
माझ्याबद्दल पोलिसांना माहिती दिली म्हणून अशोक जेटप्पा रबनळ्ळी (रा. शाहीर वस्ती, भवानी पेठ) याने हाताने व कमरेच्या बेल्टने मारहाण केली. तसेच जवळील फरशीचा तुकडा छातीत मारून जखमी केल्याची फिर्याद अर्जुन अशोक वाघमारे (रा. शाहीर वस्ती) यांनी जोडभावी पोलिसांत दिली.
सोलापूर : माझ्याबद्दल पोलिसांना माहिती दिली म्हणून अशोक जेटप्पा रबनळ्ळी (रा. शाहीर वस्ती, भवानी पेठ) याने हाताने व कमरेच्या बेल्टने मारहाण केली. तसेच जवळील फरशीचा तुकडा छातीत मारून जखमी केल्याची फिर्याद अर्जुन अशोक वाघमारे (रा. शाहीर वस्ती) यांनी जोडभावी पोलिसांत दिली. त्यानुसार रबनळ्ळीविरुद्ध गुन्हा दाखल झाला असून, पोलिस नाईक श्री. मुजावर हे पुढील तपास करीत आहेत.
तपास अधिकाऱ्याचे नावच नाही
सलगर वस्ती पोलिसांत मोबाईल चोरीचा गुन्हा दाखल झाला. मोबाईल चोरल्याच्या संशयावरून दोघांनी तरुणाला बेदम मारहाण केली. त्या दोघांविरुद्ध पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास करणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्याचे नावच पोलिस आयुक्तालयाकडून दाखविण्यात आले नाही. शहरातील काही पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या बदल्या झाल्यानंतर माहिती कक्षाचा कारभार "राम भरोसे'च असल्याची चर्चा आहे. त्यामुळे माहिती देण्यात अनेक त्रुटी राहू लागल्याचे दिसत आहे.
खून प्रकरणात सहाजण निर्दोष
सुनेला छेडछाड केल्यानंतर फिर्याद दिल्याचा राग मनात धरून नवनाथ जाधव (वय 65) यांचा तलवार, लोखंडी पाइप व काठ्यांनी मारून खून झाल्याची घटना घडली होती. त्या वेळी मध्यस्थी करणाऱ्या त्यांच्या पत्नीसह जाधव यांच्या मुलास जखमी केल्याप्रकरणी श्रीराम दशरथ बारंगुळे, अनिल नरहरी बारंगुळे, दशरथ शिवाजी बारंगुळे, बापू शिवाजी बारंगुळे, परमेश्वर विठ्ठल साळुंखे व मंदाकिनी दशरथ बारंगुळे (सर्वजण रा. खांडवी, ता. बार्शी) यांच्याविरुद्ध वैराग पोलिसांत 20 सप्टेंबर 2016 रोजी गुन्हा दाखल झाला. त्यानंतर संशयित आरोपींनी ऍड. मिलिंद थोबडे, ऍड. धनंजय माने यांच्यातर्फे न्यायालयात धाव घेतली. संशयित आरोपींचा युक्तिवाद ग्राह्य धरून बार्शीचे जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. डी. अग्रवाल यांनी सर्व संशयित आरोपींची खुनाच्या आरोपातून निर्दोष मुक्तता केली. या प्रकरणात ऍड. निखिल पाटील यांनीही काम पाहिले.
संपादन : श्रीनिवास दुध्याल