या योजनेतून उळे परिसरातील शितल हॉटेल पर्यंत पस्तीस पोल टाकण्याचे काम सध्या अंतिम टप्प्यात आहे. या कामाची पाहणी आमदार विजयकुमार देशमुख यांनी केली. हे काम लवकरात लवकर पूर्ण करुन शेळगी परिसराला नियमित विद्युत पुरवठा करण्याच्या सूचना आमदार देशमुख यांनी केल्या आहेत.
या कामाची पाहणी करताना विद्युत वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांसोबतच प्रभाग दोनचे नगरसेवक डॉ. किरण देशमुख, अमर पुदाले, नारायण बनसोडे, प्रभाग एकचे नगरसेवक अविनाश पाटील, संजय कणके, शंकर शिंदे, ज्ञानेश्वर कारभारी, सोलापूर बाजार समितीचे संचालक बसवराज इटकळे, सोमनाथ रंगबल्ले उपस्थित होते. शेळगी परिसरात सातत्याने विज पुरवठ्याची समस्या आहे. त्यामुळे या परिसरातील नागरिक आणि लहान मोठे व्यावसायिक त्रस्त आहेत. स्वतंत्र सब स्टेशनमुळे ही समस्या आता कायमस्वरुपी मिटणार आहे.