बेक्रिंग : राष्ट्रवादीचे नगरसेवक किसन जाधवविरुध्द अजामिनपात्र वॉरंट 

सकाळ वृत्तसेवा
Monday, 14 September 2020

ठळक बाबी... 
- साडी विक्रेत्याला 10 टक्‍के व्याजदराने दिले होते 50 हजार रुपये 
- रक्‍कम परतफेड न केल्याने नगरसेवक किसन जाधवसह सहा जणांनी केली होती मारहाण 
- प्रवीण सिद्राम जाधव (न्यू हायस्कूल, सलगरवाडीजवळ) यांनी घेतली होती व्याजाने रक्‍कम 
- व्याज अन्‌ दंडासह दोन लाख रुपयांच्या मागणीसाठी हॉकी स्टिक, बेसबॉल बॅटने केली मारहाण 
- सावकारी कायद्याअंतर्गत दाखल झाला संशयित आरोपींवर गुन्हा: नगरसेवक तेव्हापासून फरार 
- नगरसेवकाचा पोलिसांनी कुर्डूवाडी, अकलूज, चंदननगर, हडपसर (पुणे) येथे जाऊन घेतला शोध 
- गुन्हा करुन नगरसेवक झाला फरार: न्यायालयाने जारी केले नॉन- बेलेबल (अजामिनपात्र) वॉरंट 

 

सोलापूर : साडी व्यवसायासाठी प्रवीण सिद्राम जाधव (रा. न्यू हायस्कूल, सलगरवाडी) या तरुणाने नगरसेवक किसन जाधवकडून 50 हजार रुपये व्याजाने घेतले. मात्र, लॉकडाउनमुळे मुद्दल व व्याजाची परतफेड करु न शकल्याने एका रुग्णालयात दोघांची भेट झाली. त्यानंतर प्रवीण जाधव यांना नगरसेवक जाधव याच्यासह अन्य सहा जणांनी जबर मारहाण केली. 

गुन्हा करुन राष्ट्रवादीचे नगरसेवक किसन जाधव याच्यासह त्याचे साथीदार प्रेम नागेश गायकवाड, विकी चंद्रकांत जाधव, प्रभाकर गायकवाड हे फरार झाले आहेत. वरिष्ठ पोलिस निरीक्षक संपत पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक बी. डी. भूसनर हे संशयित आरोपींचा तपास करीत आहेत. घटनेतील मुख्य संशयित आरोपी नगरसेवक जाधव फरार झाल्याने न्यायालयाने त्याच्याविरुध्द अजामिनपात्र वॉरंट जारी केले आहे. 28 सप्टेंबरपर्यंत या वॉरंटची बजावणी करुन अहवाल सादर करावा, असे आदेश न्यायालयाने पोलिसांना दिले आहेत. दरम्यान, खबऱ्याकडून मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी संशयित आरोपी नगरसेवक जाधव याचा शोध सोलापूर शहर, कुर्डूवाडी, अकलूज, चंदननगर, हडपसर याठिकाणी घेतला. मात्र, नगरसेवक जाधव सापडलाच नाही, असेही पोलिस सलगर वस्ती पोलिसांकडून सांगण्यात आले. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Non-bailable warrant against NCP corporator Kisan Jadhav