#BHAGWANMAHAVEERJAYANTI : `या` शहरात भारतीय जैन संघटनेतर्फे"मोबाईल डिस्पेन्सरी' सेवा 

विजयकुमार सोनवणे
सोमवार, 6 एप्रिल 2020

2113 रक्त पिशव्यांचे संकलन 
कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर भारतीय जैन संघटनेच्या वतीने राज्यभरातून 2113 रक्तपिशव्यांचे संकलन करण्यात आले. त्यामध्ये सोलापूर 560, पुणे 359, औरंगाबाद 230, धुळे 196, नासिक142, बीड 140, बुलडाणा 113, कोल्हापूर 100, अमरावती 61, चंद्रपूर 59, सत्नागिरी 51, उस्मानाबाद 35, लातूर 35, नागपूर 20 आणि गोंदिया 12 असे रक्तसंकलन झाले आहे. 
- केतनभाई शहा, राज्य उपाध्यक्ष, 
भारतीय जैन संघटना 

सोलापूर  :  भगवान महावीर यांच्या जयंतीनिमित्त भारतीय जैन संघटनेतर्फे घरपोच वैद्यकीय सेवा देण्याचा उपक्रम सुरु करण्यात आला आहे. महापालिकेत आयोजिलेल्या जयंती कार्यक्रमानंतर संघटनेचे राज्य उपाध्यक्ष केतन शहा यांनी ही माहिती दिली. दरम्यान, भगवान महावीर यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षी होणारे सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत, असेही त्यांनी सांगितले. 

सोलापूर जिल्हा प्रशासन व भारतीय जैन संघटनेच्या वतीने हा उपक्रम राबविला जाणार आहे. कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे सोलापूर शहरात संचारबंदी सुरु आहे. त्यामुळे कोणतीही वाहतूक व्यवस्था नाही. त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांना दवाखाने किंवा रुग्णालयात जाऊन उपचार घेणे अवघड झाले आहे. ही अडचण ध्यानात घेऊन अशा रुग्णांना रुग्णसेवा मिळावी म्हणून भारतीय जैन संघटनेने पुढाकार घेतला आहे. 

या उपक्रमांतर्गत वैद्यकी अधिकारी व डॉक्‍टर आजारी व्यक्तीच्या घरी जाऊन तपासणी करणार आहेत. तसेच योग्य तो सल्ला संबंधितांना देणार आहेत. संचारबंदीच्या कालावधीत सकाळी दहा ते दुपारी दोन या वेळेत शहर गावठाण, तर दुपारी दोन ते सायंकाळी सहा या वेळेत जुळे सोलापूर भागात ही डिस्पेन्सरी उपलब्ध असणार आहे. या सेवेसाठी कोणतेही शुल्क घेण्यात येणार नाही. ही सेवा देण्यासाठी इच्छुक असलेल्या डॉक्‍टर व परिचारिकांनी अधिक माहितीसाठी शाम पाटील (8999908660) या क्रमांकावर संपर्क साधावा. 

 

प्रतिमेत याचा समावेश असू श्‍ाकतो: ७ लोक, Revansiddha Javalekar आणि Gopinath Sadaphule समाविष्टित, लोकं उभी आहेत
सोलापूर ः महापालिकेत भगवान महावीर यांना जयांतीनिमित्त अभिवादन करण्यात आले. 

महापालिकेच्या वतीने अभिवादन 
सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने पूज्य भगवान श्री महावीर यांच्या जयंती दिनानिमित्त रंगभवन चौक येथील भगवान महावीर स्तंभ, जुना होटगी नाका येथील भगवान महावीर चौक येथील भगवान महावीर यांच्या नामफलकास महापौर श्रीकांचना यन्नम यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर महापौर यांच्या कार्यालयात भगवान महावीर यांच्या प्रतिमेस महापौर श्रीकांचना यन्नम यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी सभागृह नेते श्रीनिवास करली, गटनेते आनंद चंदनशिवे, केतनभाई शहा, उद्योजक संजीव पाटील, हर्षल कोठारी,शाम पाटील,अनिल वेद, महेश जाबक,जनसंपर्क अधिकारी विजयकुमार कांबळे आदी मान्यवर उपस्थित होते. 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: mobail dispensari by bhartiya jain sanghtana in solapur