विठ्ठल-रुक्‍मिणीच्या मुखदर्शनासाठी आता दररोज एक हजाराऐवजी दोन हजार भाविक करू शकतात ऑनलाइन बुकिंग ! 

अभय जोशी 
Tuesday, 17 November 2020

श्री विठ्ठलाचे उद्या (बुधवार, ता. 18) पासून दिवसभरात एक हजाराऐवजी दोन हजार भाविकांना ऑनलाइन बुकिंग करून मुखदर्शन घेता येणार आहे. भाविकांकडून होणारी मागणी लक्षात घेऊन मंदिर समितीने हा निर्णय घेतला असल्याची माहिती मंदिर समितीचे सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर आणि कार्यकारी अधिकारी विठ्ठल तथा सुनील जोशी यांनी दिली. 

पंढरपूर (सोलापूर) : श्री विठ्ठलाचे उद्या (बुधवार, ता. 18) पासून दिवसभरात एक हजाराऐवजी दोन हजार भाविकांना ऑनलाइन बुकिंग करून मुखदर्शन घेता येणार आहे. भाविकांकडून होणारी मागणी लक्षात घेऊन मंदिर समितीने हा निर्णय घेतला असल्याची माहिती मंदिर समितीचे सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर आणि कार्यकारी अधिकारी विठ्ठल तथा सुनील जोशी यांनी दिली. 

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या आठ महिन्यांपासून येथील श्री विठ्ठल - रुक्‍मिणी मंदिर भाविकांसाठी बंद ठेवण्यात आले होते. शासनाने अनेक बाबतीत निर्बंध कमी केल्यामुळे मंदिर देखील भाविकांसाठी खुले करावे, अशी मागणी सातत्याने होत होती. त्याची दखल शासनाने घेतली आणि 16 नोव्हेंबरपासून राज्यातील मंदिरे भाविकांसाठी खुली करण्यात आली. 

शासनाच्या निर्देशानंतर श्री विठ्ठल - रुक्‍मिणी मंदिर भाविकांसाठी खुले करण्यात आले आहे; परंतु कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दक्षता म्हणून पदस्पर्श दर्शनाऐवजी मुखर्दशन सुरू करण्यात आले आहे. ऑनलाइन बुकिंग करून आलेल्या एक हजार भाविकांना मंदिरात मुखदर्शनासाठी सोडण्यात येत होते. परंतु भाविकांची मागणी लक्षात घेऊन उद्या (ता. 18) पासून एक हजाराऐवजी दोन हजार भाविकांना मंदिरात प्रवेश दिला जाणार आहे. 

दररोज सकाळी सहा ते रात्री नऊ या वेळेत दर तासाला सध्या शंभर भाविकांना मुखदर्शनासाठी सोडण्यात येत आहे. त्यामध्ये बुधवारपासून दुपटीने वाढ करण्यात येणार आहे. त्यामुळे दर तासाला दोनशे भाविकांना दर्शन घेता येणार आहे. दहा वर्षांपेक्षा जास्त आणि 65 वर्षांपेक्षा कमी वय असलेल्या लोकांना ऑनलाइन दर्शनासाठी बुकिंग करता येणार आहे. गरोदर महिलांना सध्या प्रवेशास मनाई आहे. मंदिरात प्रवेश करत असताना प्रत्येक भाविकाचे थर्मल स्कॅनिंग करण्यात येत असून, हातावर सॅनिटायझर देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. 

ऑनलाइन दर्शन बुकिग www.vitthalrukminimandir.org/home.html या मंदिर समितीच्या संकेतस्थळावरून करता येते. याखेरीज http://117.214.89.131qms1 (सदरची लिंक Google Chrome, Mozila Firefox या वेब ब्राऊजरवर कॉपी पेस्ट करावी) ही पर्यायी लिंक सुद्धा आता देण्यात आली आहे. त्याचाही वापर भाविकांना करता येईल. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Now every day two thousand devotees can book online for the darshan of Vitthal