esakal | सोलापूर शहर-जिल्ह्यात आहेत अनेक तीर्थक्षेत्रे व पर्यटनस्थळे ! त्यांचे व्हावे मार्केटिंग : निसर्गप्रेमी व व्यावसायिकांची अपेक्षा 
sakal

बोलून बातमी शोधा

Solapur Pigrimage

सोलापूर शहर व जिल्ह्याला आध्यात्मिक पर्यटनाचा खूप मोठा वारसा लाभलेला आहे. तुळजापूर, गाणगापूर यासह सोलापूरच्या शेजारी मोठी तीर्थक्षेत्रे आहेत. सुखात आणि दु:खात असताना देवाकडे जाणाऱ्यांचे प्रमाण अधिक आहे. त्यामुळे सोलापूर जिल्ह्यात कायमस्वरूपी पर्यटक, भाविक येत असतात. तिरुमला तिरुपती देवस्थान आणि शिर्डी या ठिकाणी ज्या पद्धतीने आध्यात्मिक पर्यटन आहे, अगदी तशीच स्थिती सोलापूरची देखील आहे. 

सोलापूर शहर-जिल्ह्यात आहेत अनेक तीर्थक्षेत्रे व पर्यटनस्थळे ! त्यांचे व्हावे मार्केटिंग : निसर्गप्रेमी व व्यावसायिकांची अपेक्षा 

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

सोलापूर : पंढरपूर, अक्कलकोट येथील प्रमुख देवस्थानांसह सोलापूर शहर व जिल्ह्यात लहान-मोठी तीर्थक्षेत्रे आहेत. सर्वांत मोठे उजनी धरणदेखील सोलापूर जिल्ह्यात आहे. कृषी, वैद्यकीय, आध्यात्मिक पर्यटनाला सोलापूर जिल्ह्यात खूप मोठी संधी आहे. सोलापूरच्या पर्यटनाचे मार्केटिंग व्हावे, या मार्केटिंगमधून पर्यटनाशी निगडित उद्योग व व्यवसायला चालना मिळावी, अशी अपेक्षा सोलापुरातील हॉटेल, लॉज, ट्रॅव्हल्स व्यावसायिकांनी व्यक्त केली आहे. आज (ता. 25) जागतिक पर्यटन दिनाच्या पार्श्‍वभूमीवर पर्यटनाशी निगडित असलेल्या व्यावसायिकांशी "कॉफी विथ सकाळ'च्या माध्यमातून साधलेला हा संवाद. या संवादातून त्यांनी व्यक्त केलेल्या अपेक्षांचा थोडक्‍यात सारांश. 

सोलापूर शहर व जिल्ह्याला आध्यात्मिक पर्यटनाचा खूप मोठा वारसा लाभलेला आहे. तुळजापूर, गाणगापूर यासह सोलापूरच्या शेजारी मोठी तीर्थक्षेत्रे आहेत. सुखात आणि दु:खात असताना देवाकडे जाणाऱ्यांचे प्रमाण अधिक आहे. त्यामुळे सोलापूर जिल्ह्यात कायमस्वरूपी पर्यटक, भाविक येत असतात. तिरुमला तिरुपती देवस्थान आणि शिर्डी या ठिकाणी ज्या पद्धतीने आध्यात्मिक पर्यटन आहे, अगदी तशीच स्थिती सोलापूरची देखील आहे. सोलापुरातील आध्यात्मिक ठिकाणांचा लाभ येथील हॉटेल व्यावसायिकांना व्हावा, यासाठी ठोस प्रयत्न अपेक्षित आहेत. सोलापूरच्या ज्या चांगल्या बाजू आहेत, त्याला अधिक प्रसिद्धीची आवश्‍यकता आहे. सोलापूर जिल्ह्यातील हुरडा, डाळिंब, केळी, द्राक्ष, सीताफळ यासह जेवढीही शेतीपिके आहेत, त्यांना चांगली बाजारपेठ मिळू शकते. त्यासाठी देखील प्रयत्नांची आवश्‍यकता आहे. 
- इंद्रजित पवार, 
हॉटेल व्यावसायिक 

