नवे संकट : "या' प्रकारामुळे महावितरणच्या कर्मचाऱ्यांची कसोटी 

नवे संकट : "या' प्रकारामुळे महावितरणच्या कर्मचाऱ्यांची कसोटी 

सोलापूर : कोरोना आपत्तीमध्ये महावितरणच्या अभियंता, कर्मचाऱ्यांना अडचणींना सामोरे जावे लागत आहे. शहरी व ग्रामीण भागात साप, मांजर, उंदीर तसेच पक्ष्यांमुळे वीजपुरवठा खंडित होत असल्याचे आढळून येत आहे. पंतप्रधानांनी रविवारी घरातील वीज बंद करण्याचे आवाहन केल्याने काय परिणाम होतील या विवंचनेत असलेल्या महावितरणच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना साप, पक्ष्यांमुळे होत असलेल्या खंडीत वीज पुरवठ्यामुळे कसोटीला सामोरे जावे लागत आहे. 

साप येऊ लागले जमिनीवर 
अवकाळी वादळी व मुसळधार पावसामुळे भूगर्भात उकाडा वाढल्याने प्रामुख्याने विषारी, बिनविषारी साप जमिनीवर येत आहेत. शहरांसह जिल्ह्याच्या काही भागात चार ते पाच फुटांचे मृत साप रस्त्यालगतचे फिडर पिलर्स, भूमिगत वीजवाहिन्यांच्या खोदकामात, रोहित्राच्या वीजयंत्रणेत, वीजखांबांवर आदी ठिकाणी दिसून आलेले आहेत. या सापांमुळे शार्टसर्कीट झाल्याने वीजपुरवठा देखील खंडित झाला होता. काही ठिकाणी दुरुस्तीची कामे करताना प्रामुख्याने फिडर पिलर्स किंवा भूमिगत वीजवाहिन्यांच्या खोदकामत जिवंत साप आढळून आलेले आहेत. अभियंता व जनमित्रांनी दुरुस्तीच्या कामांमध्ये सापांच्या अस्तित्वाची शक्‍यता पाहून योग्य खबरदारी घ्यावी व सतर्क राहावे, असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे. यासोबतच प्रामुख्याने ग्रामीण भागात वीजखांबांच्या टोकावर प्रामुख्याने कावळा आणि त्यापेक्षा मोठ्या आकाराचे पक्षी बसल्याने शार्टसर्कीट होऊन वीजपुरवठा खंडित होत असल्याचे प्रकार दिसून येत आहेत. 

.. तर वीज तारा वितळण्याची शक्‍यता 
सध्या कोरोना विषाणूंची आपत्ती सुरु असल्याने घरात साठलेला ओला व सुका कचरा वीजयंत्रणेजवळ टाकण्याचे प्रकार दिसून येत आहेत. शहरी व ग्रामीण भागात अनेक ठिकाणी वीजवाहिन्या, फिडर पीलर, रोहित्र, डिस्ट्रीब्यूशन बॉक्‍स, डीपी आदी वीजयंत्रणेजवळील उघड्यावर असलेल्या जागेत घरातील कचरा दिसून येत आहे. वीजयंत्रणेजवळ साठवलेला कचरा पेटविल्याने किंवा जळाल्याने जवळच असलेल्या विजेच्या भूमिगत केबल व इतर वीजयंत्रणा आगीमुळे नादुरुस्त होण्याची शक्‍यता आहे. ओव्हरहेड वीजतारांखाली असलेल्या कचऱ्याच्या ढिगारा पेटविल्यामुळे किंवा त्यास आग लागल्यामुळे वीजतारा वितळून वीज खंडित होण्याचा धोका आहे. 


 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com