महापालिकेचा आरोग्य विभाग अन्‌ डॉ. जमादार वाऱ्यावर?, डॉ. संतोष नवले धुळ्याला तर डॉ. शीतलकुमार जाधव सोलापूर झेडपीला 

प्रमोद बोडके
Wednesday, 30 September 2020

शहरात चाचण्या वाढेना, ग्रामीणमध्ये मृत्यू थांबेना 
महापालिका हद्दीतील चाचण्यांची संख्या वाढत नसल्याने नव्याने आढळणाऱ्या बाधितांची संख्याही आपोआपच घटली आहे. त्यामुळे सोलापूर महापालिका हद्दीतील कोरोना आटोक्‍यात आला अशीच काहीशी समजूत झाली आहे. ग्रामीण भागात चाचण्यांची संख्या वाढली आहे. माळशिरस, माढा, पंढरपूर, सांगोला आणि बार्शी या तालुक्‍यातील कोरोनाबाधितांची आणि मृतांची संख्या मोजत बसणे एवढेच काम प्रशासकिय यंत्रणेसमोर राहिले आहे. आरोग्य अधिकारी बदलले आता कोरोनाची स्थिती बदलावी अशीच अपेक्षा व्यक्त होत आहे. 

सोलापूर : कोरोनाचे संकट सुरू झाल्यापासून महापालिकेच्या आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांचा सुरु असलेला लपंडाव अद्यापही कायम आहे. चाचण्या कमी केला म्हणून सोलापूर महापालिका हद्दीतील कोरोनाबाधितांची संख्या घटली आहे. अद्यापही महापालिका हद्दीतील कोरोनाचे संकट कायम असताना राज्य शासनाच्या आरोग्य विभागाने पुन्हा एकदा सोलापूर शहर व महापालिकेचा आरोग्य विभाग वाऱ्यावर सोडला आहे. सार्वजनिक आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांच्या बदल्यांमध्ये महापालिकेच्या आरोग्य विभागाला पूर्णवेळ अधिकारी आणि जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भिमाशंकर जमादार यांना नियुक्ती देण्यात आलेली नाही. 

महापालिका हद्दीतील कोरोना आटोक्‍यात आणण्यात अपयशी ठरले म्हणून महापालिकेचे पूर्णवेळ आरोग्य अधिकारी डॉ. संतोष नवले यांच्याकडील पद्‌भार जूनमध्ये काढून घेण्यात आला. हा पद्‌भार काही दिवसांसाठी डॉ. मंजिरी कुलकर्णी यांना देण्यात आला. पूर्णवेळ व सक्षम आधिकाऱ्याची मागणी त्यानंतरही कायम राहिल्याने महापालिकेच्या आरोग्य विभागाचा अतिरिक्त कारभार सोलापुरातील कुष्ठरोग विभागाचे सहाय्यक संचालक डॉ. शितलकुमार जाधव यांच्याकडे देण्यात आला. अवघ्या तीन महिन्यांमध्ये शासनाने डॉ. जाधव यांची विनंती मान्य केली आणि त्यांची बदली सोलापूर जिल्हा परिषदेत आरोग्य अधिकारी म्हणून केली आहे. ही बदली करत असताना महापालिकेच्या आरोग्य अधिकारी पदाचा प्रश्‍न शासनाने कायम ठेवला आहे. 

जिल्हा परिषदेतील जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भीमाशंकर जमादार यांना नियुक्ती देण्यात आलेली नाही. त्यामुळे त्यांच्याही नियुक्तीचा प्रश्‍न कायम आहे. सेवानिवृत्तीच्या मुद्यावरुन डॉ. जमादार यांचा प्रश्‍न न्यायालयात असल्याचे समजते. महापालिकेतील कोरोना आटोक्‍यात आणण्यात अपयशी ठरलेले महापालिकेचे तत्कालिन आरोग्य अधिकारी डॉ. संतोष नवले यांच्या नियुक्तीचा प्रश्‍न सुटला आहे. जवळपास जूनपासून नियुक्तीच्या प्रतिक्षेत असलेल्या डॉ. नवले यांची प्रशासकिय बदली धुळे जिल्हा आरोग्य अधिकारी या पदावर करण्यात आली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Municipal Health Department and Dr. Jemadar on the wind ?, dr. Santosh Navale Dhulya while Dr. Sheetal Kumar Jadhav to Solapur ZP