ग्रामीण पोलिसांचा वाळू माफियांना दणका ! केला 29 लाखांचा मुद्देमाल जप्त

चंद्रकांत देवकते 
Friday, 28 August 2020

मोहोळ पोलिसांना तालुक्‍यात गुरुवारी (ता . 27) पेट्रोलिंग करत असताना आष्टे गावालगत असलेल्या सीना नदीपात्रातून मोठ्या प्रमाणात अवैध वाळूची वाहतूक होत असल्याची माहिती मिळाली. ते पहाटे चार वाजण्याच्या दरम्यान त्या ठिकाणी गेले असता सीना नदीच्या पात्रातून वाळू उपसा करून ट्रॅक्‍टरद्वारे त्याची वाहतूक सुरू असल्याचे निदर्शनास आले. 

मोहोळ (सोलापूर) : तालुक्‍यातील आष्टे येथून सीना नदीपात्रातून अवैध वाळू उपसा करून वाहतूक करणाऱ्या चार ट्रॅक्‍टरवर सोलापूर ग्रामीणच्या विशेष पोलिस पथकाने कारवाई करत 24 लाख 32 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. तसेच आष्टे येथील पाच जणांवर गुन्हा दाखल केला तर मोहोळ पोलिसांनी मनगोळी येथे भोगावती नदी पात्रातून वाळू वाहतूक करत असताना एका ट्रॅक्‍टरवर कारवाई करत पाच लाखांचा मुद्देमाल जप्त करून एकावर गुन्हा दाखल केला. 

हेही वाचा : गौरी-लक्ष्मीच्या सणाला दरवाजा उघडा ठेवला अन्‌ चोरट्याने... 

याबाबत मोहोळ पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सोलापूर ग्रामीण पोलिसांचे विशेष पथक पोलिस निरीक्षक विनय बहीर, पोलिस कॉन्स्टेबल शैलेश जाधव, मदने, झिरपे, भोईटे, हेमाडे व एनगुले यांना मोहोळ तालुक्‍यात गुरुवारी (ता . 27) पेट्रोलिंग करत असताना आष्टे गावालगत असलेल्या सीना नदीपात्रातून मोठ्या प्रमाणात अवैध वाळूची वाहतूक होत असल्याची माहिती मिळाली. ते पहाटे चार वाजण्याच्या दरम्यान त्या ठिकाणी गेले असता सीना नदीच्या पात्रातून वाळू उपसा करून ट्रॅक्‍टरद्वारे त्याची वाहतूक सुरू असल्याचे निदर्शनास आले. 

हेही वाचा : सोलापूर जिल्ह्यात युरियाची पुरेशा प्रमाणात उपलब्धता 

पोलिसांच्या पथकाला बघून वाळू माफियांसह कामगारांनी पळ काढण्याचा प्रयत्न केला; परंतु पोलिसांनी सूरज संभूदेव मासाळ, कुंडलिक काशिनाथ सोंडगे, नवनाथ सुरेश नरोटे, जहॉंगीर नसरुद्दीन शेख व सागर दादाराव नरोटे (सर्व रा. आष्टे) अशा पाच जणांना पकडले व एमएच 13 - जे 7909, एमएच 13 - डीई 1631, एमएच 13 - एजे 8801 व एक नंबर नसलेला अशा चार ट्रॅक्‍टरला वाळूसह ताब्यात घेतले. ट्रॅक्‍टर व वाळू असा एकूण 24 लाख 32 हजार 200 रुपयांचा मुद्देमाल जप्त करून वरील पाच जणांवर मोहोळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला. तसेच मोहोळ पोलिस ठाण्याच्या पथकाने मनगोळी गावच्या हद्दीत भोगावती नदीपात्रातून नंबर नसलेल्या ट्रॅक्‍टरला वाळू वाहतूक करताना पकडले. मैफल जालीक शेख (रा. वैराग) याला ताब्यात घेत पाच लाख आठ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला व गुन्हा दाखल केला. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The Mohol police filed a case against the sand mafia