सोलापूर परिसराला आध्यात्मिक पर्यटनाचे जेवढे महत्त्व आहे त्यापेक्षा अधिक महत्त्वाचे येथील निसर्ग पर्यटन देखील आहे. हिप्परगा तलावासोबत कुरनूरचे पक्षी वैभव आता विशेष झाले आहे. नान्नज, वंगेवाडी भागातील माळरानातील जैवविविधता, विदेशी पक्षी यांसह अनेक पक्ष्यांची वाढलेली संख्या ही पक्षी पर्यटनासाठी एक मोठी संधी आहे. ही माळराने म्हणजे पक्षी निरीक्षणाची मोठी संधी आहे. या अर्थाने देखील निसर्ग पर्यटनाचा टक्का वाढला पाहिजे. जिल्ह्यातील निसर्गप्रेमी विद्यार्थी, नागरिक व महिलांना हा निसर्गाचा ठेवा पर्यटक म्हणून अनुभवता आला पाहिजे. शहरातील स्मृतीवन, सिद्धरामेश्‍वर तलाव, सिद्धेश्‍वर वनविहार, भुईकोट किल्ला यांसारखी ठिकाणे पर्यटन वाढीचे नवे मानदंड बनले पाहिजेत. या पर्यटनस्थळी बाहेरगावातील पर्यटकांसाठी माहिती फलक असावेत. या स्थळांच्या इतिहासावची या ठिकाणी माहिती द्यायला हवी. या पद्धतीने निसर्ग पर्यटन केवळ पक्षी निरीक्षणापुरते न राहता सर्वसामान्यांना देखील निसर्ग पर्यटनाची गोडी लावणे महत्त्वाचे आहे. सोलापूरला पुढील काळात आध्यात्मिक पर्यटनानंतर निसर्ग पर्यटनाला देखील निश्‍चित वाव आहे. 
- शिवानंद हिरेमठ, 
पक्षी निरीक्षक 

सोलापुरात जे पर्यटक येतात, त्यांना नेमके काय हवे असते, हे जाणून घेतले पाहिजे. अक्कलकोट, तुळजापूर व पंढरपूर येथे पुण्या-मुंबईचे लोक नियमित दर्शनासाठी येतात. इतर भागातील पर्यटक येण्यासाठी रस्त्याच्या अडचणी आहेत. नांदेड, विजयपूर व कोल्हापूर भागातून येण्यासाठी खराब रस्त्यांचा अडथळा दूर झाला पाहिजे. सोलापूर शहरामध्ये भव्य गार्डन असले पाहिजे. शेगाव, अक्कलकोटप्रमाणे एखादे भव्य गार्डन असले तर पर्यटक तेथे जास्त वेळ थांबतात. मुख्य म्हणजे पर्यटन वाढीसाठी एअरपोर्ट होण्याची गरज आहे. वॉटर पार्कची संख्या वाढवली पाहिजे. इतर राज्यामध्ये पोलिस जेव्हा पर्यटकांची गाडी थांबवतात, तेव्हा ते त्यांना दंड किंवा त्रास न देता पर्यटन स्थळाचा पत्ता समजावून सांगतात. तशी पर्यटकांसाठी सहकार्याची भूमिका आपल्याकडे पोलिसांची असली पाहिजे. आम्ही देखील आमचा चालक निर्व्यसनी असावा, वाहनाची स्वच्छता व चांगली सेवा द्यावी, या उद्देशाने पर्यटकांचे लक्ष वेधून घेतो. याचप्रमाणे सर्व पर्यटनस्थळी देखील सकारात्मक विचार वाढायला हवा. 
- नागेश बेनूरकर, 
ट्रॅव्हल उद्योजक 

नुकत्याच भारतीय किनारपट्टीच्या अंतर्गत केलेल्या पर्यटन प्रवास मोहिमेनंतर सोलापूरच्या पर्यटनाबाबत नवी आशा निर्माण झाली आहे. चिल्का पक्षी निरीक्षण केंद्रावर जेवढे पक्षी आम्ही बघितले, त्यापेक्षा अधिक पक्षी उजनी धरणावर पाहण्यास मिळतात. सोलापूर शहराची जी प्रगती पुण्याप्रमाणे चहूबाजूंनी होऊ लागली आहे, सोलापूरकरांनी त्याचे सांस्कृतिक वैभव, परंपरा, खाद्य संस्कृती, नैसर्गिक स्थळे, तलाव जतन केले पाहिजेत. सोलापूरच्या पर्यटन विकासाचा हाच पाया आहे. खरे म्हणजे स्थानिक भागात असलेली मंदिरे किंवा वास्तू शिल्पांसोबत नैसर्गिक स्थळांच्या ठिकाणी खूप अधिक पर्यटनाला संधी आहे. केवळ या गोष्टी लोकांपर्यंत पोचाव्यात व त्यांच्याकडून पर्यटकांपर्यंत नेण्याची साखळी भक्कम असायला हवी. स्मार्ट सिटी प्रकल्पाने सोलापूरला खऱ्या अर्थाने बदलले आहे. मागील अनेक दशकांपासूनच्या निरीक्षणाआधारे आंतरराष्ट्रीय पर्यटन केंद्र म्हणून सोलापूर विकसित होण्याच्या दिशेने वाटचाल सुरू व्हावी. संस्कृती जतन करत आदरातिथ्याची परंपरा विकसित झाली तर पर्यटनातून निश्‍चितपणे सोलापूरसाठी नवी संधी मिळणार आहे. 
- डॉ. विजय गोदेपुरे, 
पर्यटक 

संपादन : श्रीनिवास दुध्याल