गहाणवट ठेवलेले दागिने घरी घेऊन जाताना वाटेतच चोरी ! कोरोना रुग्णाच्या घरात चोरी करणारा अटकेत 

तात्या लांडगे 
Wednesday, 28 October 2020

नवीन विडी घरकुल परिसरातील रेश्‍मा अख्तर शेख यांनी मंगळवार पेठेतील सुरेश रामचंद्र नारायणपेठकर यांच्याकडे दागिने गहाण ठेवले होते. 21 ऑक्‍टोबर रोजी दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास दागिने पर्समध्ये ठेवून त्या घराकडे निघाल्या होत्या. त्या वेळी चोरट्याने त्यांची पर्स लांबवत तेथून पलायन केले. 

सोलापूर : नवीन विडी घरकुल परिसरातील रेश्‍मा अख्तर शेख यांनी मंगळवार पेठेतील सुरेश रामचंद्र नारायणपेठकर यांच्याकडे दागिने गहाण ठेवले होते. 21 ऑक्‍टोबर रोजी दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास दागिने पर्समध्ये ठेवून त्या घराकडे निघाल्या होत्या. त्या वेळी चोरट्याने त्यांची पर्स लांबवत तेथून पलायन केले. 48 हजार 300 रुपयांचे सोने- चांदीचे दागिने चोरीला गेल्याची फिर्याद रेश्‍मा शेख यांनी मंगळवारी (ता. 27) जोडभावी पोलिसांत दिली. पोलिस हवालदार श्री. शेख या घटनेचा पुढील तपास करीत आहेत. 

कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाच्या घरी चोरी करणारा अटकेत 
एसआरपी कॅम्पजवळील श्री समर्थ सोसायटी परिसरातील निवृत्त पोलिस कर्मचाऱ्याचे कुटुंब कोरोना पॉझिटिव्ह आढळले. त्यांचे अख्खे कुटुंब रुग्णालयात उपचारासाठी गेले होते. घरात कोणी नसल्याची संधी साधून चोरी करणाऱ्या आकाश महादेव उडाणशिव (रा. देव नगर, सोरेगाव) याला पोलिसांनी मंगळवारी (ता. 27) सापळा रचून अटक केली. 

शहरात ठिकठिकाणी घरफोडी, चोरी करणाऱ्या आकाशच्या नावे विविध पोलिस ठाण्यांत 11 गुन्हे नोंद आहेत. त्याच्यावर पोलिसांनी वॉच ठेवला होता. मंगळवारी (ता. 27) तो सराफ बाजारात चोरीचे सोने विक्रीसाठी जाणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी बागवान मशिदीजवळ सापळा रचला. मात्र, आकाशला याची कुणकुण लागली आणि तो तिथून पळून जाण्याचा प्रयत्न करीत असताना पोलिसांनी त्याला अटक केली. त्याच्याकडून पोलिसांनी मोबाईलसह 145 ग्रॅम सोन्याचे दागिने असा चार लाख 60 लाखांचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई सहाय्यक पोलिस निरीक्षक सचिन बंडगर, सुहास आखाडे, पोलिस शिपाई संजय काकडे, संतोष येळे, विजय वाळके, प्रवीण मोरे, दत्तात्रय कोळेकर, राजू मुदगल, कुमार शेळके, आयशा फुलारी, पोलिस उपनिरीक्षक संदीप शिंदे, गणेश शिंदे, दिलीप नागटिळक, सोमनाथ सुरवसे, सागर गुंड, अश्रूभान दुधाळ व विद्यासागर मोहिते यांनी केली. 

तरुणाच्या डोक्‍यात फोडली बाटली 
तरुणाला घरातून बोलावून त्याला शिवीगाळ करून त्याच्या डोक्‍यात काचेची बाटली फोडली. त्यात सर्वेश शिवानंद वाडीकर (रा. लक्ष्मी रामण्णा आपार्टमेंट, दाजी पेठ) हा जखमी झाला असून त्याच्या फिर्यादीनुसार अथर्व बसरगी, प्रतीक मस्के, श्रीनाथ लिंबोळे यांच्याविरुद्ध सदर बझार पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. मी सोहेल बोलत आहे, तुला अथर्व, प्रतीक आणि श्रीनाथने हेरिटेजमागील बोळात लिटल फ्लॉवर शाळेजवळ बोलावले आहे, असे सांगितले. तेव्हा सर्वेश व त्याचा मित्र त्या ठिकाणी पोचले. त्या वेळी शिवीगाळ करीत मारहाण केल्याचे फिर्यादीत नमूद आहे. 

संगमेश्‍वर नगरात शेळीची चोरी 
अक्कलकोट रोडवरील संगमेश्‍वर नगरातून दोन महिलांसह एका मुलाने शेळी चोरून नेल्याची फिर्याद राजमल इसाक तांबोळी यांनी सदर बाजार पोलिस ठाण्यात दिली आहे. तांबोळी यांच्या घरासमोर शेळी बांधली होती. कोणीतरी दोर कापून शेळी चोरून नेली असून अंदाजित 15 हजार रुपये किंमत असल्याचेही फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. घटनेचा पुढील तपास पोलिस हवालदार श्री. कांबळे हे करीत आहेत. 

दोन तोतया पोलिसांना अटक 
घरात कोणीच नसल्याचा अंदाज घेऊन आम्ही पोलिस असल्याचे सांगत घरात घुसण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोघांना विजापूर नाका पोलिसांनी अटक केली आहे. मयूर दिगंबर तळभंडारे, महेंद्र श्रीहरी तळभंडारे (रा. मिलिंद नगर, बुधवार पेठ) अशी अटक केलेल्या संशयित आरोपींची नावे आहेत. साईश्री बंगलोज (अनुपम पार्कजवळ, विजयपूर रोड) येथील राजेश रामचंद्र पवार यांच्या घरी देवकार्य असल्याने घरातील सर्वजण परगावी गेले होते. घरात पवार व त्यांची भाची हे दोघेच होते. त्या वेळी बाहेरून दरवाजा वाजविणाऱ्या दोघांना त्यांनी कोण आहात विचारल्यानंतर त्यांनी पोलिस असल्याचे सांगितले. त्या वेळी पवार यांनी 100 नंबरवर कॉल करून याबाबत माहिती दिली. त्यानंतर काही वेळाने ते दोघेही तिथून पसार झाल्याचेही फिर्यादीत नमूद आहे. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: News of theft, fraud and crime in Solapur city area