पोलिस आयुक्‍तांची नवी शक्‍कल! गल्लीतील दादांवर आता वॉच; बालपणासह संगतीची गोळा केली माहिती 

4Maha_20Police_35.jpg
4Maha_20Police_35.jpg

सोलापूर : शहरातील शांतता व सुव्यवस्था कायम राहावी, सर्वसामान्यांना आनंदाने जगता यावे, मुली तथा महिलांना सुरक्षितता वाटावी म्हणून पोलिस आयुक्‍त अंकुश शिंदे यांनी गडचिरोलीच्या धर्तीवर नवी शक्‍कल लढविली आहे. त्यांनी आता शहरातील पोलिस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या परिसरातील छोट्या-मोठ्या गुंडांची तथा दादांची माहिती संकलित केली आहे. विशेषत: त्यात गुंडांचे बालपण, कॉलेज जीवन, मित्र, कौटुंबिक वातावरण याचीही माहिती गोळा केली आहे.

सोलापूर शहराची लोकसंख्या 12 लाखांहून अधिक आहे. शहरात सात पोलिस ठाणे असून त्याअंतर्गत काही पोलिस चौक्‍या आहेत. शहरातील चोऱ्या, हाणामारी, गुंडांची दहशत कमी करण्याच्या दृष्टीने आता वेगळेच नियोजन करण्यात आले आहे. शांतता कमिटीचे सदस्य आणि पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या मदतीने शहरवासियांना दहशतमुक्‍त जगता यावे हा त्यामागे हेतू आहे. रेकॉर्डवरील गुन्हेगारांसह दहशतीचे एक-दोन गुन्हे दाखल असलेल्यांचाही त्यात समावेश करण्यात आला आहे. तर गुन्हे दाखल नाहीत, परंतु एखाद्याची त्यांच्या परिसरात दहशत आहे, त्यांचीही माहिती संकलित करण्यात आली आहे. काहीवेळा गुन्हेगाराला प्रोत्साहन देणारा पडद्याआड असतो, परंतु तो कधी समोर येत नाही. त्याच्यावर एकही गुन्हा दाखल झालेला नाही, अशांचाही त्यात समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे ठरावीक परिसरात गुन्हा घडल्यास तो कशाप्रकारचा आहे, त्यानुसार संशयितांची चौकशी करणे सोयीस्कर होईल, असा विश्‍वास पोलिस आयुक्‍तांना आहे. 


गुन्हेगारीचा अंत हा वाईटच 
सोलापुरातच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात, देशातील गुन्हेगारी प्रवृत्तींच्या व्यक्‍तींचा शेवट हा वाईटच होतो. त्यावेळी त्याच्या कुटुंबाची वाताहत होते, त्याचे कुटूंब रस्त्यावर येते. त्यामुळे गुन्हेगारी बाजूला ठेवून प्रत्येकांनी चांगला नागरीक बनण्याचा प्रयत्न करायला हवा, असे आवाहन पोलिस आयुक्‍त अंकुश शिंदे यांनी केला आहे. जेणकरुन शहराचा विकास होईल आणि सर्वांना सुखी, समाधानी, दशहतमुक्‍त जीवन जगता येईल, असेही आयुक्‍त म्हणाले. 


चार पोलिस ठाणे हिटलिस्टवर 
शहरात जेलरोड, फौजदार चावडी, सदर बझार, विजापूर नाका, एमआयडीसी, जोडभावी पेठ आणि सलगर वस्ती असे सात पोलिस ठाणे आहेत. त्यापैकी विजापूर नाका, फौजदार चावडी, जेलरोड आणि सदर बझार पोलिस ठाण्याअंतर्गत हाणामारी, दहशत, खून अशा गुन्ह्यांची सर्वाधिक नोंद आहे. या पोलिस ठाण्याअंतर्गत अंदाजित अडीचशे संशयित गुंड तथा दादांची यादी बनविण्यात आल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले. तर उर्वरित पोलिस ठाण्याअंतर्गतही दोनशे ते सव्वादोनशे संशयित आरोपी तथा पडद्यामागचे दादा असल्याचेही सांगण्यात आले. यांची यादी तयार झाल्यानंतर सर्व पोलिस ठाण्यातील अधिकाऱ्यांची विशेष बैठक घेतली जाणार आहे. त्यानंतर त्यांना पोलिस आयुक्‍त श्री. शिंदे मार्गदर्शन करणार आहेत. त्यानुसार गुन्ह्यांच्या स्वरुपावरून संबंधित संशयितांची चौकशी केली जाणार आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com