कोरोनाला घालविण्यासाठी कडुनिंबाच्या पानांवर व्हावे संशोधन! सोलापुरातील आयुर्वेदिक कॉलेजने मागितली संशोधनास परवानगी

तात्या लांडगे
Thursday, 7 May 2020

कडुनिंबाच्या पानांमुळे वाढते रोगप्रतिकारक शक्ती
कोरोना या विषाणूवर औषध शोधण्यासाठी गुजरातमधील पारुल मेडिकल कॉलेज, हरियाणातील मेदांता मेदिसिटी, मेडिकल कॉलेज ऑफ म्हैसूर येथे तज्ज्ञांचे संशोधन सुरू आहे. दरम्यान, जगभरातील संशोधकांच्या निष्कर्षानुसार विविध प्रकारच्या व्हायरल आजारांवर कडुनिंबाची पाने अथवा त्यापासून बनवलेले औषध उपायकारक ठरल्याचे दिसून येते. या पार्श्वभूमीवर कोरोना या व्हायरसवर त्या प्रकारचे संशोधन करण्यास मान्यता मिळावी, असा प्रस्ताव शेठ गोविंदरावजी आयुर्वेदिक महाविद्यालयाने क्लिनिकल ट्रायल रजिस्ट्री ऑफ इंडियाला पाठवला आहे. त्यांच्याकडून संशोधन तथा चाचणीस मान्यता मिळाल्यानंतर सोलापुरातही संशोधनाला सुरुवात होईल, असा विश्वास संशोधक  डॉ . कुंभोजकर व डॉ पल्लवी कुलकर्णी तसेच मार्गदर्शक डॉ . मुकुंद मोरे यांनी व्यक्त केला आहे.

सोलापूर : एचआयव्हीसह एचपीव्ही, एचएसव्ही, इन्फ्ल्यूंझा अशा विविध व्हायरल आजारांवर कडुनिंबाच्या पानांपासून बनवलेली औषधे उपायकारक ठरतील, असे जगभरातील संशोधकांनी मान्य केले आहे. या पार्श्वभूमीवर कोरोना या विषाणूवरही अशा औषधांचा शोध घेणे गरजेचे आहे. त्यामुळे कडुनिंबाच्या पानांवर संशोधन करण्यास परवानगी मिळावी, असा प्रस्ताव सोलापुरातील सेठ गोविंदरावजी आयुर्वेदिक महाविद्यालयाने क्लिनिकल ट्रायल रजिस्ट्री ऑफ इंडिया, नवी दिल्लीस पाठविला आहे. तूर्तास, हा प्रस्ताव समाधानकारक असल्याचे क्लिनिकल ट्रायल रजिस्ट्री ऑफ इंडियाने म्हटले आहे.

सोलापुरातील बातम्या वाचण्याठी येथे क्लिक करा
महाराष्ट्रालाच नव्हे तर संपूर्ण जगाला परेशान करून सोडलेल्या कोरोना विषाणूला हद्दपार करण्यासाठी प्रभावी औषध शोधून काढण्याचे युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. गुजरातमधील पारुल मेडिकल कॉलेज, हरियाणातील मेदिसिटी तर म्हैसूर येथील मेडिकल कॉलेजमध्ये तज्ज्ञांचे संशोधन सुरू आहे. दरम्यान, कडुनिंब हे भारतात उगवणारे औषधी झाड असून देशभरात सुमारे चार कोटी कडुनिंबाची झाडे आहेत. प्राणी, पक्षी व मनुष्यातील व्हायरल आजार दूर करण्यासाठी कडूनिंबाच्या पानांचा वापर प्रभावी ठरू शकतो, असेही जगातील नामवंत शास्त्रज्ञांनी आहे. एचआयव्हीसह अन्य आजारांवर अँटिव्हायरस म्हणून कडुनिंबाची पाने उपयुक्त असल्याचे जगभरातील शास्त्रज्ञांनी मान्य केले आहे. मात्र, या संशोधनात पेटंट मिळत नसल्याने संशोधक तथा कंपन्या त्यासाठी पुढाकार घेत नसल्याचे काही संशोधकांचे म्हणणे आहे. कोरोना या विषयांवर प्रभावी औषध तयार व्हावे, यादृष्टीने सोलापुरातील शेठ गोविंदरावजी आयुर्वेदिक महाविद्यालयाने पुढाकार घेत कडुनिंबाच्या पानांवर संशोधन करण्यास परवानगी मागितली आहे.

चाचणी तथा संशोधनास मिळावी मान्यता
आजवर प्राणी, पक्षी व माणसांमधील विविध 'फ्ल्यू'सारख्या व्हायरस आजारांवर कडुनिंबाच्या पानांचा रस तथा त्यापासून बनवलेली औषधे उपायकारक ठरतात, असे जगातील शास्त्रज्ञांनी म्हटले आहे. त्यामुळे कोरोनाच्या विषाणूला शरीरातून बाहेर काढण्यासाठी हे औषध उपयुक्त ठरेल का, यावर संशोधनाची गरज आहे. या पार्श्वभूमीवर कोरोनाची लक्षणे असलेल्या रुग्णांवर चाचणी करण्याची अथवा त्यावर संशोधन करण्यास क्लिनिकल ट्रायल रजिस्ट्री ऑफ इंडियाने मान्यता द्यावी, असेही शेठ गोविंदरावजी आयुर्वेद महाविद्यालयाच्या प्रस्तावात म्हटले आहे. प्रथमतः या प्रस्तावास शेठ गोविंदरावजी आयुर्वेदिक महाविद्यालयाने मान्यता दिली असून प्रा. मुकुंद मोरे हे मार्गदर्शक आहेत, तर‌ प्रा. विद्यानंद कुंभोजकर, डॉ. पल्लवी कुलकर्णी यांनीही त्यासाठी पुढाकार घेतला आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Neem leaves boost the immune system